कथा,कंजूष सावकार | पुढारी | पुढारी

कथा,कंजूष सावकार | पुढारी

फार वर्षांपूर्वी एका शहरात एक धनाढ्य सावकार राहत होता. आयुष्यभर केवळ संपत्ती जमविण्यात त्याने धन्यता मानली. त्याच्या कंजूष वृत्तीमुळे त्याचा कोणी मित्र नव्हता. त्या सावकाराचे कपडे शिवणारा शिंपी काही कारणामुळे आकस्मात मरण पावला. सावकारही फार आजारी होता. आता सावकाराचे फार दिवस राहिलेले नाहीत हे पाहून त्याचे नातेवाईक त्याच्या भेटीखातर येऊ लागले. शिंप्याच्या मुलानेही विचार केला की त्याच्या वडिलांचा व सावकाराचा चांगला स्नेह होता तेव्हा सावकाराच्या घरी एकदा जाऊन त्याची भेट घ्यावी. ठरविल्याप्रमाणे तो सावकाराच्या घरी गेला व त्याने सावकाराला एक सुई भेट दिली. तो सावकाराला म्हणाला की, त्याचे वडील स्वर्गात जाताना ही सुई सोबत न्यायला विसरले. स्वर्गात गेल्यावर त्याच्या वडिलांना ती सुई देण्याची विनंती त्याने सावकाराला केली.

सावकाराने त्याची विनंती मान्य केली. मात्र सुई कुठे ठेवावी हे त्याला कळेना. सुई कपड्यात ठेवावी तर मृत्यूनंतर कपडे जाळले जाणार. केसांत किंवा शरीराच्या अन्य भागात टोचून ठेवावी तर संपूर्ण शरीरच जळल्यावर सुई कशी नेणार? सावकार जेवढा विचार करू लागला तेवढा तो जास्तच गोंधळू लागला. त्याने शिंप्याच्या मुलाला बोलाविले व तो म्हणाला, “मला माफ कर. मी सुई स्वत:बरोबर स्वर्गात घेऊन जाऊ शकत नाही.’’ शिंप्याचा मुलगा हसत म्हणाला, “जर तुम्ही साधी सुई स्वत:बरोबर स्वर्गात नेऊ शकत नाही. मग तुमची अफाट संपत्ती कशी नेणार?’’सावकाराला स्वत:च्या लोभीपणाची व कंजूष वृत्तीची लाज वाटली. त्याने मृत्युपूर्वी आपली सर्व संपत्ती गरजूंना दान केली.

संबंधित बातम्या
Back to top button