त्वचा भाजल्यास करू नका दुर्लक्ष | पुढारी

त्वचा भाजल्यास करू नका दुर्लक्ष

संपूर्ण जगभरात गरमागरम चहा पिणारे शौकीन पहायला मिळतात. मात्र, हा गरमागरम चहा अंगावर जर सांडला तर काय होईल याची कल्पनाही करवत नाही. असेच इतरही भाजण्याचे दुर्दैवी प्रसंग अनुभवास येतात. भाजणे हे घरगुती अपघातांमधील सामान्य प्रकार आहे. आपल्यापैकी प्रत्येकाला आपल्या आयुष्यात अशा प्रकारचे प्रसंग अनभुवण्यास येतात. बहुतेक जखम किरकोळ भाजलेल्याच्या असतात. तथापि, योग्य वेळी उपचार न केल्यास भाजल्याची जखम गंभीर आणि अगदी घातक देखील ठरू शकते. मुले आणि वृद्धांमध्ये या दुखापती अधिक गुंतागुंतीच्या ठरू शकतात.

यामध्ये फर्स्ट डिग्री बर्न, सेकंड डिग्री बर्न आणि थर्ड डिग्री बर्न पहायला मिळते. इजा किती गंभीर आहे यावर हे अवलंबून असते. भाजलेल्या जखमांवरील उपचार हे व्यक्‍ती-व्यक्‍तीमध्ये भिन्‍न असू शकतात. फर्स्ट डिग्री बर्नमध्ये सनबर्नचा समावेश आहे. सेकंड डिग्री बर्न गंभीर असू शकते आणि वेदना, लालसरपणा, सूज आणि फोड येणे यांचा समावेश असतो आणि थर्ड डिग्री बर्न हा जीवघेणा ठरू शकतो.

5 वर्षांखालील मुलांमध्ये आणि 70 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्‍तींना जखम झाल्यास त्वरित उपचार करणे गरजेचे असते.

मधुमेह, केमोथेरपी, गर्भधारणा, थायरॉईड डिसऑर्डर, लठ्ठपणा, मूत्रपिंडाचे आजार यामुळे रोगप्रतिकार शक्‍ती कमी असल्याने भाजल्याच्या जखमा अधिक वेदनादायक आणि गंभीर स्वरूपाच्या ठरू शकतात. शरीरावर पाच टक्क्यांपेक्षा जास्त आकाराचे कोणत्याही प्रकारचे भाजल्यास, त्वरित आपत्कालीन कक्षात दाखल करावे.

सायलेन्सर बर्न्ससारख्या अत्यंत गरम वस्तूंशी संपर्क झाल्यामुळे उद्भवणार्‍या इजा या प्रथमदर्शी साधारण वाटू शकतात; परंतु वास्तविक पाहता त्या खूप खोल आहेत आणि सामान्यत: यात शस्त्रक्रिया आवश्यक असतात.

प्रथमोपचार

किरकोळ भाजल्याच्या घटना या सर्वसामान्य असल्या तरी त्यावरही योग्य आणि वेळीच उपचार करणे फायदेशीर ठरते. यामध्ये टूथपेस्ट, बटाट्याचे साल, गव्हाचे पीठ, तांदळाचे पाणी, शाई, हळद लावणे अशा उपचारांचा समावेश असतो, मात्र हे उपचार काही वेळेला हानी देखील पोहोचवू शकतात. भाजलेल्या जखमांवर प्रामुख्याने थंडाव्याची गरज असते. भाजलेल्या त्वचेवरील भागाला कमीत कमी 20 मिनिटांसाठी थंड पाण्याखाली ठेवणे गरजेचे आहे.

भाजलेल्या त्वचेचे मूल्यांकन करणे आवश्यक आहे. जर 5 टक्केपेक्षा जास्त भाजले असेल तर डॉक्टरांकडे जाणे चांगले आहे, जेणेकरून जखम किती खोल आहे याचे अचूक मूल्यांकन करून त्यानुसार त्याचे उपचार करता येऊ शकतात.

भाजलेल्या जागेचे निर्जंतुकीकरण करणे गरजेचे असते आणि प्रगत संरक्षणात्मक ड्रेसिंगद्वारे ताबडतोब नियंत्रित केल्यास जखम लवकर बरी होण्यास मदत होते. बहुतेक रुग्ण नंतरच्या टप्प्यात डॉक्टरांकडे जातात तेव्हा जखमेला संसर्ग पसरण्यास सुरुवात झालेली असते. किरकोळ भाजलेल्या जखमेसाठी कोणत्याही जंतुनाशक मलमाचा वापर करा जेणेकरून जखमेद्वारे होणारा संसर्ग टाळता येईल.

आधुनिक औषधाने कृत्रिम त्वचेचा वापर करून जखमांना वेदनारहित तसेच डाग नसलेली त्वचा मिळू शकते.कमीत कमी चट्टे आणि विकृतीसह योग्य प्रकारे उपचार केले तर खोलवर झालेल्या जखमा देखील बर्‍या होऊ शकतात, फक्‍त वेळेत आणि योग्य उपचार व्हायला हवेत.

Back to top button