‘कदंब’ ला अटकाव; चालकाला मारहाणप्रकरणी तिघा संशयितांना अटक | पुढारी

‘कदंब’ ला अटकाव; चालकाला मारहाणप्रकरणी तिघा संशयितांना अटक

हापसा; पुढारी वृत्तसेवा :  हरमल ते पणजी व्हाया चोपडे या कदंब बसला अटकाव करून फिर्यादी चालकास मारहाण केल्याप्रकरणी म्हापसा पोलिसांनी संशयित राजेश उर्फ लुडू केरकर (रा. साळगाव), प्रशांत शंभा भगत व मनोज हरजी (रा. केरी-पेडणे) या तिघांना अटक केली. दरम्यान, म्हापसा येथील प्रथमश्रेणी न्यायालयाच्या आदेशानुसार या संशयितांची रवानगी ही न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.

म्हापसा पोलिसांच्या माहितीनुसार, हा प्रकार काल, गुरुवारी सकाळी घडला. सकाळी 8.10 वा. हरमलवरून सुटणारी हरमल ते पणजी व्हाया चोपडे या मार्गावरील कदंब बस घेऊन फिर्यादी चालक मुकेश शेटगांवकर हे मार्गक्रमण करीत होते.

यावेळी हरमल टिटो येथे एका खासगी बसने कदंब बसला अटकाव केला. सदर खासगी बस चालक प्रशांत शंभा भगत व वाहक मनोज हरजी यांनी म्हापशात पोहचेपर्यंत कदंब बसला बाजू न देता मुद्दामहून सावकाश-सावकाश बस समोरून चालवून कदंब बसच्या प्रवासात अडथळा निर्माण केला. सकाळी 9.30 वा. बस म्हापसा बस स्थानकावर पोहचतास संशयितांनी राजेश (लुडू) केरकर या संशयितास सोबत बोलावून घेतले व या तिघांनी मिळून फिर्यादी कदंब बस चालकास शिवीगाळ करीत, मारहाण केली. शिवाय गंभीर परिणामाची धमकी दिली.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी संशयितांना पकडून पोलिस स्थानकात आणले. त्यानंतर फिर्यादी कदंब बस चालकाच्या तक्रारीच्या आधारे भादंसंच्या कलम 341, 504, 323, 506(2), 332 व 353 अन्वये गुन्हा नोंदवून तिन्ही संशयितांना अटक केली. तसेच सदर खासगी बस पोलिसांनी जप्त केली.

या प्रकरणी पुढील तपास पोलिस निरीक्षक निनाद देऊलकर यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलिस उपनिरीक्षक रिचा भोंसले व हवालदार सुशांत चोपडेकर हे करीत आहेत.

हेही वाचलंत का? 

Back to top button