एंजिओएडिमा जाणून घ्या | पुढारी

एंजिओएडिमा जाणून घ्या

एंजिओएडिमा (Angioedema) यामध्ये त्वचेच्या आतील बाजूने सूज येते. हा रोग कुठल्याही अ‍ॅलर्जीमुळे होऊ शकतो. यामध्ये हिस्टेमाइन किंवा अन्य रसायने रक्‍तात मिसळतात. तुमच्या प्रतिकारशक्‍तीला कुठल्यातरी अ‍ॅलर्जीशी सामना करावा लागला तर शरीर हिस्टेमाइनसारखी रसायने उत्पन्‍न करते.

हा रोग का होतो, याची कारणे अद्यापी स्पष्ट झाली नसली तरीही काही गोष्टींच्या संपर्कात आल्याने हा रोग होऊ शकतो, अशी शक्यता वर्तविली जाते. उदा. प्राण्यांचे केस, त्वचा यातून पडणारे जंतू, पाणी किंवा सूर्याच्या प्रखर किरणांच्या संपर्कात आल्याने, अंडं, मासळी, दूध किंवा काही फळे खाल्ल्याने, हवेतल्या फुलांच्या पराग कणांमुळे, काही औषधांमुळे किंवा कीडा-मुंगीच्या चावण्याने हा रोग होऊ शकतो.

लक्षणे ओळखा –

या रोगात डोळे, किंवा ओठांच्या जवळ सूज येते. पाय आणि गळ्याजवळ ही सूज आतून आल्याचे कळून येते. ही सूज त्वचेच्या आतून येत असल्याने ती पसरू शकते. त्यामुळे दुखणे आणि खाजही सुटू शकते. त्याशिवाय खालील गंभीर लक्षणे दिसून येतात.

  • तीव्र पोटदुखी
  • श्‍वासोच्छ्वासास त्रास
  • चेहर्‍याला सूज येणे

या रोगाकडे लक्ष न दिल्यास त्याचे गांभीर्य वाढू शकते. गंभीर लक्षणे दिसू लागल्यास डॉक्टरी मदत घेणे गरजेचे आहे. एंजिओएडिमा वर (Angioedema) उपचार केले तरी कोणतीही सुधारणा होत नसेल, सूज खूप वाढून दुखणे आणि त्रास खूप वाढला असेल, याआधी असा त्रास कधी झाला नसल्यास.श्‍वासोच्छ्वास करण्यास त्रास किंवा चक्‍कर येणे, शुद्ध हरपणे.

वरील सर्व लक्षणांमध्ये सतर्कता बाळगून डॉक्टरांकडे धाव घेणे गरजेचे आहे; अन्यथा रोग बळावू शकतो. हा त्रास जर अ‍ॅलर्जीमुळे होत असेल, तर डॉक्टर एड्रिनिलचे इंजेक्शन देतात. मात्र हा त्रास अनुवंशिक असेल, हे इंजेक्शन कुचकामी ठरते. त्यामुळे वेगळे उपचार करावे लागतात.

शरीरात साठणार्‍या द्रवरूप गोष्टींमुळे हा त्रास झाला असेल तर तो अधिक गंभीर असतो. त्यामुळेच डॉक्टर अ‍ॅलर्जीक पदार्थांपासून दूर राहण्याचा सल्ला देतात. या सर्व लक्षणांचा विचार करून डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार करावा. हा रोग बिकट परिस्थितीत पोहोचणार नाही याची काळजी निश्चितपणे घ्या.

शरीराला जर काही त्रास होत असेल तर ते आपल्याला लक्षणं दाखवते. ती लक्षणं आपण समजून घ्यायला हवी. ती समजल्यानंतर त्यावर वेळेवर आणि योग्य उपचार केल्यास त्याचा दुष्परिणाम रोखता येतो. अन्यथा शरीरावर परिणाम होतात.

Back to top button