हार्मोन्समधील असंतुलन, वाढती समस्या | पुढारी | पुढारी

हार्मोन्समधील असंतुलन, वाढती समस्या | पुढारी

डॉ. आनंद ओक

हार्मोन्स बिघाडामुळे ज्या संस्था अथवा अवयवांचे कार्य बिघडले असेल त्यानुसार औषधी योजना करावी लागते. हार्मोन्समधील बिघाड हा झाला त्या कारणांचा वेध घेऊन दुरुस्त करणे, हार्मोन बिघाडाच्या दुष्परिणामी ज्या संस्थांच्या (अवयवांच्या) कार्यात दोष उत्पन्‍न झाला असेल तो दोष बरा करणारे उपचार करणे, संबंधित शरीरसंस्थांची प्रतिकारशक्‍ती, कार्यक्षमता वाढविणे असे त्यांचे स्वरूप असते. 

हल्ली अनेकवेळा होणार्‍या त्रासाचे कारण ‘हार्मोन्स’ बिघडले आहेत असे सांगितले जाते. या हार्मोन्सची माहिती घेऊ.

हार्मोन्स म्हणजे नक्‍की काय?

मानवी शरीर हे अनेक संस्थांनी बनलेले आहे. या विविध शरीर संस्थांचे ‘नियंत्रण’ दोन संस्था करत असतात. एक म्हणजे मज्जासंस्था (मेंदू, मज्जारज्जू इ.) आणि दुसरी म्हणजे अंतस्रावी ग्रंथी संस्था म्हणजेच ‘एंडोक्राईन सिस्टीम’ या ग्रंथीमधील स्रावांचे स्रवण सरळ रक्‍तामध्ये होत असल्याने या ग्रंथींना ‘अंतस्रावी ग्रंथी’ म्हटले जाते.

अशा अंत:स्रावी ग्रंथीच्या स्रावामधील जे रासायनिक पदार्थ रक्‍तातून संपूर्ण शरीरात फिरत असताना शरीरातील दुसर्‍या अवयवावर परिणाम करून अनेक गोष्टींचे नियंत्रण करीत असतात, अशा पदार्थांना ‘हार्मोन्स’ असे म्हटले जाते. शरीरातील विविध पेशींची व संस्थाची वाढ, पुनरुत्पत्ती. चयापचय क्रिया यांना मार्गदर्शन आणि त्यांचे नियंत्रण करून त्यांच्या परस्परक्रियात संतुलन ठेवण्याचे काम हार्मोन्स करत असतात. शरीरातील विविध द्रवस्वरूप पदार्थांच्या घटकांच्या नियमनाचे कामही हार्मोन्स करत असतात.

थोडक्यात असंतःस्रावी ग्रंथीमध्ये तयार होणारे रक्‍तातील जे पदार्थ शरीरातील विशेषतः हळूहळू चालणार्‍या अथवा टप्प्याने चालणार्‍या क्रिया नियंत्रण करत असतात त्यांना ‘हार्मोन्स’ म्हणतात.

हार्मोन्स कसे बिघडतात?

हार्मोन्स ज्या ग्रंथीमधून तयार होतात त्या ग्रंथीने हा स्राव कमी करणे अथवा प्रमाणापेक्षा अधिक करणे यामुळे हार्मोन्सच्या प्रमाणात असंतुलन उत्पन्‍न होते. अंतःस्रावी ग्रंथीत बिघाड होणे किंवा काही वेळा इतर हार्मोन्सचे कार्य बिघडणे किंवा संबंधित इतर दुसर्‍या अंतस्रावी ग्रंथीच्या बिघाडच्या दुष्परिणामी हे घडत असते.

1) अंत:स्रावी ग्रंथीलाच विकार होणे उदा. सूज येणे, कॅन्सरचा प्रादुर्भाव इ.

2) हार्मोन्स तयार करण्यासठी लागणार्‍या आवश्यक घटकांची कमतरता, उदा. आयोडिन कमी पडल्यामुळे होणारा गॉयटर.

3) अंतःस्रावी ग्रंथी नियंत्रित करणार्‍या दुसर्‍या ग्रंथीमध्ये दोष उत्पन्‍न होणे. उदा. पिच्युटरी या ग्रंथीचे कार्य वाढल्याने त्याच्या परिणामी हायपर थायरॉईडीझम होतो.

4) अंत:स्रावी ग्रंथीला प्रमाणापेक्षा जास्त काम पडल्यामुळे उदा. अति गोड पदार्थ खाल्ल्याने साखरेचे   नियंत्रण करणार्‍या स्वादुपिंडावर ताण येऊन डायबेटीस म्हणजेच मधुमेह होतो.

5) कोणत्याही कारणाने उदा. मानसिक तणाव, चिंता, काळजी, अति शारीरिक ताण इ. मुळे मज्जासंस्थेत बिघाड झाल्याने हार्मोन्सचे कार्य बिघडते.

6) जन्मत: दोष असणेमुळेही काही वेळा अंत:स्रावी ग्रंथीत बिघाड उत्पन्‍न होत असतो. उदा. अनुवंशिकतेने होणार डायबेटीस अथवा हायपोथायरॉईडीझमचे काही प्रकार.

हार्मोन्सचे कामकाज –

शरीरातील अनेक क्रियांशी हार्मोन्सचा संबंध येत असतो. मुख्यत: विचार केल्यास शरीराची योग्य वाढ करणे, हाडांची वाढ करणे, उंची वाढण्याची प्रक्रिया, शरीरातील विविध चयापचय क्रिया नियंत्रित करणे, स्त्री-पुरुषांतील जननेंद्रियांची वाढ, लैंगिक अवयवांची योग्य वाढ करणे, स्त्री बीज उत्पत्ती क्रिया, शुक्रजंतूंची उत्पत्ती, वयात येताना होणार्‍या बदलांचे नियंत्रण, स्तनांची वाढ, स्त्रियांमध्ये मासिक पाळींची अनियमितता, गर्भधारणा, गर्भाची वाढ, स्तनामधील दुधाची निर्मिती, या गोष्टींचे नियंत्रण, रक्‍तदाबाचे नियंत्रण करणे, शरीरातील जादा चरबीचे नियमन करणे, हृदयप्रक्रिया, श्‍वासोच्छ्वासाचे नियंत्रण, किडनीचे कार्य, यांचेही नियंत्रण हार्मोन्स करतात.

थायरॉईड ग्रंथीच्या हार्मोन्समुळे ऊर्जानिर्मिती, कोलेस्ट्रॉलचे नियंत्रण, किडनीचे लघवी उत्पन्‍न करण्याचे कार्य वाढवणे, स्नायूंची कार्यक्षमता, उत्साह, चपळपणा, शरीराची वाढ ही कार्ये होत असतात.

स्वादुपिंडामधील इन्सूलीन, हार्मोनमुळे रक्‍तातील साखरेचे नियंत्रण होत असते. पॅराथायरॉईड हार्मोन मुख्यत: कॅल्शियमचे नियंत्रण करतो.

भुकेची निर्मिती, पचनक्रिया, आतड्यांची हालचाल, मलमुत्रांचे उत्सर्जन, हृदयाची गती, रक्‍ताभिसरण, प्रोस्टेट ग्रंथीची वाढ अशा अनेक क्रियांच्या सुरळीत होण्यासाठी अथवा नियंत्रणासाठी हार्मोन्सचे संतुलीत कार्याची आवश्यकता असते.

हार्मोन्स बिघडल्यानंतर…

काही विकारांमध्ये हार्मोन्समधील बिघाड हे अनेकदा मुख्य कारण असते. चेहर्‍यावरील पिंपल्स, चेहर्‍यावरील डाग, केस गळणे, चेहर्‍यावरील केसांची जास्त वाढ, स्तनाची वाढ खुंटणे, स्थूलपणा, वजन वाढणे, अतिकृशपणा, उंची कमी राहणे, अंगावर सूज, सर्वांगात वेदना, भूक न लागणे, प्रोटेस्ट वाढणे, वंध्यत्व म्हणजेच गर्भधारणा न होणे, मासिक पाळी न येणे, उशिरा येणे, मासिक स्राव कमी होणे, स्त्री बीज तयार न होणे, शुक्रजंतू कमी असणे अथवा पूर्ण नसणे, मेनोपॉजमधील तक्रारी, झोप न लागणे, अस्वस्थपणा, चिडचिडेपणा, कॅल्शियम कमी पडणे, हाडे दुखणे, छातीत धडधड, भीती वाटणे, अति घाम येणे, अति भूक लागणे, रक्‍तातील साखर वाढणे, डायबेटीस, अगदी कमी जेवूनसुद्धा चरबी वाढणे, रक्‍तदाब वाढणे किंवा कमी होणे, ‘लो बीपी’, पायाला गोळे येणे, कामाला अजिबात उत्साह न वाटणे, संभोग इच्छा कमी होणे, क्षमता अथवा स्टॅमिना कमी पडणे, कमजोरी, शरीराची वाढ कमी होणे, गर्भाशयातील दोष यांसारखे विकार अथवा तक्रारी मुख्यत्वाने आढळतात.

आयुर्वेदिक उपचार…

हार्मोन्स बिघाडाचे निदान झाल्यानंतर आयुर्वेदिक उपचार करताना मुख्यतः 3 सूत्रे वापरावी लागतात. हार्मोन्समधील बिघाड हा झाला असावा त्या कारणांचा वेध घेऊन दुरुस्त करणे, हार्मोन बिघाडाच्या दुष्परिणामी ज्या संस्थांच्या (अवयवांच्या) कार्यात दोष उत्पन्‍न झाला असेल तो दोष बरा करणारे उपचार करणे, संबंधित शरीरसंस्थांची प्रतिकारशक्‍ती, कार्यक्षमता वाढविणे असे त्यांचे स्वरूप असते. अनेकदा हार्मोन्स असंतुलन झाल्याचे मुख्य कारण वाढलेला शारीरिक अथवा मानसिक तणाव असल्याचे आढळून येते. हार्मोन्स बिघाडाच्या उपचारात ‘तणावनियंत्रण’ या गोष्टीलाही अनन्यसाधारण महत्त्व आहे. हार्मोन्स विकारांवर उपचार करताना शरीरात दोषांची शुद्धी करण्यासाठी आवश्यक पंचकर्म उपचार, विविध संयुक्‍त औषधे, आहार पथ्यपालन आणि योगा व प्राणायाम अशा सांधिक उपचारांचा अवलंब केला जातो. रुग्णांच्या संपूर्ण अष्टविध परीक्षा करून हे उपचार ठरविले जातात.

पंचकर्म :

औषधी तेलाने डोक्याला, सर्व अंगाला शास्त्रीय मसाज, औषधी काढ्याच्या वाफेने शेक, आवश्यकतेप्रमाणे बस्ती, विरेचन, नस्य इ. उपचार केले जातत. तणाव नियंत्रणासाठी शिरोधारा, शिरोबस्ती यांचा उपयोग केला जातो. अर्थात हे पंचकर्म उपचार आयुर्वेद तज्ज्ञाकडून घेणेही महत्त्वाचे असते. यामुळे शरीरशुद्धी झाल्याने आश्‍चर्यकारक फायदा होतो.

औषधोपचार –

हार्मोन्स बिघाडामुळे ज्या संस्था अथवा अवयवांचे कार्य बिघडले असेल त्यानुसार औषधी योजना करावी लागते. कोणत्या हार्मोन्समध्ये बिघाड असेल त्यानुसार वेगवेगळी औषधे वापरली जातात. उदा. हायपोथायरॉईडच्या विकारात त्रिकुट, पुनर्नवा, गोरुख, दारुहरीद्रा, निंब, कुटकी, कुंभा, अर्जुन, गुग्गुळ, असणा, वंग, मंडुर, तामभस्म, शिलाजीत इ. पासून केलेली औषधे वापरली जातत. डायबेटीस कंट्रोल होत नसल्यास हरीद्रा, दारुहरीद्रा, आमलकी, असणा, गुडमार, नीम, गुडुची, मामेजवा इत्यादीची औषधे वापरावी लागतात. प्रत्येक हार्मोन्स बिघाडावर औषधे वेगवेगळी वापरावी लागतात. अर्थात ही आयुर्वेदिक औषधे उत्तम आणि अधिक सुरक्षित असल्याचे जगभरात आढळून येत आहे.

 

Back to top button