आहार आणि शरीराचा अन्योन्य संबंध | पुढारी

आहार आणि शरीराचा अन्योन्य संबंध

मयुरा अ. जाधव वाचस्पतीविधिज्ञ

उत्तम वाढीसाठी, भरपूर श्रम करण्यासाठी, निरोगी राहण्यासाठी चांगल्या व सकस अन्‍नाची गरज असते. यात पदार्थाचा रंग, पोत, चव व आकार यालाही महत्त्व आहे. जसे की पांढरा भात, हिरवी पालेभाजी, पिवळसर फळभाजी, लाल बीट हे रंग दर्शवितात. तर मऊ भात, घट्ट पालेभाजी, पातळ वरण, कुरकुरीत पापड हे त्याचे विशेष दर्शवितात.नेहमी आढळून येणार्‍या आजारांमध्ये अपुरा व निकस आहार हेच कारण आहे.

शरीरेन्द्रिय सत्वात्मा संयोगो ।अन्‍नं न निंद‍्यात् तद्व्रतम्। अन्‍नं न परिचक्षीत तद्व्रतम्॥(चरकसंहिता 1/42, तैतिरियोपनिषध 7/8) अर्थात, मानवी शरीर हे ज्ञानेंद्रियेे, सत्वयुक्‍त मन, आत्मा यांचे ऐक्य असलेली बॉडी आहे. ते अन्‍नमय कोष निर्मित बनते. म्हणून अन्‍नावर टीका करून नये. अन्‍न वाया घालवू नये. त्यासाठी दर्जेदार व ताजे खाद्य विकत घेऊन त्यापासून भोजन बनवावे. या व्रताचे आयुष्यभर पालन करावे.

आहार जीवनाचा आधार आहे. प्रत्येक प्राणी जीवनाला आहार आवश्यक असतो. अत्यंत सूक्ष्म जीवाणूपासून महाकाय हत्तीसारख्या प्राण्यापर्यंत तसेच मनुष्य, वृक्ष,पशू-पक्षी आहार ग्रहण करतात. सर्व अन्‍नघटक हे रासायनिक पदार्थ आहेत. सृष्टीत अनंत रासायनिक घटक आहेत; पण त्यातील काही निवडक घटकांचाच आहारात समावेश होतो. असे का? शरीरात सर्वात लहान घटक पेशी हा आहे. प्रत्येक जिवंत पेशी; मग ती मानवाची असो, प्राण्याची असो, वनस्पतीची असो ती जीवनद्रव्यांनी बनलेली आहे. प्रत्येक पेशीला आवरण असते. केंद्र व जीवनद्रव्ये मिळून पेशीद्रव्य बनते. त्यात प्रामुख्याने पाणी, प्रथिने, कर्बोदके, स्निग्धे आणि क्षार हे पदार्थ असतात. पेशींमध्ये प्राणवायू, कर्ब, हायड्रोजन, नत्र, स्फुरद, गंधक, सिलिकॉन, फ्युरिन, क्लोरिन आणि आयोडिन हे अधातू घटक असतात.वरील विवेचनावरून आहारद्रव्ये आणि शरीराची द्रव्ये एकच आहेत हे लक्षात येईल. आहारामुळे जीवनाचे सातत्य टिकते. तीन दिवसांच्या उपवासाने शरीरात फार महत्त्वाचे असे रासायनिक बदल घडून येतात. मनुष्य अन्‍नाशिवाय फार तर चाळीस दिवस जगू शकेल. अपुर्‍या आहाराने शरीराचे स्नायू झिजतात. माणसाचे व्यक्‍तिमत्त्व आणि वागणूक ही आमूलाग्र बदलते.

उत्कृ ष्ट आहाराचे शरीरावरील सुपरिणाम :

यूवर फूड शूड बी यूवर मेडिसिन अँड यूवर मेडिसिन शूड बी यूवर फूड. हे उद‍्गार अ‍ॅलोपॅथी डॉक्टरांचे पितामह हिप्पोक्रेटस् यांचे आहेत. उत्तम वाढीसाठी, भरपूर श्रम करण्यासाठी, निरोगी राहण्यासाठी चांगल्या व सकस अन्‍नाची गरज असते. यात पदार्थाचा रंग, पोत, चव व आकार यालाही महत्त्व आहे. जसे की पांढरा भात, हिरवी पालेभाजी, पिवळसर फळभाजी, लाल बीट हे रंग दर्शवितात. तर मऊ भात, घट्ट पालेभाजी, पातळ वरण, कुरकुरीत पापड हे त्याचे विशेष दर्शवितात. नेहमी आढळून येणार्‍या आजारांमध्ये अपुरा व निकस आहार हेच कारण आहे. गरोदरपणात मातेने  सकस आहार घेतल्याने सामान्य मृत्यूदर, जास्तीचा माता व बाल मृत्यूदर, सिकनेस डेड रेट कमी होतो. पूर्ण दिवसाचे सुद‍ृढ बाळ जन्माला येते. बाळाची शारीरिक आणि मानसिक वाढ जोमात होते. ही मुले खेळात, अभ्यासात अव्वल राहतात.

थोडक्यात पोषणाचे बरे-वाईट परिणाम माणसाच्या आयुष्यात जन्मापासून मृत्यूपर्यंत होत असतात. उत्कृष्ट आहारामुळे माणसाचे वजन, उंची, वय यात समतोलपणा असतो. स्नायू घट्ट आणि पिळदार बनतात. त्वचा स्वच्छ, मऊ असते. श्‍लेष्मल आवरणाचा रंग तुकतुकीत असतो. अवयव ताठ व सरळ असतात. डोळे स्वच्छ, तेजस्वी असल्याने द‍ृष्टी निर्दोष असते. श्रवणशक्‍ती तीव्र असते. नाकाने श्‍वासोच्छ्वास करणे सुलभ जाते. दात व हिरड्या मजबूत व घट्ट असतात. बांधा डौलदार असतो. चालणे, बसणे ताठ असते. ज्ञानतंतू स्थिर असल्याने स्वभाव आनंदी व उमदा असतो. शरीराचे उष्णतामान उन्हाळ्यात थंड आणि थंडीत उष्ण असते. भरपूर उत्साह आणि कार्यक्षमतेने परिपूर्ण व्यक्‍ती असते. उत्कृष्ट आहारात प्रोटिन, कार्बोहायड्रेड, स्नेह व वसा, खनिज पदार्थ, जीवनसत्त्वे आणि जल संतुलित प्रमाणात घेतली जातात. 

आयुर्वेदाप्रमाणे गोड, आंबट, खारट, तिखट, कडू आणि तुरट या सहा चवींनी उत्कृ ष्ट आहार बनतो. ताजी भाजी खरेदी करताना काय काळजी घ्यावी, याचे प्रात्याक्षिक दाखविण्यासाठी मी मैत्रिणीला घेऊन मंडईत गेले. उदा. पालक खरेदी करताना पानांना काळजीपूर्वक पाहावे, कारण जेथे पेंडी बांधली जाते तेथील पाने सडलेली असू शकतात. पेंडीमधून उघडी करून पाहावी की आतमध्ये किडा, भोकं पडलेली पाने तर नाहीत ना! विके्रते ताजा माल खाली ठेवून वर मध्यम प्रतीचा माल ठेवतात. स्त्रिया गडबडीत वरचा माल खरेदी करतात. ज्या स्त्रियांना कुटुंबाच्या आरोग्याची काळजी आहे त्या वेळ काढून व डोळे उघडे ठेवून मंडईत स्वत: खरेदीस जातात. निवडक व उत्तम मालासाठी योग्य किंमत मोजतात.  

निकृ ष्ट आहाराचे शरीरावरील दुष्परिणाम :

माणसाचे वजन, उंची, वय यात विषमता असते. स्नायू लिबलिबीत आणि मऊ बनतात. त्वचा कोरडी, खरखरीत असते. श्‍लेष्मल आवरणाचा रंग फिकट असतो. अवयवांना बाक व पोक असतो. डोळे मंद, निर्जीव असल्याने द‍ृष्टी अंधुक व अस्पष्ट असते. श्रवणशक्‍ती सदोष असते. अ‍ॅड्रिनॉईड ग्रंथींची वाढ झाल्याने तोंडाने श्‍वासोच्छ्वास करावा लागतो. दात पोखरलेले, कॅव्हिटीने भरलेले असतात. हिरड्या मऊ असून त्यातून रक्‍त वहाते. बेडौल बांधा, गोल खांदे, पोट सुटलेले हालचालीत मंदत्त्व आणि शिथिलता असते. अस्थिर मनोवृत्तीने चिडखोरपणा वाढतो. शरीराचे उष्णतामान उन्हाळ्यात उष्ण आणि थंडीत थंड असते. शैथिल्य आणि आळशीपणाचे प्रतीक या व्यक्‍ती असतात. मेंदूच्या निर्णय क्षमतेत घट होते. हृदयाची क्रिया मंदावते. अपुर्‍या आहाराने आयुष्य कमी होते.कुपोषणामुळे क्षयरोगासारखे जंतुसंसर्ग पटकन होतात. माणसाचे जिवंत हाडाच्या सापळ्यात रूपांतर होते. निकृष्ट आहार आणि कुपोषण एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. निकृ ष्ट आहाराने व्यक्‍ती आजारी पडते. ती दवाखान्यात औषध घेण्यासाठी जाते. लिव्ह यूवर ड्रग्ज इन द केमिस्टस् पॉट. इफ यू कान्ट हिल द पेशंट विथ फूड. 

हे हिप्पोक्रेटस् यांचे वचन आहे. त्यानुसार डॉक्टर तुमच्यावर उपचार करतात. कुपोषणाचा एक प्रकार म्हणजे अतिपोषण, ओव्हर न्यूट्रिशन. अतिपोेषणामुळे होणारे आजार म्हणजे स्थूलत्व व लठ्ठपणा, मधुमेह. उच्च रक्‍तदाब, रक्‍ताभिसरण संस्था तसेच किडणीचे आजार, लिव्हर आणि विशिष्ट प्रकारच्या पचनसंस्थेच्या कर्करोगास कारणीभूत होतात. अशाप्रकारे आहार आणि काही आजार यांचा घनिष्ठ संबंध आहे.

अन्‍नाची विशिष्ट आणि विविध कार्ये :

आपण जे अन्‍न खातो त्याचे रूपांतर विशिष्ट प्रकारच्या जीवनरसात, प्रोटोप्लाझमात होते. उदा. काही अन्‍नाचे रूपांतर स्नायू पेशीच्या जीवनरसात होते. काहींचे अस्थी-पेशीच्या, तर काही अन्‍नाचे मज्जापेशीच्या जीवनरसात होते. म्हणजे अन्‍नाला एकाच प्रकारचे कार्य नसून विविध प्रकारची कार्ये त्याला पार पाडावयाची असतात. शरीराला ज्वलनासाठी पदार्थ पुरविणे. या पदार्थाचे शरीरात ऑक्सिकरण होऊन, अन्‍नातील बंदिस्त शक्‍ती मुक्‍त होऊन शरीराच्या हालचालींना लागणार्‍या कार्यशक्‍तीचा पुरवठा करणे. पेशीजालांची वाढ, त्यांचे सातत्य टिकविणे आणि झीज भरून काढणे. कोशिकांचे पुनर्निर्माण व पुनर्विकास करणे. शरीरांतर्गत अखंड चालणार्‍या प्रक्रियांवर नियंत्रण ठेवणार्‍या पदार्थांचा पुरवठा करणे. शरीरातील रोगांपासून रक्षण करण्यासाठी शक्‍ती देणे. अन्‍नातील ही विशिष्ट कार्ये पार पाडणार्‍या रासायनिक द्रव्यांना सत्त्वे ‘न्यूट्रियंटस् ’असे म्हणतात. कर्बोदके, स्निग्धे आणि प्रथिने यांचा समावेश ज्वलन अन्‍ने, फ्युएल फूड या सदरात होतो. क्षार आणि पाणी यांचा समावेश निरिंद्रिय रसायन शाखेत, इनऑरगॅनिक केमिकल्समध्ये होतो. जीवनसत्त्वे ही सेंद्रिय संयुगे असून ती ऑक्सिकरणाला मदत करतात. उत्तम आहाराने सुद‍ृढ शरीराचे समीकरण टिकण्यासाठी व्यायामशाळेत रोज एक तास घाम गाळावा लागतो. टू इट अँड ड्रिंक इज अ‍ॅन नेसेसिटी, बट टू इट नॅचरल फूड, फ्रूट अँड प्युअर वॉटर इंटेलिजंटली इज अ‍ॅन आर्ट.

Back to top button