सांगली : समाज प्रबोधनासाठी ‘तो’ झालाय कोरोना विषाणू! | पुढारी

सांगली : समाज प्रबोधनासाठी 'तो' झालाय कोरोना विषाणू!

इस्लामपूर : पुढारी वृत्तसेवा 

कोरोना विषाणूंचा प्रसार रोखण्यासाठी नागरिकांचे प्रबोधन व्हावे म्हणून तो दिवसभर पायपीट करत आहे. घराबाहेर पडू नका. . . घरातच थांबा! असे तालुकाभर फिरुन तो लोकांना जीव तोडून सांगत आहे. चेहऱ्यावर कोरोना विषाणूच्या प्रतिकृतीचा मुखवटा.. अंगात भुताचा  पेहराव. . . हातात मानवी कवटीची प्रतिकृती असा अवतार असलेली ही व्यक्ती आहे. साखराळे (ता. वाळवा) येथील विजय जाधव! ऊस दर आदोंलनाच्या काळात अंगावर उसाचा पाला बांधून इस्लामपूर तहसील कचेरी समोरील टॉवरवर चढून पोलिस व प्रशासनाच्या नाकीनऊ आणणारा… शेतकऱ्यांच्या राज्यव्यापी संपावेळी आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या अस्थी घेवून राज्यभर फिरणारा व आपल्या हटके आंदोलनाने नेहमी चर्चेत असलेला हा तोच सामाजिक कार्यकर्ता विजय जाधव आहे.

वाचा :इस्लामपूर उद्यापासून तीन दिवस लॉकडाऊन

प्रत्येक आंदोलनात हिरिरीने सहभागी होणारा, समाजकार्यासाठी नेहमी पुढाकार घेणारा व प्राणीमित्र म्हणुनही काम करणारा विजय जाधव आता जगावर आलेल्या कोरोनारुपी संकटावेळीही गप्प बसलेला नाही. रोज तालुक्यातील गावागावात जावून तो लोकांचे प्रबोधन करत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी काय काय उपाययोजना करायच्या याचे तो समाजप्रबोधन करत आहे. स्वखर्चाने तो हे प्रबोधनाचे काम करत आहे. त्याच्या लक्षवेधी वेषभुषेमुळे तो सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. आज लॉक डाऊनमुळे सर्वजण घरात बसले असताना स्वत:चा जीव धोक्यात घालून प्रबोधनासाठीं  दारोदार हिंडणाय्रा विजय जाधवचे कौतूक करावे तेवढं कमी आहे.

वाचा : रेठरेधरणचे 24 जण ‘कोरोना निगेटिव्ह’

Back to top button