Epigraphy Career : एप्रिग्राफीमध्ये करिअर करताना… | पुढारी

Epigraphy Career : एप्रिग्राफीमध्ये करिअर करताना...

स्वाती देसाई

इतिहासात अनेक गूढ रहस्ये दडलेली असतात. ती योग्यरीतीने जगासमोर मांडणे आव्हानात्मक बाब आहे. हे आव्हान एपिग्राफिस्टस् समर्थपणे पेलतात. जगातील ऐतिहासिक तथ्ये, गूढ, रहस्ये जाणून घेण्यात आपल्याला आवड असेल आणि ते सर्वांसमोर आणण्याबाबत उत्सुक असाल तर आपण उत्तम एपिग्राफिस्टमधील करिअर आपली वाट पाहत आहे असे समजा. (Epigraphy Career )

एपिग्राफी हे असे शास्त्र आहे की, त्याच्या आधारे प्राचीन लिपी आणि भाषा जाणून घेतली जाते. आपल्याला किल्ले, राजवाडे, गडकोट, प्राचीन तलाव याबाबत नेहमीच उत्सुकता असते. एखाद्या ठिकाणाला भेट दिल्यानंतर तेथील माहितीफलकाच्या आधारे आपण वास्तूचे महत्त्व जाणून घेतो. विशेष म्हणजे, किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळच ऐतिहासिक घटनांचा संदर्भ सांगणारा भला मोठा फलक असतो; पण ही माहिती कशाच्या आधारे घेतली जात असेल, असा प्रश्न पडणे साहजिकच आहे.

एपिग्राफिक हे तत्कालीन पुराव्यांच्या आधारे इतिहासकालीन घटनांची मांडणी करत असतात. एपिग्राफिक होण्यासाठी चिकित्सक वृत्ती, संशोधन वृत्ती आणि विश्लेषक बुद्धी असणे गरजेचे आहे. इतिहासजमा होणाऱ्या जुन्या परंपरा, सभ्यता, संस्कृती जाणून घेण्याची, त्यात संशोधन करण्याची, समजून घेण्याची इच्छा असेल आणि त्यासंबंधी आणखी काही तथ्य जगासमोर मांडायचे असेल तर एपिग्राफीमध्ये एक चांगले करिअर होऊ शकते. एपिग्राफी ही विविध प्राचीन भाषा, संकेत सांगणारे अभिलेख वाचण्याची कला आहे. एक एपिग्राफिस्ट इतिहासाची मांडणी करताना उपलब्ध पाषाण, ताम्रपट, शिलालेख, नाणी, लाकडावरील प्राचीन आणि अज्ञात हस्तलिपीचा शोध घेतो, तो समजून घेतो आणि नंतरच त्याचा अनुवाद करतो. एपिग्राफ्स हे इतिहासातील स्थायी रूपात आणि सर्वाधिक प्रमाणित दस्तावेज मानले जातात. यात ऐतिहासिक घटनांच्या तारखांपासून वंशावळीपर्यंत संपूर्ण माहिती उपलब्ध असते.

अभ्यासक्रम

या क्षेत्रात करिअर करण्यासाठी एपिग्राफी अभ्यासक्रम करणे गरजेचे आहे. इतिहासात पदवी असण्याबरोबरच त्यानंतर एपिग्राफीमध्ये पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा करू शकता. आपल्याकडे राष्टीय, परदेशी भाषा तसेच प्रांतीय भाषा जसे की संस्कृत, कन्नड, मल्याळम्, तेलुगू, अरबी, फारसी किंवा तमिळ भाषांतील पदवी किंवा पदविका असणे आवश्यक आहे. (Epigraphy Career )

संधी

आपण आर्किलॉर्जिकल सर्व्हे ऑफ इंडियाच्या एपिग्राफी शाखेत वेगवेगळ्या भाषांच्या विविध पदांवर काम करू शकता. वेगवेगळ्या राज्यांतदेखील पुरातत्त्व विभाग आहे आणि तेथे एपिग्राफिस्ट म्हणून काम करू शकता. याशिवाय सर्व प्रमुख संग्रहालयांत क्युरेटर, कीपर, डेप्युटी कीपर, गॅलरी असिस्टंट ही पदे असतात. त्यासाठी एपिग्राफिस्टची निवड केली जाते. आपण परदेशातही एपिग्राफिस्ट म्हणून सेवा बजावू शकता.

Back to top button