भाडेकरुंना दिलासा! राज्य सरकारने घरमालकांना केली ‘ही’ सूचना  | पुढारी

भाडेकरुंना दिलासा! राज्य सरकारने घरमालकांना केली 'ही' सूचना 

मुंबई : पुढारी वृत्तसेवा

देशात कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर ३ मे पर्यंत लॉकडाऊन कायम राहणार आहे. या परिस्थितीत सर्व व्यापार, व्यवसाय, उद्योगधंदे बंद असल्याने रोजगारावर परिणाम झाला आहे. राज्यात भाड्याच्या घरात राहणा-या लोकांचे प्रमाण लक्षणीय असल्याने घर भाडे वसुली किमान तीन महिने पुढे ढकलावी, अशा सूचना गृहनिर्माण विभागाचे अपर मुख्य सचिव संजय कुमार यांनी सर्व घरमालकांना दिल्या आहेत.

लॉकडाऊन परिस्थितीमुळे सर्व बाजारपेठा, व्यवसायिक संस्था, कारखाने व एकूणच सर्व आर्थिक व्यवहार बंद आहेत. याचा सर्वसामान्य जनतेच्या रोजगारवरही परिणाम झालेला असून, अनेकांचे उदरनिर्वाहाचे साधन बंद झालेले आहे. यामुळे अनेकांना अत्यंत कठीण अशा आर्थिक परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे. मोठ्या प्रमाणात भाड्याच्या घरात राहणाऱ्यांना नियमित भाडे भरणे शक्य होत नसून, भाडे थकत असल्याची वस्तुस्थिती आहे.

या परिस्थितीत घरभाडे वसुली किमान तीन महिने पुढे ढकलावी व या कालावधीत वेळेवर भाडे रकमांची अदायगी न झाल्याने किंवा भाडे थकल्याने कोणत्याही भाडेकरूंना भाड्याच्या घरांमधून निष्कासित करण्यात येऊ नये, अशा सूचना सर्व संबंधित घरमालकांना अपर मुख्य सचिव संजय कुमार यांनी परिपत्रकाद्वारे दिल्या आहेत.

 

Back to top button