निरोगी जीवनशैली हीच गुरुकिल्‍ली | पुढारी | पुढारी

निरोगी जीवनशैली हीच गुरुकिल्‍ली | पुढारी

डॉ. अमेय उदयवार

हृदय आणि धमन्यांशी संबंधित आजार म्हणजे कार्डिओव्हॅस्क्युलर डिसिझेस (उतऊ). एका अभ्यासानुसार, 1990 मध्ये देशामध्ये सीव्हीडीचे प्रमाण 1.3 दशलक्ष इतके होते, जे 2016 पर्यंत 2.8 दशलक्षांपर्यंत पोहोचले आहे. गेल्या तीन दशकांमध्ये ही संख्या दुपटीने वाढली आहे. 1990 मध्ये हृदयाशी संबंधित दुखण्यांमुळे होणार्‍या मृत्यूंचे प्रमाण 15 टक्के होते, जे 2016 मध्ये वाढून 28 टक्क्यांवर पोहोचल्याचे आणखी एका अहवालात म्हटले गेले आहे. 

कार्डिअ‍ॅक अरेस्ट हा हृदयाचा एक गंभीर आजार आहे. जेव्हा हृदयाचे कार्य अचानकपणे बंद होते आणि हृदयाचे ठोके थांबतात, तेव्हा त्याला ‘सडन कार्डिअ‍ॅक अरेस्ट’ असे म्हणतात. साधारणपणे हृदयातील विद्युतप्रवाहांमध्ये काही अडथळा निर्माण झाल्यामुळे हृदयाच्या आकुंचन प्रसरण पावण्याच्या क्रियेत बाधा येते आणि त्यामुळे रक्‍त शरीराकडे प्रवाहित होण्याचे काम बंद होते. ही विद्युतप्रवाह यंत्रणाच हृदयाच्या ठोक्यांचा वेग आणि लय यावर नियंत्रण ठेवत असते. त्या यंत्रणेत काही बिघाड झाला तर हृदयाचे ठोके अतिजलद किंवा अतिमंद होऊ शकतात किंवा अनियमित होऊ शकतात. बरेचदा ही स्थिती थोड्या वेळापुरती आणि निरुपद्रवी असते, मात्र तिचे काही प्रकार आकस्मिक कार्डिअ‍ॅक अरेस्टला कारणीभूत ठरू शकतात.

हृदयरोगाचा कोणताही पूर्वेतिहास नसलेल्या व्यक्‍तींच्या बाबतीतही आकस्मिक कार्डिअ‍ॅक अरेस्टची स्थिती उद्भवू शकते. हा बहुधा पूर्वीपासून असलेल्या आणि कदाचित दुर्लक्षित राहिलेल्या हृदयरोगामुळे बळावू शकतो. ताबडतोब उपचार न झाल्यास आकस्मिक कार्डिअ‍ॅक अरेस्टमुळे मृत्यू ओढावू शकतो. वेगाने आणि योग्य ती वैद्यकीय देखभाल मिळाल्यास प्राण वाचू शकतात.

उपचाराचे संभाव्य पर्याय

तुम्हाला छातीत दुखल्यासारखे जाणवत असेल किंवा अस्वस्थता वाटत असेल, हृदयाची धडधड वाढली असेल, हृदयाचे ठोके जलद किंवा अनियमितपणे पडत असतील, कारणाशिवाय छातीतून घरघर ऐकू येत असेल, श्‍वास पुरत नसेल, डोके हलके झाल्यासारखे किंवा भोवळ आल्यासारखे वाटत असेल तर तत्काळ आपल्या डॉक्टरांची भेट घ्या. जेव्हा हृदयक्रिया बंद पडते तेव्हा शरीराला ऑक्सिजनयुक्‍त रक्‍तपुरवठा न झाल्याने अवघ्या काही मिनिटांत मृत्यू ओढावू शकतो किंवा मेंदूची अपरिमित हानी होऊ शकते. म्हणूनच बेशुद्धावस्थेत गेलेल्या एखाद्या व्यक्‍तीचा श्‍वासोच्छ्वास थांबल्याचे आढळून आल्यास अशा व्यक्‍तीची मदत करताना थोडाही वेळ न दवडणे अत्यंत महत्त्वाचे असते. 

अशा स्थितीमध्ये व्यक्‍तीच्या छातीवर मिनिटाला 100 ते 120 कम्प्रेशन्स या गतीने जोरात आणि वेगाने दाब देऊन कृत्रिम श्‍वासोच्छ्वास द्यावा. शक्यतो तत्काळ वैद्यकीय उपचार उपलब्ध करावेत.

कार्डिअ‍ॅक अरेस्ट आणि हार्टअ‍ॅटॅकमध्ये फरक

बरेचदा कार्डिअ‍ॅक अरेस्ट आणि हार्टअ‍ॅटॅक हे एकच असल्याचे मानले जाते, मात्र या दोन्ही भिन्‍न स्थिती असून त्यातील फरक समजून घेणे महत्त्वाचे आहे. हार्टअ‍ॅटॅक किंवा हृदयविकाराचा झटका हे कार्डिअ‍ॅक अरेस्टला कारणीभूत ठरणार्‍या अनेक कारणांपैकी केवळ एक कारण आहे. हार्टअ‍ॅटॅक येत असताना रुग्णाच्या हृदयाची रक्‍ताभिसरणाची क्षमता केवळ काही प्रमाणात कमी होते व पहिल्या तासाभरामध्ये वैद्यकीय मदत मिळेपर्यंत कमी कार्यक्षमतेने का होईना पण हृदय काम करत राहते. 

नियमित तपासण्या, हृदयविकाराची शक्यता तपासण्यासाठी स्क्रीनिंग्ज करून घेणे आणि हृदयाचे आरोग्य जपणारी जीवनशैली स्वीकारणे यामुळे आकस्मिक कार्डिअ‍ॅक अरेस्टचा धोका कमी होऊ शकतो. हृदयाच्या दुखण्याचे अधिक चांगले व्यवस्थापन करण्याठी डॉक्टर्स जीवनशैलीतील काही बदल सुचवतात, ज्यांत धूम्रपान सोडून देणे, वजन संतुलित राखणे, हृदयाचे आरोग्य जपणारा आहार घेणे, शारीरिकद‍ृष्ट्या सक्रिय राहणे आणि मनावरील ताण कमी करणे या उपाययोजनांचा समावेश होतो.

 

Back to top button