सोलापुरात महिलेला कोरोनाची लागण | पुढारी | पुढारी

सोलापुरात महिलेला कोरोनाची लागण | पुढारी

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा 

सोलापुरातील तेलंगी पाच्छा पेठ येथील एका 56 वर्षांच्या किराणा दुकानदाराचा मृत्यू झाल्यानंतर हा दुकानदार कोरोनाबाधित असल्याचे समोर आले होते. त्याच व्यक्‍तीच्या संपर्कात असलेली आणखी एक महिला आता कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याची माहिती सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली. 

जिल्हा प्रशासनाच्या वतीने तेलंगी पाच्छा पेठ येथून एक किलोमीटर परिसरात प्रतिबंधक क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. त्या मृत व्यक्‍तीच्या संपर्कात असलेल्या 94 जणांचे नमुने कोरोना चाचणीसाठी घेण्यात आले होते. मंगळवारी  दुपारपर्यंत 67 जणांचे अहवाल प्राप्त झाले असून त्यातील 66 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. 

एका महिलेचा अहवाल हा पॉझिटिव्ह आला आहे. त्या मृत व्यक्‍तीच्या व कोरोना पॉझिटिव्ह महिलेच्या प्रथम व द्वितीय  संपर्कात आलेल्या व्यक्‍तींचा शोध प्रशासनाच्या वतीने घेतला जात आहे. संपर्कात आलेल्या व्यक्‍तीचे कोरोना चाचणीसाठी नमुने घेतले जात असल्याची माहिती सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली.

सोलापुरात कोरोना चाचणी करणार्‍या विभागात आतापर्यंत 362 जणांचे स्वॅप घेऊन चाचणी करण्यात आली आहे. त्यांपैकी आतापर्यंत 259 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. उर्वरित एकशे दोनजणांचे अहवाल प्रतीक्षेत आहेत. पाच्छा पेठ  केंद्रबिंदू धरून या परिसरातील एक किलोमीटर परिसरातील सुमारे 7 हजार घरे आणि 43 हजार लोकसंख्येचे सर्व्हेक्षण सोमवार (दि.13) पासून हाती घेण्यात आले आहे.  महापालिका आरोग्य विभागाची  60 पथके हे काम अहोरात्र करीत आहेत. सोमवारी संध्याकाळपर्यंत 3700  घरांतील 29 हजार व्यक्‍तींचे सर्व्हेक्षण पूर्ण झाले होते. हा परिसर पूर्णपणे बंदिस्त करण्यात आला असून नागरिकांनी घाबरून जाऊ नये. सर्व्हेक्षणाला मदत करावी. अत्यावश्यक बाबी लागल्यास प्रशासनाने दिलेल्या 0217-274335 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. यामध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी 300 पोलिस तैनात करण्यात आले आहेत.

Back to top button