कुडाळ : वेताळबांबर्डेत ट्रेलरला अपघात, सुदैवाने अनर्थ टळला! ग्रामस्थ आक्रमक | पुढारी

कुडाळ : वेताळबांबर्डेत ट्रेलरला अपघात, सुदैवाने अनर्थ टळला! ग्रामस्थ आक्रमक

कुडाळ, पुढारी वृत्तसेवा : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर अपघातांचे सत्र सुरूच कायम असून गुरूवारी रात्री उशिरा १२.३० वाजताच्या सुमारास वेताळ बांबर्डे पूल येथे ट्रेलर महामार्गालगत पलटी झाला. दैव बलवत्तर म्हणून या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. चालक आणि क्लिनर केबिनमध्ये अडकले. स्थानिक ग्रामस्थांनी त्यांना सुखरूप बाहेर काढले.

याठिकाणी महामार्ग चौपदरीकरणांतर्गत एका लेनचे काम अर्धवट स्थितीत असून हे ठिकाण अपघातांचा हाॅटस्पाॅट बनले आहे. मात्र याकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाचे दुर्लक्ष होत असून नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. वेताळबांबर्डे पुलानजिक एका लेनचे काम अर्धवट स्थितीत असून ही लेन अरुंद आहे. तेथील प्रकल्पग्रस्तांना भूसंपादनाचा मोबदला शासनाकडून अद्यापपर्यंत देण्यात आलेला नाही.

त्यामुळे याठिकाणचे काम गेली ३ वर्षे रखडले आहे. त्यामुळे या ठिकाणी वाहतूक असुरक्षित बनली आहे. वारंवार अपघाताच्या घटना घडत आहेत. मात्र, तरीही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाकडून दुर्लक्ष केले जात आहे. गुरूवारी रात्री साडेबारा वाजताच्या सुमारास गुजराहून गोवा फोंडा येथे लादी (स्टाईल) वाहतूक करणारा ट्रेलर या ठिकाणी लेनचा अंदाज न आल्याने महामार्गालगत पलटी झाला.

या ट्रेलरच्या केबीनमध्ये चालक आणि क्लिनर अडकले. स्थानिक ग्रामस्थांनी केबिनमधून त्यांना बाहेर काढले. दोघांनाही किरकोळ दुखापत झाली. अपघाताची तीव्रता लक्षात घेता, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. लगतच संदीप गोडकर यांचा फॅब्रिकेशनचा व्यवसाय आणि छोटेखानी घर असून गोडकर कुटुंबिय या अपघात प्रवण ठिकाणामुळे भितीच्या छायेखाली जीवन जगत आहे. अपघाताची माहिती मिळताच कुडाळ पोलीस ठाण्याचे पोलीस हेड कॉन्स्टेबल मंगेश जाधव आणि अमोल महाडिक यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मनसे तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे, निलेश उगवेकर, संदीप गोडकर आदींसह स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.

ग्रामस्थ आक्रमक, उपोषणाचा दिला इशारा

चौपदरीकरणांतर्गत संपादित केलेल्या जमिनीचा मोबदला शासनाने याठिकाणच्या प्रकल्पग्रस्तांना दिलेला नाही. त्यामुळे याडिकाणचे काम अर्धवट स्थितीत आहे. याकडे शासनाचे वारंवार लक्ष वेधत सकारात्मक मार्ग काढून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली. मात्र राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व लोकप्रतिनिधींचे याकडे दुर्लक्ष होत असून, तातडीने याबाबत आवश्यक ती कार्यवाही न झाल्यास वेताळबांबर्डे ग्रामस्थांच्या वतीने लवकरच महामार्गावर जन आंदोलन छेडले जाईल, असा इशारा वेताळबांबर्डे ग्रामस्थांच्या वतीने प्रसाद गावडे यांनी दिला आहे.

पहा व्हिडिओ : RRR ची स्टोरी ऐकुया कोल्हापूरच्या चौकातून | RRR story And Kolhapur

Back to top button