पिंढरी दुखण्याचा त्रास, जाणून घ्या कारणे आणि उपाय | पुढारी

पिंढरी दुखण्याचा त्रास, जाणून घ्या कारणे आणि उपाय

डॉ. प्राजक्ता पाटील

काहींना गुडघ्याखालचा भाग म्हणजेच पिंढरी दुखण्याचा त्रास वरचेवर होतो. साधारणपणे स्नायूंवर ताण पडल्याने किंवा ओढले गेल्याने पिंढरी दुखते. ( legs pain )

पिंढरी दुखणे किरकोळ असेल तर थेरपी किंवा बर्फ लावणे आदी माध्यमातून हे दुखणे बरे होऊ शकते. या दुखण्यामागे अनेक कारणे असू शकतात.

स्नायू मुरगळणे किंवा ताणणे

स्नायूंवर ताण पडल्याने किंवा मुरगळ्याने दुखणे वाढते. असा अचानक त्रास झाल्यास घाबरू नका कारण ही सर्वसाधारण समस्या आहे. अधिक व्यायाम केल्याने, पळाल्याने, उड्या मारल्याने किंवा एकाच स्थितीत बराच काळ बसल्यानेदेखील स्नायू ताणले जातात.

मुका मार

कोणत्याही कारणांमुळे पायाला मार लागू शकतो. अशा वेळी पिंढरीत असह्य वेदना होतात. कोशिकांची हानी होते आणि त्वचा निळी पडते. अर्थात, हे दुखणे आपोआप बरे होऊ शकते. पायांना पुरेसा आराम दिल्याने, मुका मारामुळे आलेली सूजही कमी होते.

डायबेटिक पॅरिफेरल न्यूरोपॅथी

पायांच्या शिरांवर प्रभाव पडतो तेव्हा डायबेटिक पॅरिफेरल न्यूरोपॅथीसारखी स्थिती तयार होते. त्याची तीव्रता वाढल्यानंतर हात, पाय, मांडी याचे दुखणे सुरू होते. यात पिंढर्‍यादेखील त्रास देतात. मधुमेह असलेल्या व्यक्तीला पिंढरीचे दुखणे कायमच राहते. रात्री शांतपणे झोप लागत नाही. अशा वेळी काही मंडळी निकॅप घालतात किंवा घरातील मंडळींना पिंढर्‍या दाबायला सांगतात. त्यानंतरच त्यांना आराम पडतो.

सायटिका

स्नायूला नियंत्रित करण्यार्‍या पेशींवर जेव्हा परिणाम होतो, तेव्हा सायटिका आजार निर्माण होतो. ही शीर पायाच्या खाली गुडघ्याच्या पाठीमागे असते. याचे दुखणे स्नायूला त्रासदायक ठरते. या कारणांमुळे पिंढरी सुन्न होते आणि अनेकांना त्याच्या उपचारासाठी ऑपरेशनही करावे लागते.

डीप व्हेन थ्रांबोसिस

जेव्हा एखाद्या खोलवरच्या शिरेमध्ये रक्त साकळते तेव्हा ती शीर हाताची किंवा पिंढरीची असू शकते. अशा वेळी त्यास डीप व्हेन थांब्रोसिस म्हणजेच डिव्हीटी असे म्हणतात. हा त्रास अधिक धूम्रपान केल्यानेदेखील होते.

स्नायूंवरचा ताण

सर्वसाधारपणे स्नायूंना थकवा आल्याने किंवा त्याचा अधिक वापर केल्यानेदेखील दुखणे उद्भवते. याशिवाय पोहणे, सायकल चालवणे किंवा वजन उचलण्यानेदेखील स्नायूंवर ताण पडतो.

चप्पल, शूजची योग्य निवड

पायाला आराम वाटेल अशाच प्रकारच्या शूज किंवा चप्पलची निवड करायला हवी. चप्पलेचा आकार लहान-मोठा राहिल्यास त्याचा ताण पिंढरीवर पडतो आणि दुखणे सुरू होते.

सक्रिय राहा

दररोज सकाळी नियमित रूपाने व्यायाम केल्याने पिंढरीसह शरीराच्या अनेक स्नायूंत सक्रियता राहते. त्यामुळे आपल्या दिनक्रमात व्यायाम करणे, पायी फिरण्याचा समावेश करायला हवा.

पाण्याचे प्रमाण कमी असेल तर पिंढरीत दुखणे सुरू होते. त्यामुळे पुरेशा प्रमाणात पाणी घेतले पाहिजे आणि स्नायूंवरचा ताण कमी करायला हवा. स्नायूंना स्ट्रेच दिला तर पिंढरीचे दुखणे कमी होऊ शकते. अशा वेळी केवळ पिंढरीला मजबुती येत नाही, तर त्रासही कमी होतो. ( legs pain )

Back to top button