वायू प्रदूषण आणि मिठाची उपचार पद्धती | पुढारी

वायू प्रदूषण आणि मिठाची उपचार पद्धती

प्रदूषित हवेच्या संपर्कामुळे व्यक्तीच्या आरोग्यावर बरेच घातक परिणाम होऊ शकतात. यामुळे अ‍ॅलर्जी, दमा, क्रोनिक ऑब्स्ट्रॅक्टिव्ह पल्मनरी डिसीज (सीओपीडी) आणि ब्रॉन्कायटिस असे आजार होऊ शकतात. स्टेट ऑफ ग्लोबल एअर रिपोर्ट 2019 च्या सर्वेक्षणाच्या मते वायू प्रदूषण हा जगभरातील मृत्यूंसाठी पाचवा धोकादायक घटक आहे. कुपोषण, मद्यप्राशन आणि शारीरिक व्यायामाचा अभाव यापेक्षाही वायू प्रदूषण घातक असल्याचे मानले जाते. दरवर्षी रस्त्यावरील अपघातांमध्ये झालेल्या दुखापती किंवा मलेरियाच्या तुलनेत वायू प्रदूषणासंबंधी आजारांमुळे अनेक लोकांचा मृत्यू होत आहे.

तापमानामध्ये घट आणि झपाट्याने वाढत असलेल्या प्रदूषणामुळे शहराच्या विविध भागांमध्ये श्वसनविषयक आजार असलेल्या रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ होत आहे. वायू प्रदूषणापासून रक्षणासाठी मास्क परिधान करण्यासोबत जास्त प्रदूषित भागांमध्ये राहणारे लोक घरगुती उपायदेखील करू शकतात. हे उपाय त्यांच्या शरीरामध्ये प्रवेश करणार्‍या प्रदूषकांचे निराकरण करण्यासाठी दीर्घकाळापर्यंत गुणकारी ठरू शकतात. श्वसन संस्था व त्वचेमधील रक्तसंचय, सूज व अ‍ॅलर्जी अशा लक्षणांपासून आराम मिळण्यासाठी सर्वात गुणकारी, पूर्णत: नैसर्गिक, नॉन-इन्व्हेसिव्ह आणि औषधमुक्त उपचार म्हणजे सॉल्ट थेरपी, जी हॅलो थेरपी म्हणूनदेखील ओळखली जाते. हॅलो थेरपीदरम्यान चेंबरमध्ये मायक्रोनाईज्ड कोरडे मीठ ठेवले जाते, ज्यामुळे चेंबरमध्ये मीठयुक्त वातावरण निर्माण होते. संशोधनानुसार निदर्शनास आले आहे की, हॅलोचे दाहकविरोधी परिणाम आहेत आणि ही थेरपी ब्रॉन्कायल दमा, ब्रॉन्कायटिस व सीओपीडीच्या लक्षणांवर गुणकारी ठरते.

मीठयुक्त हवेचे श्वसन केल्याने श्वसनमार्ग मोकळा होतो आणि श्लेष्मा कमी होत श्वसन करणे सुलभ होते. तसेच संसर्गाचा धोकादेखील कमी होतो आणि आराम मिळतो. संशोधनातून सिद्ध झाले आहे की, सॉल्ट थेरपीज श्वसन संस्थेचे कार्य सुधारण्यामध्ये मदत करतात आणि रुग्णांमधील रोगप्रतिकार शक्तीमध्ये वाढ करतात. श्वसनविषयक आजार असलेल्या रुग्णांसाठी ही थेरपी अत्यंत गुणकारी आहे. दमा, ब्रॉन्कायटिस, अ‍ॅलर्जी व सीओपीडी अशा श्वसनविषयक गंभीर आजारांनी पीडित रुग्णांसाठी मीठ हा नैसर्गिक उपचार आहे. मिठामध्ये अनेक गुणकारी लाभ आहेत आणि घरामध्ये मिठाचा अनेक पद्धतीने उपयोग करता येऊ शकतो. यापैकी काही पद्धती म्हणजे मिठाच्या पाण्याची वाफ घेणे किंवा मिठाच्या पाण्याने गुळण्या करणे.

प्रौढ व्यक्तींसह लहान मुलांनादेखील सॉल्ट थेरपीचे लाभ होतात. ही थेरपी एकूण आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी आहे. या थेरपीमुळे श्वसन संस्थेमधील घातक घटक दूर होतात, त्वचेचे कार्य व स्थिती सुधारते आणि रोगप्रतिकार शक्ती वाढते. श्वसन संस्थेच्या सामान्य आरोग्यासाठी घरामध्ये आठवड्यातून एकदा किंवा दोनदा सॉल्ट थेरपीचा उपयोग केल्यास फुफ्फुसाची कार्यक्षमता वाढू शकते, रोगप्रतिकार शक्ती वाढू शकते, तणाव दूर होऊ शकतो आणि पुरेशी झोप मिळण्यामध्ये मदत होऊ शकते.

वायू प्रदूषण फक्त घराबाहेरच होते असे नाही, घरामध्ये देखील वायू प्रदूषण होत असते. घरामध्ये होणारे वायू प्रदूषण हे बाहेरील वायू प्रदूषणापेक्षा अधिक घातक असते. घरामध्ये नियमितपणे सॉल्ट थेरपीचा उपयोग हा उत्तम श्वसनासाठी आणि जीवनाचा दर्जा सुधारण्यासाठी उत्तम मार्ग आहे.

Back to top button