नवे वर्ष होवो आरोग्यदायी | पुढारी | पुढारी

नवे वर्ष होवो आरोग्यदायी | पुढारी

डॉ. मनोज कुंभार

नव्या वर्षाच्या आगमनाआधी अनेक संकल्प मनात रुंजी घालत असतात. नव्या नव्या संकल्पना पूर्ण करण्याच्या प्रयत्नात आपण असतो. अर्थात, हे सर्व संकल्प पूर्ण करण्यासाठी आपण धट्टेकट्टे असणे खूप महत्त्वाचे आहे. त्यासाठी शारीरिक तंदुरुस्तीकडे लक्ष देणे आवश्यक आहे. त्यामुळे नव्या वर्षातील सर्वच संकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी नियमित व्यायामाला सुरुवात करा आणि त्यावर पूर्ण वर्ष अंमलबजावणी करणेही आवश्यक आहे. 

नवीन वर्षाचे आगमन प्रत्येकाला एक नवीन संधी देणारे असते. त्यामुळेच प्रत्येकच जण काही ना काही संकल्प मनाशी ठरवत असतो. काही जण आयुष्यात सकारात्मकता आणण्याचा प्रयत्न करतात तर काही जण वाईट सवयी सोडण्याचा संकल्प करतात. काही जण नव्या सवयी, छंद जोपासतात; पण काही व्यक्ती मात्र या सर्वात गोंधळून जातात आणि नेमके काय करावे, हे त्यांना समजत नाही. काय केले म्हणजे शारीरिक, मानसिक आणि भावनात्मकदृष्ट्या आपण तंदुरुस्त राहू शकतो, हे त्यांना उमगत नसते. नव्या वर्षामध्ये बहुतांश लोक नवा संकल्प मनाशी ठरवतात. एका पाहणीनुसार जगातील 70 टक्के लोक वर्षाच्या सुरुवातीला नवा संकल्प मनाशी धरतात. त्यात आरोग्यविषयक संकल्पांचे प्रमाण अधिक असते. नव्या वर्षात वजन कमी करणे किंवा तंदुरुस्ती राखण्यासाठी प्रयत्न करणे आदींचा समावेश असतो. कारण, शरीर तंदुरुस्त आणि आरोग्यपूर्ण असेल तरच सर्व संकल्प तडीस जाऊ शकतात. 

त्यामुळेच या वर्षी आपणही शारीरिक तंदुरुस्तीकडे लक्ष देण्याचा विचार करत असाल तर काही गोष्टी मनाशी ठरवा आणि वाटचाल करा, वाटचाल नक्कीच सोपी होईल. 

जंक फूड-फास्ट फूड दूरच ठेवा : जीवनशैलीत बदल झाल्याने आहारातही बदल झालेले दिसून येतात. सध्याचे जग धावते आहे. त्यामुळे वेळेची कमतरता जाणवते. त्यामुळे घरच्या पदार्थांपेक्षा झटपट खाण्यासाठी तयार असलेल्या पदार्थांकडे लोकांचा ओढा वाढतो आहे. लोक ‘रेडी टू ईट’ पदार्थ किंवा इन्स्टंट फूड खाणे पसंत करतात. अशा आहारामुळे आरोग्य चांगले राहण्याऐवजी, पोषण मिळण्याऐवजी आरोग्यासाठी धोका वाढतोय. बाहेरील तयार पदार्थ किंवा झटपट खाता येणार्‍या पदार्थांमध्ये कॅलरीजचे प्रमाण अधिक असते; परंतु पोषक घटकांचे प्रमाण मात्र खूपच कमी असते. त्यामुळे शरीराचे पोषण होण्याऐवजी स्थूलता वाढीस लागते आणि आरोग्य समस्या निर्माण होतात. जंक फूडप्रेमी असाल तर यंदाच्या वर्षीपासून जंक फूड सेवन बंद करण्याचा संकल्प करा, ते शक्य नसल्यास किमान जंक फूड खाण्याचे प्रमाण कमी करण्याचा संकल्प करावा. 

वजनावर नियंत्रण : स्थूलता हा खरे तर आजार नाही; परंतु सध्या देशात स्थूलतेचे प्रमाण इतके जास्त आहे की, त्याकडे आजार म्हणूनच पाहावे लागते आहे. स्थूलता हा आजार नसला तरीही अनेक आजारांचे मूळ असते. स्थूलतेमुळे सुमारे 53 विकार जडू शकतात. स्थूलतेमुळे मधुमेह, हायपरटेन्शन, हार्ट फेल्युअर, अस्थमा, कोलेस्ट्रॉल, अतिघाम येणे, सांध्याच्या वेदना, वंधत्व आदींचा धोका असतो. या वर्षीच्या संकल्पात वजन जास्त असेल तर ते कमी करण्याचे प्रयत्न करावेत. योग्य वजन असेल तर ते वाढू न देता नियंत्रित ठेवण्याचे प्रयत्नही जरूर केले पाहिजेत. प्रत्येक व्यक्तीने तंदुरुस्त राहण्यासाठी नियमित व्यायाम करणे आवश्यक आहे. वजन कमी करण्यासाठी योग्य प्रमाणात आहार सेवन करावे, अधिक कॅलरीचे सेवन टाळावे. ज्या व्यक्ती तंदुरुस्त असतात, त्या कमी आजारी पडतात. त्यांची रोगप्रतिकार क्षमता आपोआपच चांगली राहते. 

गॅजेटचा वापर कमी : मोबाईल, लॅपटॉप याच्याशिवाय आयुष्याची कल्पनाही आता करता येत नाही. कारण, हे सर्व आयुष्याचे अविभाज्य अंग झाले आहेत. प्रत्येक व्यक्तीचा बहुतांश वेळ सध्या लॅपटॉप आणि त्याहीपेक्षा जास्त वेळ मोबाईलमध्ये जातो आहे. गॅजेट्सच्या अतिवापराचे दुष्परिणाम यावर अनेक संशोधनेही झालेली आहेत. त्यातून हेच स्पष्ट झाले की, ज्या व्यक्ती गॅजेट्सचा अतिवापर करतात, त्यांचा आजूबाजूच्या व्यक्तींशी असलेला संपर्क तुटतो. मेंदूतल्या तणावाची पातळी वाढत जाते. त्यामुळे व्यक्ती आक्रमक होते. ज्या व्यक्ती गॅजेट्सवर अधिकाधिक अवलंबून असतात, त्यांच्यामध्ये एकाग्रतेची समस्या निर्माण होते. अशा लोकांच्या सामाजिक, भावनिक समस्यांमध्येही वाढ होते. कारण, ते घरातच बसून आभासी जगात वावरत असतात. यापासून बचाव करण्यासाठी घराच्या बाहेर पडा. कुटुंब आणि मित्रांबरोबर वेळ घालवा. तसेच योग-व्यायाम नियमितपणे करा.

व्यायाम आणि योग या दोन्ही शरीर आणि मन स्वस्थ आणि संतुलित राखतात. नियमितपणे व्यायाम केल्यास शरीराची रोगप्रतिकारक क्षमता तंदुरुस्त राहते. व्यायाम हा रोगप्रतिकारक क्षमता चांगली राखण्याचा प्रभावी उपाय आहे. अर्थात, वर्कआऊट किंवा व्यायाम म्हटले की, जिममध्ये जाऊन घाम गाळणे, असेच बहुतेकांना वाटते; पण केवळ जिममध्ये जाणे म्हणजे व्यायाम किंवा शारीरिक हालचाल असे नाही. तर जो व्यायाम दिवसातून 30 मिनिटे सलग करू शकता, ज्यामध्ये हृदयाची गती वाढते, श्वसनाची गती वाढते, तसेच रक्तदाब वाढतो, असा कोणताही व्यायाम करावा; पण तो नियमितपणे करावा. 

व्यक्तीला एकाच प्रकारचा व्यायाम करून कंटाळा येऊ शकतो, मग तो करणे टाळण्याकडे कल असतो. अशा वेळी व्यायामाचे वेगळे प्रकार करून पाहू शकतो. सायकलिंग, एरोबिक्स, स्विमिंग, चालणे आणि योगाभ्यास तसेच विविध नृत्यप्रकारही आपण व्यायाम म्हणून करू शकतो. आवडीनुसार व्यायाम प्रकार निवडा किंवा अधूनमधून नेहमीच्या व्यायामात बदल म्हणूनही करू शकतो. महत्त्वाचे काय की नियमित व्यायाम केलाच पाहिजे. 

पुरेशी झोप : मेंदूचे कार्य नीटपणे चालण्यासाठी तसेच शरीर तंदुरुस्त राहण्यासाठी झोपेचे महत्त्व अमान्य करताच येणार नाही. शरीर आणि मेंदू यांचे कार्य योग्य प्रकारे चालण्यासाठी व्यक्तीला 6 ते 8 तास झोपेची आवश्यकता असते. पुरेशी झोप मिळावी, यासाठी शक्यतो आपल्या झोपेच्या वेळा नियमित कराव्यात. झोपण्या उठण्याची वेळ निश्चित असेल तर शरीराचे जैविक घड्याळ त्यानुसार जुळवून घेते. झोप अपुरी असेल तर रोगप्रतिकारक क्षमता कमजोर होते. त्यामुळे संसर्ग आणि आजारपण यांचा विळखा पडू शकतो. पचनसंस्था ही आरोग्याचा पाया असते; पण ती नीट चालण्याशी झोपेचा संबंध असतो. झोपणे आणि उठणे याचा आरोग्यावर परिणाम होत असतो. कॅफीनचे सेवन अतिप्रमाणात करू नये. कारण गाढ आणि शांत झोप लागण्यात अडथळा निर्माण होतो. 

तणाव नको : ताणतणाव हे सध्याच्या जीवनशैलीचा अविभाज्य भाग असले तरीही मानसिक आणि भावनिक आरोग्यावर तणावाचा परिणाम होतोच. तणावामुळे आरोग्य खराब होते. कारण शरीरातील काही हार्मोन्सचे प्रमाण वाढते. तणावामुळे हृदयाची धडधड वाढते, पचन क्रिया मंदावेत. रक्ताभिसरणावरही त्याचा परिणाम होतो. चेतासंस्थेची कार्यप्रणालीतही गडबड होते. तसे रोगप्रतिकारक क्षमताही कमी होते, अशा समस्या निर्माण होऊ शकतात. एखादी व्यक्ती सातत्याने तणावग्रस्त राहत असेल तर मधुमेह, केस गळणे, हृदयरोग, स्थूलता, अल्सर तसेच लैंगिक अकार्यक्षमता आदी समस्या भेडसावू शकतात. त्यामुळे तणाव दूर करण्याचा, तणाव दूर ठेवण्याचा शक्य तितका प्रयत्न केला पाहिजे. तणाव दूर करण्यासाठी समाजात मिसळा. लोकांमध्ये वावरा. खूप गरज असल्यास सायकॅट्रिस्टच्या मदतीने उपचार करून घ्यावेत. 

शरीराची लक्षणे : शरीरात काहीही बदल झाल्यास किंवा काही भावना पहिल्यांदा जाणवत असल्यास, हे बदल भावना नेहमीसारख्या नसून असामान्य असतील, ज्याचे कारण समजत नसेल तर त्वरित डॉक्टरांकडे धाव घ्यावी. व्यक्तीचे वय अधिक असेल, त्याला पहिल्यांदाच पित्ताचा त्रास होत असेल, दम लागत असेल किंवा छातीत वेदना होत असतील तर तपासणी करण्यास वेळ लावू नये. ही सर्व लक्षणे हृदयाच्या आजाराची निगडित असू शकतात. अचानक दम लागत असेल तर अस्थमा आहे का, त्याची तपासणी करून घ्यावी. झोप खूप जास्त किंवा कमी येत असेल, भूक जास्त किंवा कमी लागत असेल. सतत मनोवस्थेत बदल होत असेल तर मानसोपचार तज्ज्ञांची भेट घ्यावी. तसेच खूप जास्त शारीरिक थकवा जाणवत असेल आणि सतत चक्कर येत असेल तर त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधून आवश्यक त्या तपासण्या करून घ्याव्यात. थोडक्यात नव्या वर्षाचे संकल्प केवळ मनात न ठेवता ते प्रत्यक्षात आणण्यासाठी सकारात्मकतेने वाटचाल आवश्यक आहे. मनाची उभारी आणि शारीरिक व्यायाम या सर्वांनी या गोष्टी जरूर साधता येतील. त्यामुळे शरीराचा आणि मनाचाही आवाज ऐका आणि योग्य वेळी प्रतिसाद द्या त्यामुळे आरोग्य निश्चित चांगले राहते. 

Back to top button