Yearly Horoscope 2023 : कुंभ: संमिश्र फल देणारे वर्ष | पुढारी

Yearly Horoscope 2023 : कुंभ: संमिश्र फल देणारे वर्ष

  • होराभूषण : रघुवीर खटावकर

कुंभ रास : ही रास वायू तत्त्वाची आहे. या राशीत धनिष्ठा नक्षत्र 3 रे, 4 थे चरण, शततारका नक्षत्र, पूर्वा भाद्रपदा नक्षत्र, 1, 2, 3 चरणे असून ही नक्षत्रे अनुक्रमे पृथ्वी, जल, अग्नी तत्त्वाची आहेत.

या राशीत कोणताही ग्रह उच्च किंवा नीच फळ देत नाही. कुंभ राशीत स्वामी शनी आहे. त्याचबरोबर हर्षललाही याचे स्वामित्व आहे. ही शास्त्रज्ञाची व संशोधकांची रास समजली जाते. शनीच्या2 राशी पैकी कुंभ ही मूलत्रिकोण राशी असल्यामुळे अत्यंत बलवान आहे. या राशीत अत्यंत चिकाटीने काम करण्याची क्षमता असते. या व्यक्ती खर्‍या अर्थाने ‘साधी राहणी व उच्च विचारसरणी’ या उक्तीचे पालन करणार्‍या असतात. रस्त्याने निघाल्या तर दिसेल त्या व्यक्तीशी थांबून ते विचारपूस करत असतात. यांना एकांत प्रिय असतात. हे रात्रंदिवस चिकाटीने संशोधन करून शोध लावतात. व त्याचा फायदा इतर मनुष्य प्राण्यांचा होत असतो. यावर्षी शनी दि. 17 जाने 2023 रोजी कुंभ राशीत प्रवेश करेल. तो कुंभ राशीसाठी रौप्य पादाने येत असून साडेसातीतही कुंभ राशी व्यक्तींना शुभ फले मिळत राहतील.

शनी कुंभ स्वत:च्या राशीत असल्यामुळे कुंभ राशी व्यक्ती अतिशय महत्त्वाकांक्षी असतील, पण खूप खर्चिक स्वभावाच्या राहतील. स्वत:च्या जोडीदाराच्या व वडिलांच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. भावंडांनाही कष्ट होतील. एखादा आजार उद्भवू शकतो. दूरचे प्रवास घडतात. विघ्ने, द्रव्यहानी, गंडांतर, उदासीनता, विलंब इत्यादींचा अनुभव येईल.

या वर्षी दि. 18 फेब्रुवारी 2023 रोजी नेपच्यून मीन राशीत प्रवेश करील. तो कुंभ राशीसाठी लोह पादाने येणार असून अधिकचे कष्ट सूचित कगरत आहे. नेपच्यून मीन राशीत 14 वर्षे राहणार आहे. तो सर्वांना अतिशय संवेदनशील बनविणार आहे. कुंभ राशीच्या द्वितीय स्थानातील नेपच्यून या कुंभ राशीच्या व्यक्तींच्या कुटुंबात अनाकलनीय समस्या निर्माण करू शकतील. काहींना किडनीसारखे विकार त्रस्त करतील.

यावर्षी गुरू दि. 21 एप्रिल 2023 पर्यंत मीन राशीत राहील. तो कुंभ राशीला दुसरी असल्यामुळे विवाह, धनप्राप्ती, संतती प्राप्ती, विद्या संपादन इ. सर्वच बाबतीत साडेसातीतही उत्तम फले मिळत राहतील. गुरू दि.21 एप्रिल 2023 रोजी मेष राशीत प्रवेश करील. तो कुंभ राशीसासाठी ताम्रपादाने येऊन श्री प्राप्ती म्हणजे धनसंपदा, विद्या, यश यांची प्राप्ती करून देणारा आहे.

मेष राशीतील गुरू कुंभ राशीला तिसरा आहे. अगदी नेहमी कामास लागणार्‍या कष्टापेक्षा जास्त कष्ट घ्यावे लागतील. तेव्हा काम होईल. जवळच्या व्यक्तींचा विरह जाणवेल. मित्र विरह जाणवेल. मानसिक उन्नती होईल. प्रवास सुखकर होईल. लेखन व्यवसाय चांगला चालेल.
कुंभ राशीला रवी 3 रा मेषेत (एप्रिल, मे) 6 वा कर्केत(जुलै- ऑगस्ट), 10 वा 11 वा वृश्चिकेत धनूत (नोव्हेंबर-डिसेंबर, डिसेंबर-जानेवारी) नेहमीच उत्तम फळे देतो. या काळात सर्व कामांना यश मिळेल. सृजनशीलता राहील. कमी श्रमात संधी लाभेल. कार्यसिद्धी होऊन मोबदला मिळेल.

कुंभ राशीला रवि 4 था वृषभेत (मे-जून) 8 वा कन्येत (सप्टेंबर-ऑक्टोबर) 12 वा मकरेत (जाने.-फेब्रु.) असताना घरगृहस्थीची काळजी राहील. धंद्यात मंदीचे वातावरण राहील. धंद्यात स्पर्धा जाणवेल. मोठ्या प्रमाणात खर्च होईल. मोठे खर्च निघतील.
या वर्षात मंगळाचे भ्रमण वृषभ ते वृश्चिक राशीतून होईल. वृषभेतील भ्रमणात (जाने.-फेबु्र.-मार्च) पोटाची तक्रार जाणवेल. कर्क सिंह राशीतील भ्रमणात (मे जून जुलै) मानसिक भावनिक दडपण राहील.

शुक्राचे कर्क सिंह राशीतील भ्रमणात (जून-जुलै-ऑगस्ट) धंद्यात स्पर्धा जाणवेल. भावनिक ताणतणाव निर्माण होतील.
शुक्राचे वृश्चिक राशीतील भ्रमणात (डिसेंबर) कामाकडे दुर्लक्ष झाल्यास नुकसान होऊ शकेल. प्लुटो कुंभ राशीच्या 12 व्या स्थानी आहे. मोठे दरोडे पडून आर्थिक नुकसान होऊ शकेल किंवा पूर्वी केलेल्या षड्यंत्रात सापडाल. त्याचे फळ भोगावे लागेल. एकंदरीत संमिश्र फल देणारे वर्ष राहील.

Back to top button