देवगिरी एक्स्प्रेसवर दरोडा, तुफान दगडफेक करत प्रवाशांना लुटले, सिग्नलला कापड बांधून दरोडेखोरांचा हैदोस | पुढारी

देवगिरी एक्स्प्रेसवर दरोडा, तुफान दगडफेक करत प्रवाशांना लुटले, सिग्नलला कापड बांधून दरोडेखोरांचा हैदोस

लासूरस्टेशन; पोपट ठोकळ

कोथरूड रेल्वे स्टेशन जवळ अज्ञात आठ-दहा दरोडेखोरांनी गुरुवारी मध्यरात्री देवगिरी एक्स्प्रेसवर दरोडा टाकून लूटमार केली. याबाबत सविस्तर वृत्त असे आहे की, आठ ते नऊ जणांच्या टोळीने देवगिरी रेल्वेवर तुफान दगडफेक करत काही प्रवाशांचे मोबाईल व महिलांच्या अंगावरील दागिने हिसकावून नेल्याची घटना समोर आली आहे. सदर दरोडेखोर रुग्णवाहिकेतून आल्याचा संशय व्यक्त होत आहे.

सिकंदराबाद- मुंबई- देवगिरी एक्स्प्रेस औरंगाबादहून रात्री बारा वाजता मनमाड- मुंबईकडे निघाली होती. दरम्यान, अर्ध्या तासातच पोटूळ रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे पोहोचतात चालकाला तेथील सिग्नल बंद दिसले. त्याने स्टेशन मास्तरला कळविले. तोपर्यंत रेल्वे थांबताच डब्यांवर तुफान दगडफेक करत दरोडेखोरांनी झोपलेल्या महिला प्रवाशांच्या अंगावरील दागिने ओढण्यास सुरुवात केली. मोबाईल, पर्सही हिसकावल्या. प्रवाशांनी आरडाओरडा सुरू केला. मात्र संपूर्ण परिसर निर्मनुष्य असल्याने कुणालाही काही कळले नाही. सात ते आठ डब्यांमध्ये त्यांनी लूटमारीचा प्रयत्न केला आणि नंतर पळ काढला.

अर्ध्या तासानंतर रेल्वे मनमाडला रवाना झाली. तेथे पोलिस चौकशी करण्यात येऊन अनेकांची लूटमार झाल्याचे तपासात उघड झाले आहे. रेल्वेवर दरोडा पडण्याची ही गंभीर घटना आहे. त्यामुळे रेल्वे प्रवाशांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. घटनास्थळी शिल्लेगाव, दौलताबाद, औरंगाबाद, वाळूज येथील पोलिसांनी धाव घेतली. मात्र, अद्यापही दरोडेखोर हाती लागले नसल्याचे कळते.

हे ही वाचा :

Back to top button