जिल्ह्यासाठी शुक्रवार ठरला ‘पॉझिटिव्ह’ | पुढारी | पुढारी

जिल्ह्यासाठी शुक्रवार ठरला ‘पॉझिटिव्ह’ | पुढारी

सांगली : पुढारी वृत्तसेवा

सांगली जिल्ह्यासाठी शुक्रवार ‘पॉझिटिव्ह’ ठरला. शुक्रवारी रात्री दहा वाजेपर्यंत दिवसभरात एकही नवीन रुग्ण आढळला नाही. सलग चौदा दिवसांनंतर ही पहिली वेळ आहे. सुलतानगादे (ता. खानापूर) येथील महिलेच्या प्रकृतीत शुक्रवारी सुधारणा झाली. त्यांना अतिदक्षता विभागातून वॉर्डमध्ये हलविले आहे. सोहोली (ता. कडेगाव) येथील 53 वर्षीय व्यक्‍तीने कोरोनावर मात केली आहे.  

जिल्ह्यात शुक्रवारअखेर एकूण कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तींची संख्या 101 आहे. त्यापैकी 55 व्यक्ती बर्‍या झाल्या आहेत. सध्या 43 व्यक्ती उपचाराखाली आहेत. त्यापैकी तीन व्यक्ती चिंताजनक आहेत. दिवसभरात 22 व्यक्‍तींचे चाचणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. 

नेर्ली (ता. कडेगाव) येथील कोरोनाबाधित 57 वर्षीय व्यक्तीला नॉन इनव्हेजिव व्हेंटिलेटरवर ठेवले  आहे. कडेबिसरी (ता. सांगोला, जि. सोलापूर) येथील 48 वर्षीय व्यक्तीवर ऑक्सीजनवर उपचार सुरू आहेत. खिरवडे (ता. शिराळा) येथील 56 वर्षीय पुरुषावरही नॉन इनव्हेजिव व्हेंटिलेटरवर उपचार सुरू आहेत. 

संबंधित बातम्या

सुलतानगादे (ता. खानापूर) येथील 57 वर्षीय महिलेच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झाली आहे. त्यांना अतिदक्षता विभागातून वॉर्डमध्ये हलविण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांनी दिली आहे.

चरण येथे आलेला मुलगा निगेटिव्ह

मुंबईहून चरण (ता. शिराळा) येथे आलेल्या 16 वर्षीय मुलाचा चाचणी अहवाल कोरोना निगेटिव्ह आला आहे. संशयावरून त्याचा स्वॅब नमुना तपासणीसाठी घेतला आहे. खिरवडे, करुंगली, चिंचोली (ता. शिराळा) येथील कोरोना बाधितांच्या संपर्कातील 14 व्यक्तींच्या टेस्ट रिपोर्टची प्रतिक्षा आहे. या व्यक्ती शिराळा येथे संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. 

भाजीविक्रेता निगेटिव्ह

आटपाडी तालुक्यातील गोमेवाडी येथील भाजीविक्रेता तसेच बनपुरी येथील एका दहा वर्षीय मुलाचा  निगेटिव्ह आला आहे. 

दुधेभावी, वाघमोडेनगरची  कंटेनमेंट झोन अधिसूचना रद्द

दुधेभावी (ता. कवठेमहांंकाळ) व वाघमोडेनगर कुपवाड येथील कंटेनमेंट झोनची अधिसूचना रद्द झाली आहे. तेथे शेवटचा रुग्ण पॉझिटिव्ह येऊन 28 दिवस झाले असून नवीन एकही रुग्ण सापडलेला नाही. त्यामुळे कंटेनमेंट झोनची अधिसूचना रद्द करण्यात आली आहे. कचरेवाडी, शिरगाव (ता. तासगाव) येथे कंटेनमेंट आराखड्याच्या अंमलबजावणीस सुरूवात झाली आहे.

तीन व्यक्‍ती चिंताजनक

कोरोनाबाधित तीन व्यक्ती चिंताजनक आहेत. त्यांच्यावर मिरज शासकीय रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. शुक्रवारअखेर कोरोनाने मृत्यू झालेल्या व्यक्‍तींची संख्या 3 आहे.

Back to top button