हिवाळ्यात सुक्या मेव्याचे वरदान | पुढारी | पुढारी

हिवाळ्यात सुक्या मेव्याचे वरदान | पुढारी

डॉ. भारत लुणावत

हिवाळ्यात आरोग्याची काळजी घेण्यासाठी शरीराला उष्णता देणारे पदार्थ सेवन करायला हवेत. हिवाळ्यात कोरड्या आणि थंड हवेचा परिणाम त्वचेवर होतो. त्याचबरोबर एकूणच आरोग्यावरही होतो. त्यासाठी पोषक घटकांचे सेवन केले पाहिजे. सुका मेवा हा पोषक घटकांची खाण असतो, असे म्हटले जाते. एक मूठ सुका मेवा रोज सेवन केल्यास हिवाळ्यातील आजार दूर राहू शकतील. थोडक्यात, हिवाळ्यात सुका मेवा सेवन करणे आवश्यक आहे. 

हिवाळा हा आरोग्यदायी महिना असल्याचे मानले जाते. हिवाळ्यात भूक वाढते. त्यामुळे अर्थातच शरीराचा पोषणकाळ म्हणून हिवाळ्याकडे पाहिले जाते. पावसाळ्यात भूक कमी होते ती हिवाळा सुरू झाला, की वाढते. या काळात पौष्टिक आहार सेवन केल्यास आरोग्य चांगले राहणारच. आरोग्य चांगले राहण्यासाठी सुका मेवा जरूर सेवन करू शकतो. एक मूठभर सुका मेवा सेवन केल्यास त्यामुळे आरोग्य लाभ होतील. हिवाळ्यात बहुतांश घरामध्ये सुका मेवा आणला जातो. पारंपरिक पदार्थ जसे डिंकाचे लाडू, मेथीचे लाडू केले जातात. या लाडवांमध्ये सुका मेवा घातलेला असतो. सुका मेव्यात अनेक वेगवेगळे घटक आहेत, ते प्रत्येक घटक स्वतंत्रपणेही पोषक असतातच. सुका मेव्यातील या विविध घटकांचा काय फायदा होतो, त्यात कोणते पोषक घटक असतात, याची बारकाईने माहिती घेणे आवश्यक आहे. जेणेकरून आपल्या शारीरिक गरजांनुसार लक्ष देत सुक्या मेव्याची निवड करू शकतो. 

बदाम : आरोग्यासाठी बदाम ही निसर्गाने दिलेली भेट आहे जणू. अत्युत्तम गुणांनी युक्‍त बदामाचे अनेक आरोग्य लाभ आहेत. बदामात मोनोसॅच्युरेटेड चरबीचे प्रमाण खूप जास्त असते. त्यामुळे बदाम नियमित सेवन केल्यास हृदयरोगापासून बचाव होतो. आहारतज्ज्ञ आणि आरोग्यतज्ज्ञ डॉ. नमिता जैन यांनी सांगितल्यानुसार बदामामध्ये कॅल्शिअम, तंतुमय पदार्थ, पोटॅशिअम, मॅग्नेशिअम, फॉस्फरस आणि फॉलिक अ‍ॅसिड हे खूप चांगल्या प्रमाणात असते. त्याचे सेवन केल्यास सर्व प्रकारचे त्वचा रोग, बद्घकोष्ठता, श्‍वसनाचे त्रास आदींपासून सुटका होते. त्याशिवाय बदामामध्ये ई जीवनसत्त्व अधिक प्रमाणात असते. त्यामुळे बदामाचा वापर अनेक सौदर्य प्रसाधनांमध्येही केला जातो. बदाम हा शक्तीशाली अँटिऑक्सिडंटदेखील आहे. एखादी व्यक्‍ती जर वजन कमी करू इच्छित असेल, तर बदामाचा फायदा होतो. एका अभ्यासानुसार आहारात नियमितपणे बदामाचे सेवन न करणार्‍या व्यक्‍तींच्या तुलनेत बदामाचे सेवन करणार्‍या व्यक्‍तींचे वजन तुलनेने वेगाने कमी होते. 

अक्रोड : अक्रोड हा शक्‍तीशाली अँटिऑक्सिडंट आहे आणि शरीरातील पेशींचा र्‍हास होण्यापासून बचाव करतो. अक्रोडचे नियमित सेवन केल्यास कर्करोगापासूनही बचाव होतो. त्याशिवाय अक्रोडमधील उपयुक्‍त घटकांमुळे हृदयाचे आजार आणि वाढत्या वयाची लक्षणे दूर राखण्यासाठीही बदाम उपयुक्‍त असतो. अक्रोडमध्ये कॅल्शिअम, लोह, फॉस्फरस, पोटॅशिअम, सोडियम, ए, बी आणि सी जीवनसत्त्व असते. अक्रोडचे सेवन केल्यास मेंदू आणि हाडांचे पोषण होते. त्याचबरोबर आतड्यांची कार्यक्षमताही चांगली राहते.

शेंगदाणा : शेंगदाण्यातही 22 टक्के अँटिऑक्सिडंट असते. त्याव्यतिरिक्‍त त्यामध्ये ई जीवनसत्त्व, फोलेट आणि मॅग्नेशिअमदेखील भरपूर प्रमाणात असते. वजन कमी करण्यासाठी शेंगदाणे सेवन करावेत. शेंगदाण्यांमुळे वजन कमी होण्याचा वेग वाढतो. शेंगदाण्यातील काही विशेष पोषक घटकांमुळे रोगप्रतिकारक क्षमतेत वाढ होते. त्याचबरोबर हृदयाशी निगडीत आजारांपासूनही बचाव होतो. शेंगदाणा हा प्रथिनांचा उत्तम स्रोत आहे. त्याचबरोबर शेंगदाण्यामध्ये ए, बी आणि सी जीवनसत्व, कॅल्शिअम, लोह आणि सोडियमदेखील असते. 

काजू : काजूमध्ये लोह, पोटॅशिअम, मॅग्नेशिअम आणि ए जीवनसत्त्व असते. लाल रक्‍तपेशींची निर्मिती करून अ‍ॅनिमिया दूर करण्यासही काजू उपयुक्‍त आहे. काजूचे सेवन केल्यास शरीराची रोगप्रतिकार क्षमताही वाढते. काजूचे सेवन केल्यास त्वचा स्वच्छ, नितळ होते. टाचांना पडलेल्या भेगांच्या समस्येवरही उपयुक्‍त ठरते. वाढत्या वयाच्या खुणा लपवण्याबरोबरच काजूमुळे त्वचा उजळही होते. काजू शरीरातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी करते आणि रक्‍तदाबही नियंत्रणात ठेवते. 

पिस्ता : पिस्त्यामध्ये फॉस्फोरस, कॉपर, पोटॅशिअम, सोडियम, मॅग्नेशिअम त्याचबरोबर ए, बी, सी आणि ई जीवनसत्त्व असते. त्यामुळे रक्‍त स्वच्छ करण्याचे काम केले जाते. त्याचबरोबर पिस्ता खाल्ल्यास यकृत आणि मूत्रपिंड दोन्हीसाठी खूप फायदा होतो. पिस्त्यामुळे सूर्याच्या अतिनील किरणांपासून त्वचेचे संरक्षण होते आणि वाढत्या वयाच्या खुणादेखील दूर करण्यास मदत होते. त्याचबरोबर त्वचेच्या अनेक समस्याही दूर होण्यास मदत होते. 

सुकामेवा आहारात सामील करताना बहुतांश लोक सुका मेवा थेट खाण्याला पसंती देतात. हा ज्याच्या त्याच्या आवडीचा भाग असतो. परंतु, सुका मेवा हा पदार्थांमध्ये घालूनही सेवन करता येऊ शकतो. आपल्याकडे विविध तिखट पदार्थ, गोड पक्वान्न केली जातात. त्यामध्ये सुका मेवा जरूर घालू शकता. बदामाचा वापर करताना डार्क चॉकलेट, ओटस्, पॅनकेकसारख्या कोणत्याही पदार्थांत बदाम घालू शकतो. बदाम सेवन करण्यापूर्वी तो पाण्यात भिजवून वापरावा. 

अक्रोडचे सेवन ओटस्मध्ये घालून आरामात करता येते. अक्रोडपासून बटर ज्याला वॉलनट बटर म्हणतात, ते तयार करू शकतो. त्यासाठी थोडे अक्रोड घ्यावेत, ते वाटून त्यात मध आणि दालचिनी पावडर वापरावी. 

शेंगदाण्याचे कूट करून सलाड वर घातले, तरीही रूचकर चव येते. अर्थात, सलाडची चव वाढवण्यासाठी शेंगदाण्याचे तेलही वापरू शकतो. वाफेवर भाज्या शिजवून घेतो. त्यात मूठभर शेंगदाणे घातले, तरीही त्याने चव छान येते. 

सुका मेवा खाण्याची योग्य वेळ : आहारातील कोणताही घटक सेवन करताना तो कोणत्या वेळी सेवन करतो, हेदेखील महत्त्वाचे असते. सुकामेवाही याला अपवाद नाही. तज्ज्ञांच्या मते, सुका मेव्याचा सर्वाधिक फायदा होतो ते सकाळच्या वेळेत सेवन केल्याने. न्याहारीमध्ये सुका मेव्याचे सेवन केल्यास दिवसभर ऊर्जा टिकून राहते. त्यामुळे शारीरिक अशक्‍तपणा दूर होतो, तसेच शरीरातील रक्‍तप्रवाह अधिक चांगला होतो. सकाळी सुक्या मेव्याचे सेवन केल्यास रक्‍तातून वाईट कोलेस्ट्रॉल अगदी सहजपणे काढून टाकले जाते. त्याचा फायदा हृदयाला होतो. बदामाचे सेवन सकाळच्या वेळेत करणे खूप जास्त फायदेशीर ठरते. काजू पचायला जड असतो. त्यामुळे काजूचे सेवन रात्री करू नये. रात्री काजू सेवन केल्यास पोट फुगल्याची भावना होते आणि झोपण्यास त्रास होऊ शकतो. 

प्रमाणही महत्त्वाचे- प्रत्येक गोष्टीमध्ये प्रमाण हे देखील महत्त्वाचे आहे. गरजेपेक्षा अधिक सेवन कोणत्याही गोष्टीचे करू नये, ते नुकसानकारकच असते. मूठभर सुका मेवा हे प्रमाणच योग्य आहे. त्यामुळे मूठभर सुका मेवा ही गोष्ट लक्षात ठेवावी. दिवसभरात केवळ एक मूठ सुका मेवाच सेवन केला पाहिजे. आहारतज्ज्ञांच्या मते यापेक्षा अधिक सुका मेव्याचे सेवन केल्यास रक्‍तातील शर्करेची पातळी वाढते. त्यामुळे अनेक समस्यांना आमंत्रणच मिळते. त्याशिवाय स्थूलतेने ग्रस्त लोकांनीही सुका मेव्याचे अतिसेवन करण्यापासून थोडे लांबच राहिले पाहिजे. एक मूठभर सुका मेवा दिवसभरात सेवन करू शकता. 

 

Back to top button