दमा : कारणे आणि लक्षणे | पुढारी

दमा : कारणे आणि लक्षणे

जगभरात प्रत्येक 10 सेंकदांत एका व्यक्तीला दम्याचा अ‍ॅटॅक येतो. सध्या उपलब्ध असलेल्या पर्यायांच्या आधारे दमा पीडित व्यक्ती सामान्य जीवन जगू शकते. 

श्वसनासंबंधित होणार्‍या आजारात दमा हा एक आजार आहे. भारतात दम्याच्या रुग्णांची संख्या बरीच जास्त आहे. दम्यासंदर्भात धोकेदायक गोष्ट म्हणजे भारतात बरेच दमारोगी एकतर इलाज करून घेत नाहीत किंवा त्यांचा दमा नियंत्रणात तरी नाही. गेल्या दशकात लहान मुले आणि गरोदर महिलांमध्येसुद्धा दम्याचेप्रमाण वाढल्याचे दिसून आले आहे. चांगला आणि परवडेल असा इलाज उपलब्ध असूनही जागरुकतेचा अभाव आणि उपचाराबाबत बेफिकीरी यामुळे रुग्णांची स्थिती गंभीर होत जाताना दिसते. 

सामान्य शब्दात सांगायचे झाले तर दम्यामुळे श्वास घेण्याच्या प्रक्रियेत अडथळा निर्माण होतो. अ‍ॅलर्जी होणे, फुफ्फुसापर्यंत पोहोचणार्‍या नळीला सूज येऊन श्वासनलिका बंद होणे, त्यामुळे श्वास घेण्यास त्रास होऊ लागतो. दम्याचे कारण अजूनही पूर्णपणे स्पष्ट झालेले नाही. परंतु, सामान्यपणे अनुवंशिक आणि पर्यावरणीय कारणे यासाठी जबाबदार असतात. फुले आणि झाडांपासून निघणारे परागकण, गवत, शैवाल, कीड, जनावरे आणि पक्ष्यांचे केस अथवा पिसे, धूळ, प्रदूषण, स्टो किंवा गॅसच्या हिटरद्वारे निघणारे वायू एअरब्लर आदी गोष्टी दम्याच्या अ‍ॅलर्जीचे कारण बनू शकतात. अ‍ॅस्पिरिन आणि बिटा ब्लॉकर्स औषधे, थंड हवा, अधिक तणाव, राग, भीती आदी गोष्टी सुद्धा दम्याची समस्या वाढवतात. दमा असल्यास सतत खोकला, सर्दी होणे, श्वास घेण्यास त्रास होणे, तसेच श्वास घेताना शिटीसारखा आवाज येणे, सकाळी उठल्यानंतर खोकला येणे, धाप लागणे, घाबरल्यासारखे होणे अशी लक्षणे दिसतात. परंतु, या लक्षणाकडे बरेच लोक गांभीर्याने बघत नाहीत. ते खोकल्यावरील सामान्य औषधेच घेत असतात. यामुळे दमा अनियंत्रित होतो. 

जीवनशैली सांभाळणे गरजेचे : दमा तीव्र झाल्यास रुग्णाला त्वरित आराम मिळण्यासाठी ब्रॉनकोडायलेटर्स सिरप किंवा इनहेलर याची मदत घेतली जाते. दम्याच्या रुग्णांसाठी गोळी घेण्यापेक्षा औषध श्वासाद्वारे आत घेणे म्हणजेच इनहेल करणे अधिक लाभदायक असते. यामुळे औषध श्वासाद्वारे थेट फुफ्फुसापर्यंत पोहोचते. तसेच, यामुळे श्वासनलिकेचे अखडलेपण आणि अ‍ॅलर्जी स्थायी रुपात कमी करण्यासाठी मदत होते. 

आयुर्वेदात दमा हा कफसंबंधी आजार मानला गेला आहे. या आजारामध्ये सुधार आणण्यासाठी योग्य दिनचर्येवर जोर दिला गेलेला आहे. झोपण्याची व उठण्याची वेळ योग्य ठेवणे, संतुलित भोजन करणे, पोट साफ ठेवणे, व्यायाम आणि तणाव कमी करणे आदी आवश्यक उपाय सांगितले आहेत. 

आयुर्वेदामध्ये दही, तांदूळ, भेंडी, राजमा, केळी, उडीद डाळ हे पदार्थ कफवर्धक मानले जातात. त्यामुळे दही, आइस्क्रीम तसेच तीव्र गंध, धूर आदीपासून दूर राहणे उत्तम असते. दम्यासाठी सॉल्ट थेरपी आणि मर्म चिकित्सादेखील फायदेशीर ठरते. मर्म चिकित्सेमध्ये हात आणि छातीचे मर्म बिंदू दाबून इलाज केला जातो. 

दम्याशी निगडित काही मिथक आणि सत्य 

मिथक : दम्याच्या रुग्णांनी व्यायामापासून दूर राहिले पाहिजे.

सत्य : वास्तवात असे नाही. दम्याच्या रुग्णांसाठी देखील व्यायाम गरजेचा आहे. परंतु, व्यायामादरम्यान श्वास नलिकेची रुंदी कमी असल्यामुळे त्यात कोरडेपणा वाढू शकतो म्हणून संथ वॉर्माअप या व्यक्तींना करता येऊ शकतो. दम्याचे रुग्ण चालणे, सायकलिंग करणे, पोहणे, बॅडमिंटन आणि टेनिस यांसारखे खेळ खेळू शकतात. 

मिथक : दमा आपोआप बरा होतो. 

सत्य : यामध्ये अर्धे सत्य आहे. 2-10 वर्षे वयाच्या दमा पीडित मुलांपैकी अर्ध्यांपेक्षा अधिक मुलांमध्ये वाढत्या वयासोबत दम्याची लक्षणे कमी होताना दिसतात. याचा दुसरा पैलूसुद्धा आहे. 30 वर्षांनंतर संंबंधित व्यक्तीने धूम्रपान सुरू केल्यास किंवा अन्य कारणामुळे हा आजार पुन्हा उद्भवू शकतो. 

मिथक : दम्यामध्ये धाप लागते. 

सत्य : धाप लागणारा प्रत्येक आजार दमा नसतो आणि दम्यामध्ये धाप लागलीच पाहिजे, असे गरजेचे नसते. धाप लागणे हे या आजाराचे केवळ एक लक्षण आहे; पण ते एकमेव लक्षण नाही. 

मिथक : एक्स-रे काढल्याने दम्याची तपासणी होते. 

सत्य : दम्याची तपासणीसाठी एक्स-रेचा विशेष लाभ होत नाही. त्यासाठी फुफ्फुसाच्या कार्यक्षमतेसाठी चाचणी केली जाते आणि त्याच आधारावर तपासणी होते.

मिथक : दमा खूप वाढल्यावर इनहेलर घ्यावे.

सत्य : सत्य असे नाही. सध्या तरी इनहेलरद्वारे औषध घेणे ही सर्वांत सुरक्षित पद्धत आहे. इनहेलरद्वारे अतिशय कमी औषध शरीरात जातो. सामान्य पद्धतीपेक्षा यामुळे चाळीस पटपर्यंत कमी औषध शरीरात पाठविले जाते.

मिथक : गरोदर महिलांनी इनहेलर घेऊ नये. 

सत्य : हे विधान योग्य नाही. इनहेलरमुळे अतिशय कमी प्रमाणात औषध शरीरात जाते. त्यामुळे या औषधाद्वारे गर्भातील बाळाला नुकसान पोहोचत नाही. मात्र, गर्भवती स्त्रीला दम्याचा अ‍ॅटॅक आला तर त्यामुळे गर्भाला बरेच नुकसान पोहोचू शकते. त्यामुळे गर्भावस्थेच्या सुरुवातीलाच डॉक्टरांशी याबाबत बोलून घेतले पाहिजे. 

मिथक : दम्याचा रुग्ण सामान्य जीवन जगू शकत नाही. 

सत्य : हे सुद्धा चुकीचे आहे. सौरभ गांगुली, इयान बॉथम यांच्यासारखे क्रिकेटर असो किंवा अमिताभ बच्चनसारखे चित्रपट तारे असो हे सर्वजण दम्याच्या सामना करत सामान्य लोकांपेक्षा अधिक सक्रिय जीवन व्यतित करीत आहेत. दमा पूर्णपणे बरा होत नसला तरीसुद्धा त्याला नियंत्रणात नक्कीच ठेवता येऊ शकते. 

मिथक : दमा संसर्गजन्य आजार आहे. 

सत्य : दम्याचा आजार स्पर्श केल्याने किंवा पीडित व्यक्तीच्या संपर्कात आल्याने पसरत नाही. 

आपल्याला दमा आहे हे स्वीकारण्यास रुग्णांने संकोच करू नये. दमा असणार्‍याने इनहेलर नेहमीच जवळ ठेवावे. तसेच, योग्य प्रकारे औषध इनहेल केले जात आहे का, याकडे लक्ष द्यावे. आपत्तकालीन स्थितीत काय करायचे याची माहिती डॉक्टरांकडून घ्यावी. कुटुंबात एखाद्या व्यक्तीला दमा असल्यास आईने बाळाला सहा महिन्यांपर्यंत स्तनपान जरूर करावे. आईच्या दुधात दमा प्रतिरोधक सुरक्षात्मक घटक असतात. तसेच, दमा रुग्णांनी धूम्रपान करू नये. नियमित श्वासासंबंधी व्यायाम करावा. गर्दीच्या ठिकाणी प्रवास करणे टाळावे. तसेच, गाडी चालवताना गाडीच्या काचा बंद ठेवाव्यात. दमा वाढवणार्‍या अ‍ॅलर्जीच्या कारणांपासून दूर राहावे.

लहान मुलांमध्ये दम्याचे प्रमाण वाढत आहे. भारतात 10 पैकी एका मुलाला दम्याचा आजार आहे. खेड्यातील मुलांच्या मृत्यूमागचे दमा हे मोठे कारण आहे. प्रदूषण, अ‍ॅलर्जी, स्थूलपणा ही कारणे मुलांमध्ये दमा वाढण्यामागची आहेत. मुदतीपूर्वी जन्मलेली मुले दमा आणि अ‍ॅलर्जीच्या विळख्यात चटकन येतात. कारण, त्यांची फुफ्फुसे पूर्णपणे विकसित झालेली नसतात. महिलांमध्ये पर्यावरण आणि अनुवंशिक कारणांमुळे तसेच हार्मोनल बदलांमुळे दमा होऊ शकतो. पुरुषांच्या तुलनेत दमा पीडित महिलांची संख्या जास्त आहे. तसेच, महिलांना असुविधा जास्त प्रमाणात असते. दमा वाढविणार्‍या अ‍ॅस्ट्रोजन हार्मोन हे महिलांमध्ये वजन वाढण्याचे मोठे कारण आहे.

 

Back to top button