नाचणीची आंबील कशी बनवावी?; आरोग्यासाठी आहे खूप फायदेशीर | पुढारी

नाचणीची आंबील कशी बनवावी?; आरोग्यासाठी आहे खूप फायदेशीर

आजकाल लोकांच्या आहारामध्ये फास्ट फूड, जंक फूडचा मोठ्या प्रमाणात समावेश झालेला आहे. सध्या लोकांचा आरामदायी जीवन जगण्याकडे कल असतो. त्यामुळे आहार आणि व्यायाम या दोन्ही गोष्टींकेड दुर्लक्ष होताना दिसत आहे. याचाच परिणाम लोकांच्या आरोग्यविषयक अनेक तक्रारी निर्माण होत आहेत.

आपले आरोग्य चांगले रहावे यासाठी सकस आहार घेणे गरजेचे आहे. याच आहारातील एक प्रतिकारशक्ती वाढवणारा पदार्थ म्हणजे नाचणीची आंबील. आपले गट मायक्रोबायोम सुदृढ राहण्यासाठी ही आपल्याला अतिशय उपयुक्त ठरते.

कशी बनवावी नाचणीची आंबिल?

नाचणीचे आंबील बनविणे पण खूप सोपे आहे. १ ग्लास नाचणीची आंबील बनविण्यासाठी २ चमचे नाचणीचे पीठ रात्रभर थोड्या पाण्यामध्ये भिजत घालणे.

दुसऱ्या दिवशी ९०० मिली पाणी उकळून त्यात हे पीठ ‘शिजवणे.

शिजवताना सतत हलवणे. थंड झाल्यानंतर त्यात १०० मिली ताक घालून ४ तास ठेवणे. ४ तासानंतर ही आंबील प्यावी.

नाचणीची आंबील प्यायल्याने होणारे फायदे

नाचणीमध्ये कॅल्शियम, प्रोटीन, आयर्न, मॅग्नेशिअम, पोटॅशिअम फायबर, कार्बोहायड्रेड्स हे पोषक घटक मोठ्या प्रमाणात मिळतात.
ताकामधून कॅल्शियम, फॉस्फरस व लॅक्टोबॅसिलस मिळते. नाचणी आंबील प्यायल्याने ॲसिडीटी, गॅस होणे, जळजळ होणे, अपचन असे पोटासंबंधित आजार होत नाहीत. तसेच अन्नपचन चांगल्याप्रकारे होते. पोट व्यवस्थित साफ होते. नाचणीची आंबील प्यायल्याने शरिरातील इन्सुलिनची पातळी नियंत्रित राहायला मदत मिळते.

– रणवीर राहुल पवार

Back to top button