अकोल्यातील ‘तो’ परिसर केला सील | पुढारी

अकोल्यातील ‘तो’ परिसर केला सील

नागपूर : पुढारी वृत्तसेवा 

अकोला जिल्ह्यातील ज्या भागात पहिला कोरोनाचा रुग्ण आढळला तो संपुर्ण परिसर तातडीने सील करण्यात आला आहे. अकोल्यात मंगळवारी रात्री कोरोनाचा पहिला रूग्ण आढळला आहे. अकोला शहरातील बैदपुरा भागातील हा रहिवासी आहे. 

अधिक वाचा : नागपूर : हिंगणा एमआयडीसीतील कारखाना आगीच्या भक्ष्यस्थानी (video)

संबंधित बातम्या

संबधित कोरोनाबाधित रुग्ण ज्या भागात राहतो त्या बैदपूरा भागाला केंद्रबिंदू मानून तीन किलोमीटरच्या परिघातील परिसर तसेच दोन किलो मीटरचा बफर झोन असा पाच किलो मीटरचा परिसर ‘सील’ करण्यात आला आहे. यातील तीन किलो मीटरच्या परिसरात प्रत्येक व्यक्तीची आरोग्य तपासणी करण्यात येईल. हा संपूर्ण भाग बंद ठेवण्यात येणार आहे. बाहेरुन कुणालाही या भागात प्रवेश दिला जाणार नाही वा या भागातून कुणीही बाहेर जाऊ शकणार नाही, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिली. 

अधिक वाचा : विदर्भात कोरोनाचे ८ रूग्ण वाढले

यासंदर्भात स्वतंत्र आदेश जिल्हाप्रशासनाने निर्गमित केले आहे. या भागाला सीलबंद राखण्यासाठी पोलिस बंदोबस्त ही तैनात करण्यात आला आहे. पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त राखून या भागातील लोक बाहेर व बाहेरील लोक या भागात येणार नाहीत. यासंदर्भात कलम १४४ नुसार संचारबंदीची अंमलबजावणी करावी, असे निर्देशही जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी पोलिसांना दिले आहेत.

‘पॉझिटिव्ह’ रुग्णाची पत्नी मात्र ‘निगेटिव्ह’

ज्या रुग्णाची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली आहे, त्या रुग्णाची नजिकच्या काळातील कोणत्याही प्रवासाची नोंद नाही. या रुग्णासोबत त्याच्या पत्नीचेही नमुने पाठविण्यात आले होते. त्याच्या पत्नीचे अहवाल मात्र निगेटिव्ह आले आहेत. याबाबतची माहिती वैद्यकीय सुत्रांनी दिली. या रुग्णाला तीन वर्षांपासून दम्याचा विकार असल्याची वैद्यकीय नोंद आहे, असेही सूत्रांनी सांगितले.

अधिक वाचा : स्वॅब नमुना; अमरावतीत स्पेशल बॉक्सची निर्मिती

घरोघरी होणार तपासणी

मनपाचे आयुक्त संजय कापडणीस हे आता येथील मनपा आरोग्य विभागाच्या यंत्रणेमार्फत आरोग्य तपासणीसाठी आशा स्वयंसेविका, आरोग्य सेवक यांचे पथक तयार करतील. हे पथक घरोघरी जाऊन प्रत्येक व्यक्तीच्या आरोग्याची तपासणी करतील. संपूर्ण परिसर निर्जंतूक केला जाईल. त्यासाठी मनपा मार्फत विशेष अभियान या भागात राबविण्यात येईल. प्रत्येक कुटूंबाची आरोग्य तपासणी होईल व माहिती घेतली जाईल, त्यासाठी येणारे आरोग्य कर्मचारी यांना सहकार्य करावे, असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

अधिक वाचा : ‘मरकजहून परतलेल्यांनी माहिती द्यावी’

लोकांनी घरातच थांबावे

जिल्ह्यात कोरोना दाखल झाला आहे, ही वस्तूस्थिती लक्षात घेऊन आतातरी लोकांनी घरातच थांबावे, घराबाहेर पडू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे. कोरोना संसर्गित रुग्ण ज्या बैदपुरा  भागातील आहे तेथून तीन किमी परिसर परिघातील भाग सीलबंद होणार आहे. आता कोरोना विषाणू संसर्ग अकोला जिल्ह्यात आणि शहरातही पोहोचला आहे. ही वस्तूस्थिती लक्षात घेऊन नागरिकांनी घरातच थांबावे, बाहेरचा संपर्क टाळावा, वारंवार हात धुवावे, मास्क लावल्याशिवाय बाहेर जाऊ नये,असे आवाहन जिल्हाधिकारी पापळकर यांनी केले आहे.

अधिक वाचा : यवतमाळ : तब्बल सातशे किमी पायपीट करून आलेल्या तरूणांना गावबंदी!

आतापर्यंत १२३ नमुने तपासणीसाठी पाठवले आहेत. त्यापैकी ८६ जणांचे अहवाल प्राप्त झाले असून ८५ निगेटिव्ह आहेत. तर एका जणाचा अहवाल हा पॉझिटीव्ह आला आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अतिदक्षता विभागातील विलगीकरण कक्षात या रुग्णास दाखल करण्यात आले आहे. अद्यापही ३७ जणांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत. हे ३७ जण सध्या विलगीकरण कक्षात निरीक्षणाखाली आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिली आहे. जिल्ह्यात आजतागायत प्रवासी म्हणून २५८ जणांची नोंद झाली आहे. त्यातील ७४ जण अद्याप गृह अलगीकरणात आहेत. (५७ जण गृह अलगीकरणात तर १७ जण संस्थागत अलगीकरणात) तर १२६ जणांचा गृह अलगीकरणाचा १४ दिवसांचा कालावधी पूर्ण झाला आहे. तर ५७ जण विलगीकरण कक्षात वैद्यकीय निरीक्षणात आहेत.

Back to top button