काय चांगले, ब्लॅक की व्हाईट फिनाईल? | पुढारी

काय चांगले, ब्लॅक की व्हाईट फिनाईल?

मेजर संजय शिंदे 

घरातील किंवा ऑफिसमधील फरशी पुसण्यासाठी, तसेच फरशीचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी हे दोन्ही प्रकारचे फिनाईल वापरतात. या दोन्ही फिनाईलच्या वैशिष्ट्यांमध्ये मोठा फरक आहे व आपल्यासाठी हे फरक जाणून घेणे अत्यावश्यक आहे. 

आपण फरशी स्वच्छ करण्यासाठी काय वापरतो, याच्यावर घरातल्या व्यक्‍तींचे आरोग्य अवलंबून आहे आणि म्हणूनच ब्लॅक फिनाईल वापरायचे का व्हाईट फिनाईल वापरायचे, हा निर्णय अतिशय महत्त्वाचा आहे. या दोन्हीत पहिला फरक म्हणजे व्हाईट फिनाईल काही मिनिटांत तयार होते, तर ब्लॅक फिनाईल तयार करायला काही तास लागतात. याला कारण म्हणजे व्हाईट फिनाईल कोल्ड प्रोसेसनी तयार केले जाते व या उलट ब्लॅक फिनाईल हॉट प्रोसेसनी तयार केले जाते. व्हाईट फिनाईलमध्ये फार थोडे घटक असतात व या उलट ब्लॅक फिनाईलमध्ये भरपूर असतात. 

ब्लॅक फिनाईलमध्ये फिनॉलिक कंपाऊंड नावाचा घटक असतो जो व्हाईट फिनाईलमध्ये नसतो. फिनॉलिक कंपाऊंडमध्ये रोगाणुरोधक (सॅनिटायझर शक्‍ती असते ज्यामुळे ब्लॅक फिनाईलच्या वापरामुळेच घरातील 99.9 टक्केे जंतू मारले जातात. याउलट व्हाईट फिनाईल 2-3 प्रकारच्या तेलांचे व सुगंधाचे कोल्ड प्रोसेसनी बनवलेले मिश्रण आहे. व्हाईट फिनाईलमध्ये फिनॉलिक कंपाऊंड नसल्यामुळे आपल्या घरातील संपूर्ण जंतू ते मारू शकत नाही. कुठल्याही रसायनामध्ये जंतुनाशक शक्‍ती किती आहे, हे तपासण्यासाठी रिडिअल वॉकर कोइफिशिअंट म्हणून टेस्ट असते. ही टेस्ट ब्लॅक फिनाईलच पास करू शकते, व्हाईट फिनाईल नाही आणि म्हणूनच भारत सरकार, अमेरिकी सरकार, तसेच युरोप, चिन, जपान इत्यादी पुढारलेले देश ब्लॅक फिनाईलच वापरा अशी शिफारस करतात. ब्लॅक फिनाईल हे जंतुनाशक आहे व व्हाईट फिनाईल हे दुर्गंधीनाशक. ब्लॅक फिनाईलला एक ठराविक उग्र वास असतो याउलट व्हाईट फिनाईलला लिंबू, गुलाब, चमेली इ. चा प्रसन्‍न वास असतो. व्हाईट फिनाईल हे ब्लॅक फिनाईल इतकेच रोगप्रतिबंधक आहे हा गैरसमज निव्वळ जाहिरातबाजीमुळे निर्माण केला आहे. 

जर्नल ऑफ अमेरिकन मेडिकल असोसिएशनमध्ये प्रसिद्ध झालेल्या प्रबंधामध्ये असे लिहिलेले आहे की, कोरोना व्हायरसनी संसर्गित झालेल्या व्यक्‍तींमुळे घरातील स्पर्श केलेले सर्व पृष्ठभाग दूषित होतात. घरामध्ये ब्लॅक फिनाईल सकाळ-संध्याकाळ दोनदा वापरल्याने कोरोना व्हायरसचा नाश होतो व कोव्हिड-19 चा संसर्ग थांबवला जाऊ शकतो, तसेच ब्लॅक फिनाईलच्या वापराने घरातील सर्व जिवाणू, जंतू व विषाणू 99.9 टक्के नष्ट होतात. ब्लॅक फिनाईलचा हा गुण व्हाईट फिनाईलमध्ये बिलकूल नाही.  

 

Back to top button