अन् कल्याण-डोंबिवलीकरांचा आनंद फार काळ टिकला नाही | पुढारी

अन् कल्याण-डोंबिवलीकरांचा आनंद फार काळ टिकला नाही

डोंबिवली : पुढारी वृत्तसेवा

कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात मंगळवारी एकही नवा रुग्ण आढळून आला नाही. तर उलट एकजण बरा होऊन घरी गेला याबद्दल आनंद व्यक्त करण्यात आला होता. तथापी हा आनंद फार काळ टिकला नाही. उलट डोंबिवली पूर्वेत बुधवारी कोरोनाची बाधा झालेले 2 नवे रुग्ण आढळून आले असून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे उपचार घेत असलेल्या कोरोनाग्रस्त रुग्णांची एकूण संख्या आता 39 इतकी झाली आहे.

डोंबिवली पूर्वेकडील मानपाडा रोडला असलेल्या अयोध्या नगरीमध्ये 30 वर्षीय पुरुष, तर सांगर्ली गावात 42 वर्षीय महिला कोरोना बाधीत असल्याचे आढळून आले. त्यामुळे गावदेवी मंदिर ते विजया बँक, तसेच राधानगरी आणि अयोध्या नगर हा परिसर केडीएमसी प्रशासनाने तात्काळ सील केला. या व्यतिरिक्त गावदेवी मंदिर ते आयकॉन हॉस्पिटलपर्यंतचा मानपाड्याला जाणारा रस्ता देखील सील करण्यात आला. या परिसरातील सर्व अत्यावश्यक सेवा अर्थात किराणा माल दुकान ते मेडिकलसह सर्व सेवा पुढील 15 दिवस पूर्णतः बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या भागात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. नागरिकांना घराबाहेर पडण्यास सक्त मनाई करण्यात आली असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. मानपाडा रोडला असलेल्या एका खासगी हॉस्पिटलमध्ये कार्यरत असलेल्या 30 वर्षीय पुरुष आणि 42 वर्षीय महिलेला कोरोनाची बाधा झाल्याचा संशय असल्याने या दोघांना तातडीने डोंबिवलीतील बाज आर. आर. हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले.

बुधवारी कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात आढळून आलेल्‍या कोरोना बाधित रुग्‍णांची विगतवारी खालील प्रमाणे

रुग्‍ण संख्‍या : एकूण 2

पुरुष 30 वर्षे (डोंबिवली पूर्व)

महिला 42 वर्षे (डोंबिवली पूर्व)

दोन्ही खासगी रुग्णालयातील कर्मचारी

आजपर्यंतचे एकूण रुग्‍ण 58 असून त्यापैकी 2 मयत, 13 + 4 = 17 डिस्चार्ज (1 निळजे आरोग्‍य केंद्रातील धरुन)

एकूण उपचार घेत असलेले रुग्‍ण : 39

महापालिका क्षेत्रातील एकूण रुग्ण : 57 रुग्णांपैकी – 2 मयत, 12 + 4 = 16 डिस्चार्ज

एकूण उपचार घेत असलेले रुग्‍ण 39 आहेत. त्यामुळे कल्याण-डोंबिवलीकरांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, असे महापालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागाने आवाहन करण्यात आले.

डोंबिवलीकर खरेदीसाठी रस्त्यावर 

महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी 12 ते 14 एप्रिल दरम्यान  औषधे व दूध वगळता सर्व व्यवहार बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. बुधवारी त्याची मुदत संपताच भाजी व धान्य खरेदीसाठी नागरिकांनी रस्त्यावर एकच गर्दी केली होती. एका बाजूने प्रशासन कोरोना रोखण्यासाठी शिकस्त करत असताना नागरिक मात्र बिनधास्तपणे गर्दी करून, नियम मोडून खरेदीसाठी गर्दी करत असल्याचे बुधवारी आढळून आले. 

 

Back to top button