स्वादुपिंडाचा दाह आणि आरोग्य | पुढारी | पुढारी

स्वादुपिंडाचा दाह आणि आरोग्य | पुढारी

आपल्या पोटात जठराच्या मागे स्वादुपिंड हा महत्त्वाचा अवयव असतो. तो पाचक रस व इन्सुलिन निर्माण करतो. पाचक रसाने अन्‍न पचनास मदत होते. ही ग्रंथी आपल्या पचनसंस्थेचा एक भाग तर असतेच, पण अंत:स्रावी संस्थेचाही (एन्डोक्राईन सिस्टीम) प्रमुख हिस्सा असते. अंत:स्रावी संस्था म्हणून स्वादुपिंडातून स्रवणारी इन्सुलिन, ग्लुकॅगॉन, सोमॅटोस्टॅटिन आणि पॅनक्रिअ‍ॅटिक पॉलिपेप्टाईड ही संप्रेरके रक्‍तात सोडली जातात. त्याचप्रमाणे जठरातून लहान आतड्यांत येणारी आहारातली प्रथिने, स्निग्ध पदार्थ आणि कर्बोदके यांचे विघटन करणारा ‘स्वादुपिंड रस’ हा पाचकरस लहान आतड्यात सोडला जातो. अतिरिक्‍त मद्यपान आणि पित्ताशयातील खडे ही स्वादुपिंडाला सूज येण्याची प्रमुख कारणे असतात. मद्यपानामुळे स्वादुपिंडाच्या ग्रंथीतील पेशी सुजतात आणि त्यांचे आकारमान वाढते. पित्ताशयातून निसटलेले लहान-मोठे खडे स्वादुपिंडातून आतड्यात पाचक रस नेणार्‍या नलिकेत अडकतात. त्यामुळे स्वादुपिंडातील नलिकांमधील दाब वाढून त्या फुटतात. त्यातील पाचकरसामुळे स्वादुपिंडातील ग्रंथी आणखीनच फुटू लागतात आणि तीव्र प्रमाणात सूज येते.

लक्षणे

–    स्वादुपिंडाचा तीव्र दाह झाल्यास मळमळ, उलट्या, पोटदुखी, ताप, पोट सुजणे अशी लक्षणे उद्भवू शकतात.

–     त्याचप्रमाणे, क्रॉनिक पॅनक्रियाटायटीसच्या लक्षणांमध्ये ओटीपोटात दुखणे, अतिसार,  वजन कमी होणे आणि पोट दुखणे असू शकते. 

एकदा आपल्याला लक्षणे दिसल्यास, कोणताही विलंब न करता योग्य उपचार घेण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कारण उशीर अथवा दुर्लक्ष केल्याने आपल्या आजाराचे परिणाम गंभीर असू शकतात.

कारणे 

विशिष्ट औषधे, पित्ताशयातील खडे, अति प्रमाणात मद्यपान, पाचक रस अतिरिक्‍त स्रवणे, चयापचयाशी संबंधित विकारांमुळे स्वादुपिंडाचा दाह होतो.

 उपचार 

–    घरगुती आणि साध्या अन्‍नाचे सेवन करणे.

–    पित्ताशयात खडे होऊ नयेत यासाठी प्रतिबंध हाच उपाय आहे.

–   डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आहाराचे सेवन करावे. चरबीयुक्‍त पदार्थांचे सेवन टाळावे. मसालेदार, तेलकट आणि प्रक्रिया केलेले पदार्थ तसेच साखरेचे प्रमाण अधिक असलेले पदार्थ खाणे टाळा. मांस,

कॉफी, अल्कोहोलचे सेवन करू नका. भरपेट आहार न घेता ठराविक अंतराने थोडा थोडा आहार घ्यावा. योग्य वजन राखण्याचा प्रयत्न करा. व्यायाम आणि मेडिटेशनसारख्या पर्यायांचा वापर करा.

स्वादुपिंडाची सूज नष्ट करायला प्रतिबंधक उपायच महत्त्वाचे ठरतात.

Back to top button