कोरोना बरा झाल्यानंतर… | पुढारी | पुढारी

कोरोना बरा झाल्यानंतर... | पुढारी

डॉ. प्राजक्ता पाटील

संपूर्ण जग गेल्या वर्षभरापासून कोरोनाचा मुकाबला करत आहे. कोट्यवधी लोक बाधित झाले असून अजूनही धोका टळलेला नाही. ऑक्टोबर 2020 मध्ये द लॅन्सेंटमध्ये प्रकाशित एका अहवालानुसार कोविड-19 हा तीन पातळीवर लोकांच्या आरोग्यावर प्रभाव टाकत असल्याचे शास्त्रज्ञांनी आणि संशोधकांनी म्हटले होते. आज आपण पहात आहोत की, कोरोनाबाधित लोकांना यातून बरे झाल्यानंतर काही महिन्यानंतर अनेक प्रकारच्या शारिरीक व्याधीचा सामना करावा लागत आहे. अशावेळी पोस्ट कोविड केअर ही अत्यंत महत्त्वाची बाब मानली जात आहे. 

कोणती लक्षणे दिसू शकतात? 

कोरोना रिकव्हर झाल्यानंतरही आपल्याला श्वास घेण्यास अडचण येत असेल, ताप येत असेल, छाती दुखत असेल, गोंधळाची स्थिती वाटत असेल, अशक्तपणा जाणवत असेल, पचनाच्या तक्रारी वाढल्या असतील, त्वचेवर ओरखडे पडत असतील, केस गळत असेल, स्नायू दुखत असेल,  डोके दुखत असेल, हृदयाचे धोके वाढत असेल किंवा निद्रानाश होत असेल तर ही पोस्ट कोविडची लक्षणे समजा. वयस्कर किंवा अगोदरपासून आजारी असणार्‍या लोकांतच नाही तर युवक आणि बरे झालेल्या लोकांमध्येही अनेक महिन्यानंतर अशी लक्षणे दिसू शकतात. अशावेळी निष्काळजीपणा दाखवू नये आणि डॉक्टराशी संपर्क साधावा. 

या गोष्टी लक्षात घ्या

संतुलित, पोषक आणि सकस भोजन करणे. आपल्या डायटचार्ट- मध्ये फळभाज्या, अंडी, डाळ, चिकन, कडधान्याचा समावेश करा. 

 शरीराला हायड्रेटेड ठेवण्यासाठी पाणी, ज्यूस आदींचे प्राशन करत राहवे. कोमट पाणी हे लाभदायी आहे. 

 दररोज वीस ते तीस मिनिटे वर्कआऊट, वॉकिंग, जॉगिंग, एरोबिक्स किंवा योगा करा. खास करुन प्राणायामावर अधिक भर द्या. यामुळे फुफ्फुसांची क्षमता वाढण्यास मदत होईल. तसेच श्वासासंबंधीच्या तक्रारी कमी होण्यास मदत होईल. तसेच मेंदूला भरपूर ऑक्सिजन मिळाल्यामुळे थकवा, नैराश्य यांसारख्या समस्यांची तीव्रताही कमी होईल. 

 सहा ते आठ तास झोप घ्या.

 तणावापासून दूर राहा. मानसिक शांततेसाठी दररोज दहा ते वीस मिनिटा ध्यान करा.

 वेळोवेळी ऑक्सिजनची पातळी, तापमान, रक्तदाब तपासावे.

कोविड-19 चे दुष्परिणाम

जागतिक आरोग्य संघटनेनुसार कोविडचा पहिला हल्ला हा फुफ्फुसावर होतो. परंतु तो अन्य अवयवांवरही परिणाम करतो. अवयवांवर परिणाम झाल्यास गंभीर आजार अधिकच किचकट होऊ शकतात. कोविडमुळे दीर्घ आणि कमी काळासाठी झालेल्या प्रभावाला पोस्ट कोविड सिंड्रोम असे नाव दिले आहे. यात पुढील गोष्टींचा समावेश आहे. 

 थकवा आणि श्वास घेण्यास अडचणी: कोरोना संसर्ग हा केवळ फुफ्फुसापुरतीच मर्यादित राहत नाही तर दुसर्‍या अवयवांपर्यंत देखील पोचतो. इटलीतील प्राप्त आकडेवारीनुसार कोविड-19 ने बरे झालेल्या रुग्णांपैकी सुमारे 87 टक्के रुग्ण हे थकवा आणि डिस्पेनोईया (श्वास घेण्यास मेहनत करणे) च्या तक्रारी करत आहेत.

 मूत्रपिंडशी निगडीत समस्या: इंटरनॅशनल सोसायटी ऑफ नेफ्रॉलॉजीच्या अहवालानुसार, जगभरात कोविडमुळे किडनीवर परिणाम झालेल्या रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. 

 हृदयाशी निगडीत समस्या: कोविडच्या आजारातून बरे झालेल्या रुग्णांत हृदयाशी संबंधीच्या तक्रारी वाढत चालल्या आहेत. हा संसर्ग हृदयाच्या मांसपेशीचे नुकसान करत आहे. त्यामुळे भविष्यात हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता राहते. तसेच हृदयाशी निगडीत अडचणी वाढवण्याचे काम करत आहे. 

फुफ्फुससंबंधी समस्या: न्यूमोनिया आणि डिप व्हेन थ्रोंबोसिसच्या कारणामुळे फुफ्फुसात सूज येेऊ शकते. कोविड-19 मुळे फुफ्फुसाशी संबंधित आरोग्याच्या तक्रारी वाढू शकतात. परिणामी कालांतराने श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. 

मानसिक आरोग्य: अमेरिकी सायकॉलॉजिकल असोसिएशनच्या एका सर्वेक्षणानुसार कोविड -19 मुळे मानसिक आरोग्यावर नकारात्मक प्रभाव पडत आहे.

Back to top button