उष्मांक (कॅलरीज) अभंग राखा | पुढारी | पुढारी

उष्मांक (कॅलरीज) अभंग राखा | पुढारी

मयुरा अ. जाधव  वाचस्पतीविधिज्ञ

हिताहितं सुखं दु:खंआयु: तस्य हिताहितं।  मानं च तच्च यत्रोक्‍तं आयुर्वेद: स उच्चते ॥ (चरक संहिता1:39) अर्थात, हितायू, अहितायू, सुखायू एवं दु:खायू याप्रकारे चतुर्विध आयुष्याच्या हितासाठी तसेच अहित, पथ्य आणि अपथ्य अन्‍नायूचे प्रमाण एवं स्वरूप ज्यामध्ये असते त्याला ‘आयुर्वेद’ असे म्हणतात. जीममध्ये एक्सरसाईज करत असताना, फिटनेस फोरमवर व्यायाम प्रकाराची माहिती घेत असताना प्रामुख्याने कॅलरीज हा शद्ब तुमच्या कानांवर  पडतो. वजन वाढलेल्या स्त्रियांना, कॅलरीज डिफ्लेक्ट करा. वजन कमी असलेल्या स्त्रियांना, कॅलरीज सरप्लस करा. तर आदर्श वजन असणार्‍या स्त्रियांना कॅलरीज मेंटेन करा, असे प्रशिक्षक सांगत असतात. त्यामुळे फिटनेसबाबत जागरूक असणार्‍या स्त्रियांना या टर्मचे आकर्षण कमी आणि भीती जास्त वाटते. 

उष्मांक (कॅलरीज) म्हणजे काय? 

कोणत्याही ज्वलनाबरोबर आणि कार्यशक्‍तीच्या निर्मितीबरोबर उष्णता अपरिहार्यपणे असतेच आणि म्हणून कार्यशक्‍तीच्या चयापचयन क्रियेच्या मोजमापनाची ती निदर्शक बनू शकते. कॅलरीज हे उष्णतामापनाचे परिमाण आहे. कारण, ज्याप्रमाणे लांबी, रुंदी, वजन यांना मोजण्यासाठी परिमाणे आवश्यक आहेत. त्याचप्रमाणे शास्त्रीय कार्यात उष्णता मापनासाठीसुद्धा परिमाण असणे आवश्यक आहे. उष्मांक म्हणजे एक किलोग्रॅम पाण्याचे तपमान एक अंश फॅरनहाईटने वाढविण्यासाठी लागणारी उष्णता. कॅलरीजचे मोजमापन करणार्‍या यंत्रास कॅलॉरिमीटर ‘ज्वलनमूल्यमापक’ म्हणतात. इंटनेटवर स्वत:चा आहार लिहिताच त्याचे उष्णांकमूल्य समजते. कॅलरीज म्हणजे जेवणातील ऊर्जा. आपल्या शरीराला झोपेतही ऊर्जेची गरज असते. त्यालाच बेसल मेटॅबॉलिक रेट म्हणतात.

उष्मांक अधिशेष (कॅलरी सरप्लस) : नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशननुसार भारतीय प्रौढ स्त्रियांसाठी 1800 कॅलरीज आणि पुरुषांसाठी 2100 कॅलरीज प्रतिदिन आवश्यक असतात. एखादी स्त्री दिवसाला दोन हजार कॅलरीजचा आहार घेत आहे आणि ती अठराशे कॅलरीजचा वापर चालणे, बोलणे, बसणे यासारख्या ऐच्छिक स्वरूपाच्या आणि रूधिराभिसरण, श्‍वसन आणि पचन यासारख्या अनैच्छिक स्वरूपाच्या क्रियांसाठी करत आहे. याचा अर्थ, दोनशे कॅलरीज प्रतिदिन तिच्या शरीरामध्ये चरबीच्या स्वरूपात जमा होतात. या अतिरिक्‍त जमा होणार्‍या उष्मांकाला ‘कॅलरी सरप्लस’ असे म्हणतात. त्यामुळे वर्षाला त्या स्त्रीच्या पोटावर, नितंबावर, तसेच संपूर्ण शरीरावर अनावश्यक चरबी स्वरूपात अकरा किलो वजन वाढेल. वाढलेल्या वजनाचे पालनपोषण करण्यासाठी शरीराला अधिक उष्मांंक लागतोे. प्रतिदिन 2000 कॅलरीजपेक्षा जास्त आहार घेतला जातो आणि वजन वाढण्याचे चक्र निरंतर  चालूच राहते.     

उष्मांक घट (कॅलरी डिफ्लेक्ट) : एखाद्या स्त्रीचे वजन पंचाहत्तर किलो आहे. तिला रोजच्या ऐच्छिक आणि अनैच्छिक स्वरूपाच्या क्रियांसाठी अठराशे कॅलरीजची गरज आहे. जीममध्ये दोनशे कॅलरीज घटविण्याचे व्यायाम ती करते. दैनंदिन आहारात दोनशे कॅलरीज कमी करून तो सोळाशे कॅलरीजचा घेते. शरीराकडून होणारे काम, उष्णतानिर्मिती व अन्‍नसेवन या तिहींचा निकटवर्ती व प्रत्यक्ष संबंध आहे. अन्‍नामधून पुरविल्या गेलेल्या कार्यशक्‍तीपेक्षा अधिक काम करणे शरीराला कठीण असते आणि जर थोडेसे अधिक काम झालेच तर ते शरीरातील चरबीच्या आणि यकृतातील ग्लायकोजेनच्या साठ्यातील उसन्या घेतलेल्या शक्‍तीमुळे होते. व्यायामासाठी दोनशे आणि कमी उष्मांकाचे जेवण घेतल्याने दोनशे अशी एकूण चारशे कॅलरीजची तूट प्रतिदिनी पडते. या घट होणार्‍या उष्मांकाला ‘कॅलरी डिफ्लेक्ट ’ असे म्हणतात. त्यामुळे प्रतिमहिना त्या स्त्रीचे दोन किलो वजन घटेल. 3500 कॅलरीजचे ज्वलन झाल्यावर एक पौंड वजन कमी होते. त्याचे प्रमाण सत्तर टक्के चरबी आणि  तीस टक्के स्नायूपेशी असे आहे.

उष्मांक अभंग(कॅलरी मेंटेन) : एखाद्या स्त्रीचे आदर्श वजन 54 किलो आहे. तिला रोजच्या ऐच्छिक आणि अनैच्छिक स्वरूपाच्या क्रियांसाठी अठराशे कॅलरीजची गरज आहे. जीममध्ये दोनशे कॅलरीज घटविण्याचे व्यायाम ती करते. तिचा दैनंदिन आहार दोन हजार कॅलरीजचा आहे. यामुळे शरीरात येणारा उष्मांक व खर्च होणारा उष्मांक यांचा समतोल राखला जातो. पर्यायाने वजन कायमस्वरूपी 54  किलोच्याच आसपास राहते. समारंभात अशी स्त्री गेली आणि तिला बिर्याणी, आईस्क्रीम इ. खाण्याबद्दल आग्रह केला किंवा तिला खावेसे वाटले तर तिने अन्‍न व अन्‍नदात्याबद्दल कृतज्ञता व्यक्‍तकरावी. अपराधीपणाची भावना मनात न आणता ईश्‍वराचे आभार मानत अन्‍न हे पूर्णब्रह्म समजून मनसोक्‍त खावे. समजा तिने सहाशे कॅलरीजचा आहार अधिक घेतला तर काळजी करण्यासारखे काही नसते. जीममध्ये इलिप्टिकल क्रॉस ट्रेनिंग मशिनचा वापर बारा मिनिटे करून शंभर कॅलरीज जळतात. 

तसेच सहा मिनिटे संपूर्ण शरीराला वाफ दिल्याने शंभर कॅलरीज जळतात. अशी तीन दिवस अतिरिक्‍त मेहनत घेतल्याने सहाशे कॅलरीज जळून तिचे वजन पूर्वपदावर येते. याला ‘कॅलरीज मेंटेन’असे म्हणतात. अटवायर या शास्त्रज्ञाने प्रतिग्रॅमला प्रथिने व कर्बोदके चार उष्मांक, स्निग्ध पदार्थ नऊ उष्मांक , जल शून्य अशी आहार सत्त्वांपासून शरीराला मिळणारी जीवनमूल्ये सुचविली आहेत. ‘द डेव्हील व्हिस्पर इन माय इअर’, ‘यू आर नॉट स्ट्राँग इनफ टू विदस्टँड द स्टॉर्म ऑफ कॅलरीज.’ ‘टुडे आय सेड,‘ आय अ‍ॅम द स्टॉर्म’….!!!

Back to top button