पुणे : एसआरपीएफच्या तीन जवानांना कोरोनाची लागण | पुढारी

पुणे : एसआरपीएफच्या तीन जवानांना कोरोनाची लागण

पुणे : पुढारी वृत्तसेवा

पुण्यातील राज्य राखीव पोलिस बलाच्या गट क्रमांक दोनमधील तिघे जवान कोरोना बाधीत झाल्याचे समोर आलं आहे. त्यामुळे आता येथील एसआरपीएफच्या ग्रुपमध्ये देखील कोरोनाने शिरकाव केला आहे. मुंबईला बंदोबस्तासाठी गेलेल्या तुकडीतील तिघा जवानांना ही लागण झाली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून ही सर्व कंपनी क्वारंटाईन करण्यात आली असून, उद्या कंपनीतील सर्वांची कोरोना चाचणी करण्यात येणार आहे.

पुण्यातील राज्य राखीव पोलीस बलाच्या  गट क्रमांक २ ची एक कंपनीत बंदोबस्तासाठी मुंबईला गेली होती. या कंपनीतील १०० जवान तीन दिवसांपूर्वी पुण्यात परत आले. सुरूवातीलाच या सर्वांना प्रशासनाने वेगळे ठेवले होते. मात्र त्यातील तिघांना थंडी, ताप जाणवल्याने त्यांची तपासणी केली असता त्यांना कोरोनाची लागण झाली असल्याचे आढळून आले आहे़. 

या सर्व जवानांना रामटेकडी येथील गट क्रमांक २ च्या अलंकरण हॉलमध्ये वेगळं ठेवण्यात आले आहे तसेच महापालिकेच्या एका शाळेमध्ये त्यांना विलगीकरण कक्षात ठेवले आहे. त्या ठिकाणी गैरसोय असल्याच्या तक्रारी या त्यांच्या नातेवाईकांकडे करीत आहेत.  त्यात बुधवारी त्यातील तिघे जण पॉझिटिव्ह आढळल्याने या जवानांमध्ये व त्यांच्या नातेवाईकांमध्ये भिती निर्माण झाली आहे.

याबाबत बोलताना राज्य राखीव पोलिस दलाच्या गट क्रमांक २ चे सहायक समादेशक लक्ष्मण उत्तेकर यांनी सांगितले की, मुंबईमध्ये बंदोबस्तासाठी गेलेली एक कंपनी २० एप्रिल रोजी दुपारी पुण्यात परत आली या सर्वांची पुण्यात येताच त्यांच्या ३ टीम तयार करून  वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. तसेच त्यांची राहण्याची सोय २ मोठ्या हॉलमध्ये करण्यात आली आहे. त्या ठिकाणी सर्व सुविधा आहेत. 

महापालिकेची एक शाळा घेण्यात आली असून तेथे काही जणांची सोय केली आहे. आतापर्यंत गेल्या तीन दिवसात त्यांची तीन वेळा तपासणी केली गेली आहे. त्यात सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. काल तिघा जणांना थंडी, ताप असल्याची त्यांच्यात लक्षणे दिसू लागल्याने त्यांची चाचणी केली. त्यानंतर त्यांची चाचणी पॉझिटिव्ह आली व ते कोरोना बाधित असल्याचे आढळून आले आहे. त्यांना वेगळे करून उपचार सुरू करण्यात आले आहे. या सर्व जवानांची शुक्रवारी पुन्हा तपासणी करण्यात येणार आहे. यापार्श्वभूमीवर सर्व प्रकारची खबरदारी घेतली जाते आहे.

Back to top button