तेलंगी पाच्छा पेठ परिसरातील 62 जण ताब्यात | पुढारी

तेलंगी पाच्छा पेठ परिसरातील 62 जण ताब्यात

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा 

सोलापुरातील तेलंगी पाच्छा पेठ येेथे सापडलेल्या कोरोनाबाधिताच्या पार्श्वभूमीवर हा परिसर सील करण्यात आला आहे. ‘त्या’ च्या संपर्कात आलेल्या जवळपास 62 लोकांना ताब्यात घेतले असून त्यांची वैद्यकीय तपासणी सुरू करण्यात आली आहे. त्याच्या संपर्कात आलेल्या लोकांचा तपास करण्यासाठी 40 पथकांची नेमणूक करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली आहे.

रविवारी सोलापुरात एका 56 वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर त्याचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. त्यामुळे जिल्हा प्रशासनासह संपूर्ण जिल्हाच हादरून गेला आहे.

या कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये यासाठी प्रशासनाने आता युद्धपातळीवर काम सुरू केले असून हा परिसर चोहोबाजूंनी सील करण्यात आला आहे. या भागात जवळपास 5 हजार घरे आहेत. अंदाजे 25 ते 30 हजार लोक राहत असल्याचा प्राथमिक अंदाज प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे. कोरोनाबाधित मृत रुग्णाचे काल रात्री अक्कलकोट रोडवरील मुस्लिम समाज दफनभूमीत शासकीय बंदोबस्तात तसेच मोजक्या लोकांसह दफन करण्यात आले. 

दरम्यान, त्या व्यक्तीचा ज्या ज्या लोकांशी थेट संपर्क आला होता तसेच त्याच्या घरातील लोकांनाही आता उपचारासाठी  दाखल करण्यात आले आहे. जवळपास 62 लोकांचे स्राव काढून तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. ही व्यक्ती मृत्यूपूर्वी आजारी पडली होती. त्यामुळे त्याला एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. नंतर त्याला शासकीय रुग्णालयात आणण्यात आले होते. त्यामुळे तो खासगी दवाखानाही सील करण्यात आला असून तेथील कर्मचार्‍यांसह इतरांचीही तपासणी करण्यात येत असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.

कोरोना : जिल्ह्याची सद्य:स्थिती 

कोरोनाबाधित : 01

मृत्यू : 01

होम क्वारंटाईन : 819 

14 दिवस पूर्ण केलेले : 449 

अद्याप होम क्वारंटाईन : 370

इन्स्टिट्यूशनल : 328 

14 दिवस पूर्ण केलेले : 134 

आयसोलेशन : 247 निगेटिव्ह रिपोर्ट आलेले : 208 

अद्याप रिपोर्ट न आलेले : 101

 

Back to top button