व्यायाम करू की नको? | पुढारी | पुढारी

व्यायाम करू की नको? | पुढारी

हृदयविकार असलेल्या व्यक्‍तींनी व्यायाम करू नये, त्याने परत हार्ट अ‍ॅटॅक येऊ शकतो, असे अनेकदा बोलले जात असते. एकंदरच हृदयविकार आणि व्यायाम याबाबत नेमकी माहिती आपल्यातल्या बहुतेकांपाशी नसते, त्यामुळे गैरसमजही बरेच बळावलेले आढळतात. त्या पार्श्‍वभूमीवर, हृदयविकार आणि व्यायाम यासंदर्भाने माहिती देत मार्गदर्शन करण्याचा हा प्रयत्न.

* आपल्यातल्या अनेकांना असे वाटते की व्यायाम केल्याने हृदयावर ताण येतो, पण खरेतर योग्य व्यायाम हा हृदयविकारास अत्यंत उपयुक्‍त आहे.

* अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या नियमावलीप्रमाणे, हृदयविकार असलेल्या व्यक्‍तीने प्रत्येक आठवड्याला 150 मिनिटे एवढा माध्यम तीव्रतेचा अथवा 75 मिनिटे अधिक तीव्रतेचा व्यायाम करणे आवश्यक आहे.

* क्रमवार आपला व्यायाम वाढवत नेणे कधीही हिताचे. त्यातून आपल्या हृदयाला बळकटी येते, हृदयविकाराचे रिस्क फॅक्टर्स कमी होण्यास व पर्यायाने हृदयविकार रिव्हर्स होण्यास मदत होते.

* नियमित व्यायामामुळे रक्‍तदाब कमी होतो. व्यायामामुळे एलडीएल कोलेस्ट्रॉल (खराब कोलेस्ट्रॉल) कमी होते. हृदयाच्या रक्‍तवाहिन्या प्रसरण पावतात आणि हृदयाची पंम्पिंगक्षमता वाढते.

* व्यायामामुळे वजन कमी होण्यास मदत होते. वजन कमी झाल्यामुळे हृदयावरील ताण कमी होण्यास मदत होते.

* व्यायामाचा आणखीही एक महत्त्वाचा फायदा आहे. नियमित आणि यथायोग्य व्यायाम केल्यास आपल्या शरीरात हॉर्मोनचे योग्य संतुलन साधले जाते आणि कोरोनरी रक्‍तवाहिन्यांमधील प्लाक वाढण्यास प्रतिबंध होतो.

* अर्थात आपणास जर हृदयविकार असेल तर मनाने कुठलाही व्यायामप्रकार निवडू नका. अनियंत्रित आणि चुकीचा व्यायाम केल्यास हृदयास हानी पोहोचू शकते.

* आपल्या कार्डिओलॉजिस्टचा सल्ला घेऊनच व्यायामास सुरुवात करा. व्यायाम करण्यापूर्वी आपल्याला सखोल तपासण्या, 2 डी इकोकार्डिओग्राफी आणि एक्सरसाईज टेस्ट कराव्या लागतील. त्यानंतर दोन प्रकारचे व्यायामप्रकार आपल्याला सुचवले जाऊ शकतात. यामध्ये ट्रेडमिल, सायकलिंग, चालणे, पळणे, पोहणे अशा कार्डिओ अथवा अ‍ॅरोबिक व्यायामाचा समावेश होतो. दुसर्‍या प्रकारात वजने उचलून व स्नायूंना ताण देऊन स्ट्रेंग्थ ट्रेनिंगसाठी व्यायाम सांगितले जातात. अर्थात हे व्यायाम योग्य प्रमाणातच करणे हिताचे ठरते.

* अर्थात एक गोष्ट जाणीवपूर्वक लक्षात घ्यायला हवी. ती अशी- प्रत्येक व्यक्‍तीच्या हृदयाची एक कमाल गती असते. या गतीपेक्षा अधिक व्यायाम केल्यास हृदयास हानी पोहोचू शकते. आपण व्यायाम करताना ही गती ध्यानात ठेवून तिच्या पलीकडे जाऊ नये. साधारणपणे ही गती ‘220 – वय’ अशी मोजली जाते. या गतीच्या साधारणपणे 60 ते 80 टक्केपर्यंत हार्टरेट जाईल इतका व्यायाम करावा. हा व्यायाम करताना सुरुवातीचे काही महिने डॉक्टरांच्या देखरेखीखाली आणि ईसीजी मॉनिटरिंगखाली व्यायाम करावा. काही वेळा व्यायाम करताना छातीत दुखणे, घाम येणे, छाती भरून येणे, अस्वस्थता वाटणे व चक्‍कर येणे असे घडू शकते. डॉक्टरांच्या निगराणीखाली सुरुवातीला व्यायाम करण्याचा एक महत्त्वाचा फायदा म्हणजे, शारीरिकद‍ृष्ट्या काही अपाय होत असल्यास तो त्वरेने निदर्शनास येतो आणि यथायोग्य उपचार त्वरित मिळतो. 

* अनेकदा डॉक्टर असेही सुचवतात की, व्यायामांच्या सोबतीने योगासने करणेही हिताचे ठरते. नियमित योगासने केल्यामुळेदेखील हृदयावरील ताण, रक्‍तदाब आणि पर्यायाने हृदयाचं आरोग्य सुधारण्यास मदत होते; परंतु खूप गुंतागुंतीची आसने सुरुवातीला टाळावीत. 

* हृदयविकार असेल तर प्राणायामदेखील आरोग्यवर्धक ठरतो. प्राणायाम म्हणजेच श्‍वसनाचे व्यायाम हे आपल्या मेंदूचे हृदयावरील नियंत्रण वाढवण्यास मदत करतात. प्राणायामामुळे हृदयाची इस्केमिया सहन करण्याची क्षमता वाढते. यामुळे आपल्याला परत हृदयविकाराचा त्रास होण्याची शक्यता कमी होते. 

अपर्णा देवकर

 

Back to top button