विकार गुडघ्याच्या लिगॅमेंटचा, आधार आयुर्वेदाचा | पुढारी

विकार गुडघ्याच्या लिगॅमेंटचा, आधार आयुर्वेदाचा

अचानक तीव्र गुडघेदुखीच्या विविध प्रकारांपैकी लिगॅमेंटल एंज्युरी म्हणजेच गुडघ्याच्या सांध्यांतील स्नायुपट्टिकेला आघात होऊन ती अर्धवट अथवा पूर्ण फाटणे, म्हणजेच ‘टीअर’ व त्यामुळे गुडघ्यात तीव्र वेदना, सूज, जखडणे, हालचाल करता न येणे हा एक विकार आढळतो.

गुडघ्याच्या सांध्यांमध्ये आतील व बाहेरील बाजूस दोन स्नायुपट्टिका असतात. तसेच पुढील व मागील बाजूसदेखील दोन लिगॅमेंट्स असतात. गुडघ्याच्या सांध्यांच्या विविध हालचाली नियंत्रित करण्याचे काम तसेच सांध्यांना आधार देण्याचे काम हे करत असतात. खेळणे, पळणे, व्यायाम, कष्टाची कामे करताना काही वेळा अचानक हालचालीची दिशा बदलल्यामुळे सांध्यांतील हाडांवर ताण येऊन, गुडघा तीव्र फिरल्यामुळे या लिगॅमेंट्स वर अतिरिक्‍त ताण निर्माण होतो. त्याच वेळी सांध्यांतील हाडे विरुद्ध दिशेने फिरल्यामुळे हे लिगॅमेंट्स फाटणे ही घटना घडते. यालाच लिगॅमेंटल टीअर असे म्हटले जाते. काही वेळा स्नायूंतील थोड्याच मांसतंतूंना इजा झाल्यास त्यास सिंपल स्प्रेन असे म्हटले जाते.

लिगॅमेंटल टीअरच्या तक्रारी :

संबंधित बातम्या

साधारणपणे स्थूल व तरुण व्यक्‍ती, खेळाडू, अ‍ॅथलीट यांच्यामध्ये हा विकार जास्त प्रमाणात आढळतो. वजन जास्त असणार्‍या, उंच स्त्रियांमध्ये कोणत्याही कारणांनी स्नायूंचा अशक्‍तता असल्यास हा त्रास होण्याची शक्यता जास्त आढळते.

लिगॅमेंटल टीअर झाल्यावर गुडघ्यामध्ये तीव्र वेदना निर्माण होतात. गुडघ्याच्या थोड्याही हालचालीने या वेदना अधिक तीव्र होतात. पुढील 1-2 तासांत गुडघ्याला मोठ्या प्रमाणात सूज येते. थोडादेखील स्पर्श गुडघ्याला मोठ्या प्रमाणात सूज येते. थोडादेखील स्पर्श गुडघ्याला सहन होत नाही. कालांतराने काही जणांत गुडघा जखडतो. चालण्याचा प्रयत्न केल्यास गुडघा लपकतो. उभा राहणे व चालणे यामुळे वेदना वाढतात. उभे राहणे व चालणे शक्य होत नाही. एक्स-रे व एम.आर.आय.ची तपासणी केल्यावर लिगॅमेंटल एंज्युरी व त्याचे प्रमाण म्हणजेच ग्रेड यांचे निदान होते. (आयुर्वेदीय शास्त्रातील क्रोष्टुकशीर्ष या विकाराशी लिगॅमेंटल एंज्युरीचे साधर्म्य आढळते.)

लिगॅमेंटल एंज्युरीवरील उपचार :

एंज्युरी ही स्प्रेन प्रकारातील म्हणजेच कमी तीव्रतेची असल्यास औषधी उपचार, विश्रांती, स्थानिक उपचार यांनी उत्तम आराम मिळतो; पण एंज्युरी तीव्र स्वरूपाची असेल, त्यावेळी अनेक जणांना शस्त्रकर्माचा सल्ला दिला जातो. त्यामुळे अनेकदा हे रुग्ण घाबरलेले असतात. वास्तविकपणे औषधी उपचारानंतर गुडघ्यावर अजिबात ताण न देण्याची, पुरेशी विश्रांती घेण्याची व काळजी घेण्याची तयारी असल्यास आयुर्वेदीय उपचारांनी ऑपरेशन टाळण्यासाठी निश्‍चित चांगला प्रयत्न करता येतो. अनेकांचे ऑपरेशन टळल्याचे माझे अनुभवात आहे.

गुडघ्यावर शिरीष तगर, यष्टिमधू, चंदन, जटामांसी, हरिद्रा, दारुहरिद्रा, कुष्ठ, रक्‍तचंदन, गुग्गुळ, लताकरंज यापासून केलेला लेप लावला जातो. गुडघ्यावरील सूज व वेदना कमी होण्यास त्याचा उपयोग होतो.

पोटातून घेण्यासाठी वरुण, निर्गुडी, रास्ना, गोखरू, गुळवेल, सारिवा, मंजिष्ठा, निंब, वचा, हरिद्रा, दारुहरिद्रा, गुग्गुळ, लाक्षा, त्रिफळा, एरंड यापासून तयार केलेली संयुक्‍त औषधे वापरली जातात.

सूज चांगली कमी आल्यानंतर गरजेप्रमाणे स्नेहन, स्वेदन, बस्ती या उपचारांनी गुडघ्याच्या सांध्यांची व स्नायूंची ताकद वाढवण्याचे कार्य केले जाते.

उपचार घेताना सुरुवातीला पूर्ण विश्रांती, त्रास कमी आल्यावर वैद्य सल्ल्याने मर्यादित हालचाल व त्रास पूर्ण थांबल्यावर विशिष्ट व्यायाम करणे व विशिष्ट हालचाली टाळणे, नी कॅप वापरणे यालादेखील उपचारात विशेष महत्त्व आहे; परंतु या गोष्टी नीट सांभाळल्यास आणि उपचार न कंटाळता चिकाटीने घेतल्यास लिगॅमेंटल एंज्युरीच्या विकारात आयुर्वेदाचा उत्तम उपयोग होतो.

Back to top button