गाऊट आणि आयुर्वेद | पुढारी | पुढारी

गाऊट आणि आयुर्वेद | पुढारी

वैद्य खडीवाले

दिवसेंदिवस मानवी शरीरात विविध वात विकारांनी तर्‍हेतर्‍हेचे आक्रमण केले आहे. सांधेदुखी, कंबरदुखी, विविध सांध्यांची सूज त्यामुळे हालचाल मंदावणे, सायटिका, फ्रोजन शोल्डर, टाच दुखणे असे खूप वातविकारग्रस्त रुग्ण रोजच भेटतात. पण, जेव्हा एखादा रुग्ण ‘गाऊट’ या नावाचा उच्चार करून सोबत युरिक अ‍ॅसिडचे रिपोर्ट घेऊन येतो, त्यावेळी मी प्रथम त्या रुग्णाच्या पावलाला, पोटरीला, गुडघ्याला स्पर्श करून ती जागा फाजील उष्णतेची आहे का यांचा मागोवा घेतो. एक काळ गाऊट विकाराचा संबंध महारोगाशी जोडला जात असे; पण आता तसे वैद्यक व्यावसायिक मानत नाहीत. हे संंबंधित रुग्णांचे सुदैवच मानले पाहिजे. रुग्णाचे लघवीचे रिपोर्ट पाहिल्यानंतर युरिक अ‍ॅसिडचे प्रमाण 6.5 ते 7 चे पेक्षा जास्त असल्यास मागेपुढे न पाहता पुढील औषध योजना लगेच करावी लागते. अशा रुग्णांना पुढील औषध योजना आठ-पंधरा दिवसांत ते जास्तीत जास्त एक महिन्यात गुण देते, ही खात्री बाळगावी. 

गोक्षुरादि गुग्गुळ आणि चंदनादिवटी प्र. 6 गोळ्या, चंद्रप्रभा 3 गोळ्या, रसायनचूर्ण 1 चमचा आणि उपळसरी चूर्ण 1/2 चमचा असे बारीक करून साध्या पाण्याबरोबर दोन वेळा घ्यावे. भरपूर पाणी प्यावे. घरात चंदनाचे खोड असल्यास चंदनखोड उगाळून त्याचे गंध पाण्याबरोबर घ्यावे. नारळपाणी घ्यावे. कटाक्षाने पेनकिलर किंवा वेदनाशामक औषधे टाळावीत. बाह्योपचारार्थ चंदनबला लाक्षादितेल वापरावे. तसेच महानारायण तेल किंचा गवती चहा अर्कयुक्‍त महानारायण तेल यांचाही प्रभावी वापर करता येतो. 

विशेष दक्षता आणि विहार : या रुग्णांनी फिरण्याचा पुरेसा व्यायाम अत्यावश्यक आहे. नुसते झोपून राहू नये. 
पथ्य : बिनमिठाच्या उकडलेल्या दुध्याभोपळा, पडवळ, दोडका, घोसाळे, कोहळा अशा फळभाज्या आहारात समाविष्ट कराव्यात. चाकवत, लालमाठ, राजगिरा अशा काडीनकाडी स्वच्छ धुतलेल्या पालेभाज्याही खाव्यात. याखेरीज एक चमचा धणेे ठेचून रात्री भिजत घालावेत व सकाळी चावून खावेत. पुन्हा तसेच सकाळी भिजवून रात्री खावेत. तेच भिजवलेले पाणी पिणे. चंदनखोड उगाळून गंध घेणे.
कुपथ्य : खूप खारट, आंबट, तिखट, मिरची मसालायुक्‍त पदार्थ, मेवामिठाई मांसाहार शिळे अन्‍न, हॉटेलमधली शंकास्पद जेवणे, चहा इत्यादी कटाक्षाने टाळावे. 
योग्य आणि व्यायाम : माफक व्यायाम, अन्‍न पचनाकरिता आणि पोटात गॅस धरू नये म्हणून पुरेसे फिरणे. सकाळी आणि रात्रीच्या जेवणानंतर कटाक्षाने असावे. 
रुग्णालयीन उपचार : तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली दशांगलेप; फार गरम नाही असा दोषघ्य लेप किंवा खूपच आवश्यक असल्यास जळवा लावणे, टाकणखार पोटीस. 
चिकित्साकाळ : या रुग्णांसाठीचा चिकित्साकाळ एक ते दोन आठवडे इतका आहे. 
निसर्गोपचार : सात्विक आहार, गुरजेपुरते फिरणे, शक्य तेवढी विश्रांती घेणे, मलमुत्रादी नैसर्गिक वेग न अडविणे.

याखेरीज दिवसा किमान तीन वेळा विनासायास खळखळून लघवी होईल अशाकरिता गोखरुचा ताजा काढा दिवसातून एक वेळ घ्यावा.
संकीर्ण : गाऊट या विकारात नेहमीच संधिवाताकरिता लगेच गुण देणारी ‘स्ट्राँग’ औषधे कदापि वापरू नयेत. त्यामुळे रुग्णाचे नुकसानच होत असते. आयुर्वेदातही सिंहनाद गुग्गुळासारखी खूप उष्ण औषधे आहेत, ती कटाक्षाने टाळावीत. गोक्षुरादि गुग्गुळचे प्रमाण वाढविल्याने आणि त्यास रसायनचूर्णाची अधिक जोड दिल्यास रुग्ण लवकर रोगमुक्‍त होतो.  

 

Back to top button