Thyroid Problems | थायरॉईडग्रस्त आहात? ‘या’ गोष्टी टाळाव्यात | पुढारी

Thyroid Problems | थायरॉईडग्रस्त आहात? 'या' गोष्टी टाळाव्यात

डॉ. भारत लुणावत

थायरॉईड हे एक संप्रेरक किंवा हार्मोन आहे. शरीरातील आयोडीन घेऊन थॉयरॉईड ग्रंथी हे संप्रेरक तयार करतात. शरीराचे मेटाबोलिझम किंवा चयापचय क्रिया योग्य राहण्यासाठी हार्मोन्स गरजेचे असतात. थायरॉईड ग्रंथी गरजेपेक्षा जास्त संप्रेरके तयार करतात तेव्हा थायरॉईड वाढले असे आपण म्हणतो. (Thyroid Problems)

थायरॉईड वाढल्यास खूप समस्या निर्माण होतात. महिलांना याचा अधिक त्रास होतो. त्यामुळे वजन वाढते, बेचैनी, झोप नीट न येणे, अनियमित मासिक पाळी आणि हृदयाची धडधड वाढणे यासारखे त्रास होतात.

या समस्येवर वेळीच योग्य उपचार झाले पाहिजेत. त्यासाठी डॉक्टरांची भेट घ्यावी. थायरॉईडची समस्या नियंत्रित करणे शक्य असते. त्याशिवाय काही गोष्टींचे पथ्य जरुर पाळले पाहिजे. अन्यथा थायरॉईडमुळे होणार्‍या समस्या वाढू शकतात. थायरॉईडमध्ये कोणत्या गोष्टी टाळाव्यात किंवा पथ्य पाळावे ते पाहूया.

कॅफिन ः कॅफिनच्या सेवनाने थेट थायरॉईडवर परिणाम होत नाही; पण काही समस्या ज्या थायरॉईडमुळे वाढतात त्यात वाढ होते, जसे बेचैनी आणि झोपेत अडथळे. त्यामुळे कॉफी पिणे शक्यतो टाळावे.

अतिआयोडीनयुक्त आहार ः थायरॉईड ग्रंथी शरीरातून आयोडीन घेऊनच थायरॉईड हार्मोन्स तयार करते. त्यामुळे थायरॉईडचे प्रमाण वाढल्याने ज्या लोकांना त्रास होतो अशा लोकांनी आयोडीनचे अधिक प्रमाण असणारा आहार व्यर्ज्य करावा. मासे आणि आयोडीन मीठ वापरू नये.

अल्कोहोल ः दारू, बीअर इत्यादींमुळे शरीराची उर्जा पातळी प्रभावित होते. त्यामुळे थायरॉईडने ग्रस्त लोकांच्या झोपेत अडथळा येण्याची तक्रार वाढते. त्याशिवाय ऑस्टिओपोरोसिसचा धोकाही वाढतो. दारू पिणे तसेही कोणाहीसाठी योग्य नाहीच. कारण, त्यामुळे स्थूलता वाढते.

वनस्पती तूप ः भारतात सर्वसाधारणपणे वनस्पती तूप हे डालडा नावाने ओळखते जाते. वनस्पती तेल हायड्रोजनचा वापर करून तुपामध्ये रूपांतरित केले जाते. या तुपाचा वापर बाहेर मिळणार्‍या खाद्यपदार्थांच्या निर्मितीसाठी केला जातो. त्यामुळे चांगले कोलेस्ट्रॉल कमी होते आणि वाईट कोलेस्ट्रॉल वाढते. थायरॉईड वाढल्याने जे त्रास होतात त्याच्या प्रमाणात वाढ होते.

लाल मांस- लाल मांसात सॅच्युरेटेड फॅट आणि कोलेस्ट्रॉल असते. त्यामुळे वजन खूप वेगाने वाढते. थायरॉईडने ग्रस्त व्यक्तीचे वजन तसेही वाढतेच. लाल मांस खाल्ल्याने ते अधिक वाढते. त्याशिवाय लाल मांस खाल्ल्याने थायरॉईडच्या रोग्यांच्या अंगाची जळजळ होत असल्याची तक्रारही ते करतात. त्याऐवजी चिकन खाल्लेले चालू शकते. चिकनमध्ये प्रथिनांचे प्रमाण अधिक असते तसेच त्याने वजन वाढण्याची शक्यता नसते. (Thyroid Problems)

Back to top button