ट्विटरच्या जॅक डोर्सीच्या राजीनाम्याचा नेमका अर्थ काय? | पुढारी

ट्विटरच्या जॅक डोर्सीच्या राजीनाम्याचा नेमका अर्थ काय?

योगेश कानगुडे

मायक्रोब्लॉगिंग साईट ट्विटरचे सीईओ जॅक डोर्सी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. जॅक डोर्सी यांची जागा पराग अग्रवाल घेणार आहेत. कंपनी यापुढील काळात विकेंद्रीकरण, वेब 3.0, क्रिप्टो, NFTs, सामाजिक वाणिज्य, व्हिडिओ यावर लक्ष केंद्रित करणार आहे. या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी अग्रवाल यांची निवड ट्विटरसाठी किती फलदायी ठरते तो येणार काळच आपल्या सांगेल.

पराग यांनी यापूर्वी ट्विटरचे सीटीओ पद भूषवले आहे. आता त्यांना पदोन्नती देऊन ट्विटरचे सीईओ बनवले आहे. जॅक डोर्सी ट्विटरचे सीईओ झाल्यांनतर ट्विटर आणि भारत सरकारसोबत बराच काळ वाद सुरू होता. केंद्र सरकारने नवा आयटी कायदा लागू केल्यामुळे ट्विटर आणि सरकारमध्ये संघर्ष निर्माण झाला होता. अशा परिस्थितीत कदाचित भारतासोबतच्या संघर्षामुळे जॅक डोर्सी यांना सीईओ पद सोडावे लागले अशी चर्चा होती. पण ते तसे नाही. त्यांच्या जाण्याला त्यांच्याकडे असणारी दोन पदे, गुंतवणूकदारांची नाराजी आणि कंपनीची आर्थिकस्थिती कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे.

ट्विटर आणि पेमेंट प्लॅटफॉर्म स्क्वेअर या दोन्हीचे मुख्य कार्यकारी जॅक डोर्सी यांनी त्यांना अब्जाधीश बनवणाऱ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील त्यांचा कार्यकाळ समाप्त केला आहे. ट्विटरचे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी पराग अग्रवाल हे तात्काळ मुख्य कार्यकारी म्हणून डोर्सीची जागा घेतील. कंपनीच्या निवेदनानुसार, 2022 मध्ये त्यांचा कार्यकाळ संपेपर्यंत डॉर्सी बोर्डावर राहतील. “मी ट्विटर सोडण्याचा निर्णय घेतला आहे कारण मला विश्वास आहे की कंपनी तिच्या संस्थापकांपासून पुढे जाण्यास तयार आहे,” असे डॉर्सी यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे. “पराग जिज्ञासू, संशोधक, तार्किक, सृजनशील, नवं मागणारा, स्वतःबद्दल सतर्क असणारा आणि विनम्र आहे. तो त्याच्या ह्रदय आणि आत्म्यातून नेतृत्व करेन. तो असा व्यक्ती आहे ज्याच्याकडून मी दररोज शिकतो. मला आपल्या कंपनीचा सीईओ म्हणून त्याच्यावर पूर्ण विश्वास आहे,” असंही जॅक डोर्सी यांनी म्हटलं आहे. पराग अग्रवाल, ज्यांनी स्टॅनफोर्ड विद्यापीठातून संगणक शास्त्रात पीएचडी केली आहे, 2011 मध्ये सोशल मीडिया विश्वातील दिग्गज कंपनीमध्ये ते रुजू झाले. 2017 मध्ये मुख्य तंत्रज्ञान अधिकारी बनले. पराग हे कंपनीची तांत्रिक आघाडी कशी असेल, मशिन लर्निंगचा वापर कसा करता येईल आणि सुधारणांसदर्भातील निर्णयांचे प्रमुख आहेत.

काही तज्ञ या बदलाला तार्किक आणि पुढील वाटचाल म्हणून पाहतात. ट्विटर सीईओ पदाचा राजीनामा देण्याचा जॅक यांचा निर्णय आश्चर्यकारक असला तरी, पूर्णपणे अनपेक्षित नाही. ट्विटर आणि स्क्वेअर या दोन्ही प्लॅटफॉर्मच्या सीईओ पदाची जबाबदारी डोर्सी यांच्याकडे होती. त्यांच्या काही निर्णयावर आणि दुहेरी भूमिकेवर गुंतवणूकदार निराश होते. आव्हानात्मक काळातही ट्विटरला एका उंचीवर घेऊन जाण्यात ते यशस्वी झाले. डोर्सी यांना कठीण आणि वादग्रस्त निर्णय देखील घ्यावे लागले, उदा. विद्यमान अध्यक्षांच्या ट्विटर खात्यावर बंदी घालणे, प्लॅटफॉर्मवर ऑनलाइन गैरवर्तन, छळवणूक हाताळणे आणि जागतिक साथीच्या आजारादरम्यान ट्विटद्वारे पसरलेल्या चुकीच्या माहितीशी लढा देणे. याशिवाय, जॅकच्या नेतृत्वाने ट्विटरला उत्पादन विकासाची गतिविधी वाढवण्यास मदत केली. अग्रवाल यांची उत्तराधिकारी म्हणून निवड केली, कारण ते केवळ डॉर्सीचे मित्रच नाहीत तर क्रिप्टो आणि वेब 3.0 चे खंदे समर्थक आहेत. हे प्लॅटफॉर्म येणाऱ्या वर्षात कंपनीच्या केंद्रस्थानी असणार आहेत.

डॉर्से यांच्या राजीनाम्याचा निर्णय हा नावीन्यपूर्णतेद्वारे कंपनीची कामगिरी सुधारण्याचे स्पष्ट संकेत आहेत. सध्या आपण सोशल नेटवर्किंगच्या एका नवीन युगात प्रवेश करत आहोत, जेथे वापरकर्ते वेळोवेळी लॉग इन करतात अशा डिव्हाइसवरील अॅप्सपेक्षा नेटवर्क अधिक अस्तित्वात असू शकतात आणि असणे आवश्यक आहे. नवीन युगात यशस्वी होण्यासाठी, नेटवर्कने त्यांच्या वापरकर्त्यांच्या जीवनात अधिक चांगल्या प्रकारे समाविष्ट होण्याचे मार्ग शोधले पाहिजेत.

फेसबुक हे मेटाव्हर्सकडे झुकत आहे. परंतु ट्विटरला मुख्य प्रवाहातील ग्राहकांना जोडून घेण्यासाठी अनेक वर्ष संघर्ष करावा लागला आहे. डॉर्से यांचा राजीनामा हा ट्विटर नेटवर्कला आता नवीन आणि वेगळे नेतृत्व हवे आहे याचे स्पष्ट संकेत आहेत. त्याचबरोबर डॉर्से यांच्या राजीनाम्यामागे कंपनीची ढासळणारी आर्थिक बाजू हे देखील एक महत्वाचे कारण आहे.

कंपनीच्या महसूलामध्ये कपात होत असताना ट्विटर वाढीचे नवीन उपाय शोधत आहे. ट्विटर हे पत्रकार आणि सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असले तरी, नेटवर्क ग्राहकांसह मार्केट शेअर मिळवण्यासाठी संघर्ष करत आहे. खासकरून जेव्हा जाहिरात व्यवसायिक आणि मार्केटर्स ग्राहकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. टिकटॉकसारख्या अपस्टार्ट नेटवर्क्समध्ये अब्जावधी डॉलर्सच्या जाहिराती येत आहेत. ट्विटरने अशा परिस्थितीशी जुळवून घेण्याचे मार्ग शोधले पाहिजेत. नवीन नेतृत्वात ते साध्य करण्याची क्षमता आहे.

एक गोष्ट स्पष्ट आहे की अग्रवाल यांना यासाठी योजनाबद्द काम करावे लागेल. कंपनीचा महसूल वाढवणे, प्लॅटफॉर्मचा युजरबेस वाढवणे आणि उत्पादनातील नाविन्यपूर्णतेला चालना देणे, या सर्व गोष्टी आव्हानात्मक ट्रेडिंग मार्केटमध्ये आणि कडक नियमांच्या अधीन राहून काम करावे लागेल.

सीईओ बदलण्याच्या निर्णयामुळे ट्विटरला यश मिळण्याची शक्यता आहे. पराग अग्रवाल हे जॅकने तयार केलेल्या मार्गावर नवीन गोष्टी पादाक्रांत करण्यासाठी तयार आहेत. ज्यात विकेंद्रीकरण, वेब 3.0, क्रिप्टो, NFTs, सामाजिक वाणिज्य, व्हिडिओ यावर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. शेवटी हा निर्णय घेणे ट्विटरला कठीण गेले असेल. पण आता निर्णय झाला आहे. पराग अग्रवाल यांची निवड ट्विटरसाठी किती फलदायी ठरते तो येणार काळच आपल्या सांगेल.

 

Back to top button