शिंक रोखू नका | पुढारी | पुढारी

शिंक रोखू नका | पुढारी

हिवाळ्यात सर्दी होणे ही काही विशेष गोष्ट नाही. हवेत गारवा आल्यामुळे सर्दी होते, पर्यायाने शिंका येतात. त्यामुळे आपल्या आजूबाजूला अनेक लोक शिंकताना, नाक पुसताना दिसून येतात. मुळातच शिंका येत असतील तेव्हा व्यक्‍तीला अस्वस्थता येते. शिंका येणे ही नैसर्गिक बाब असली तरीही काही वेळा मात्र नैसर्गिक शिंकेला रोखण्याचे प्रयत्न केले जातात. आपण एखाद्या अशा ठिकाणी असतो जिथे शिंकणे योग्य दिसत नाही जसे एखाद्या महत्त्वाच्या व्यावसायिक बैठकीत असताना शिंक आली तर ती रोखण्याचा प्रयत्न करावा लागतो;

परंतु शिंक थांबवणे ही गोष्ट धोकादायकही ठरू शकते. येणारी शिंक थांबवल्यामुळे कानाबरोबरच मेंदू, मान आणि स्वरकोशाच्या डायफ्रेम किंवा पातळ पडद्यावर परिणाम होतो जेव्हा आपण शिंकतो तेव्हा आपल्या नाकातून सुमारे 160 किलोमीटर प्रति तास वेगाने हवा बाहेर पडत असते. एवढ्या वेगाने बाहेर पडणार्‍या हवेला रोखण्याचा प्रयत्न केल्यास त्याचा कानावर दबाव पडतो. हवेच्या या दाबामुळे कानाचा पडदा फाटू शकतो. त्यामुळे बहिरेपणही येऊ शकते. अनेकदा हवेचा हा दाब मेंदूपर्यंत पोहोचू शकतो आणि ही गोष्ट मेंदूच्या नसांसाठी घातक ठरू शकते. शिंक येणे थांबवल्याने मेंदूच्या नसा फाटू शकतात. अशा काही घटना घडलेल्या आहेत. एवढेच नव्हे तर शिंक आल्यामुळे नाकाची नैसर्गिकरीत्या स्वच्छताही होत असते. श्‍वासनलिकेतून हानिकारक जीवाणू बाहेर टाकण्याचे कामही शिंक आल्याने होते. शिंक येणे रोखल्यास या स्वाभाविक प्रक्रियेत अडथळा निर्माण होतो.. 

शरयू वर्तक

 

Back to top button