Uttar Pradesh Assembly Election राज्यरंग : शेवटचा डाव..? | पुढारी

Uttar Pradesh Assembly Election राज्यरंग : शेवटचा डाव..?

रशिद किडवई (ज्येष्ठ राजकीय विश्लेषक)

uttar pradesh assembly election : आकारमानाच्या द़ृष्टीने देशातील सर्वांत मोठे राज्य असणार्‍या उत्तर प्रदेशात सध्या विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी रंगू लागली आहे. काँग्रेस पक्षाने या निवडणुकांसाठी प्रियांका गांधी यांचा चेहरा पुढे केला आहे. त्यामुळे ही निवडणूक अधिक लक्षवेधी ठरणार आहे. प्रियांका गांधी यांना समजून घेण्यासाठी आपल्याला इंदिरा गांधी यांचे राजकारण समजून घ्यावे लागेल. इंदिरा गांधी यांनी हळूहळू काँगे्रस पक्षावर आपली पकड मजबूत केली होती. यासाठी त्यांना बराच काळ लागला होता. त्या 1959 मध्ये जवाहरलाल नेहरू यांच्या छत्राखाली काँगे्रस पक्षाच्या अध्यक्षा बनल्या आणि जवळपास एक वर्ष त्यांनी हा कार्यभार सांभाळला होता.

लालबहादूर शास्त्री पंतप्रधान बनल्यानंतर इंदिरा गांधी माहिती-प्रसारण खात्याच्या मंत्री बनल्या होत्या. त्यांच्यात आणि शास्त्रीजींमध्ये सुप्त संघर्षही पाहायला मिळाला. त्यानंतर 1971 मध्ये बांगला देशाचे मिशन पूर्ण झाल्यानंतर इंदिराजींचे पक्षातील वजन कमालीचे वाढले. या संपूर्ण काळात त्यांना अनेक आव्हानांचा आणि संघर्षाचा सामना करावा लागला. तशाच प्रकारे प्रियांका गांधी यादेखील संघर्ष आणि आव्हानांपासून फारकत न घेण्याच्या किंवा पाठ न फिरवण्याच्या भूमिकेत दिसतात. तसे पाहिल्यास इंदिराजींपेक्षाही विषम परिस्थिती आज प्रियांका यांच्यासमोर आहे. कारण देशातील राजकीय अवकाशात काँग्रेस पक्षाची छटा कमालीची फिकट झाली आहे. अशा परिस्थितीत प्रियांका यांनी काँग्रेसला सावरण्यासाठीचा जणू विडा उचलला आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार काँग्रेस पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी त्यांना उत्तर प्रदेश सोडून पंजाब आणि उत्तराखंड या राज्यांच्या प्रभारी बनण्याचा प्रस्ताव मांडला होता. जेणेकरून फेब्रुवारी 2022 मध्ये उत्तर प्रदेशच्या बरोबरीने विधानसभेच्या निवडणुका होत असलेल्या या राज्यातील विजयाचे श्रेय प्रियांका यांना देता येईल; परंतु प्रियांकांनी तो प्रस्ताव फेटाळून लावला. त्यांचे असे म्हणणे आहे की, काँग्रेस पक्षाला पूर्वीचा सुवर्णकाळ पुन्हा मिळवून द्यायचा असेल तर उत्तर प्रदेश, बिहार आदी राज्यांमध्ये पक्षाचा पाया भक्कम झाला पाहिजे. तामिळनाडू, पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये द्रमुक आणि तृणमूल काँग्रेस हे काँग्रेसचे अघोषित सहकारी पक्ष सत्तेमध्ये आहेत.

अशा परिस्थितीत उत्तर प्रदेशात त्यांनी सुमारे 100 जागांवर आपले लक्ष केंद्रित केले आहे. काँग्रेसचा जनाधार असणार्‍या या जागा असल्या तरी गेल्या काही निवडणुकांमध्ये येथे काँग्रेस दुसर्‍या-तिसर्‍या स्थानावर गेला आहे. आतापासून या मतदारसंघांमध्ये पक्षविस्तारासाठी, पक्षाची भूमिका – विचार लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी, लोकसंपर्क वाढवण्यासाठी प्रयत्न केले तर कदाचित 2022च्या किंवा 2027 च्या निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाची स्थिती निश्चितपणे सुधारलेली असेल, असा त्यांचा कयास आहे. काँग्रेस पक्षातील काहींच्या मते, उत्तर प्रदेशात भारतीय जनता पक्षाला पूर्ण बहुमत मिळणार नाही. तसे झाल्यास काँग्रेसकडे जर 25 जागा जरी असतील तरी आपला पक्ष किंगमेकरच्या भूमिकेत जाऊ शकतो. प्रियांका गांधींना मैदानात उतरवण्यामागे हादेखील एक विचार असल्याचे दिसते.

प्रियांका गांधी या पहिल्यांदाच निवडणुकांच्या मैदानात उतरत नाहीयेत. यापूर्वीही अनेकदा काँग्रेस पक्षाने त्यांचे कार्ड वापरून पाहिले आहे. प्रियांका गांधी यांचे व्यक्तिमत्त्व लोकांना आकर्षक वाटते. त्यांची संवादशैली कार्यकर्त्यांना, तळागाळातील महिलांना, लोकांना भावणारी आहे. प्रियांका नेहमीच आपली भूमिका व्यवहार्य पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न करत असतात. काँग्रेस पक्षातील नेत्या-कार्यकर्त्यांमध्ये किंवा राजकारणाचे अनेक उन्हाळे-पावसाळे पाहिलेला एक गट असा आहे, जो राहुल गांधींपेक्षा प्रियांका गांधींना अधिक पसंती दर्शवतो. याचा अर्थ राहुल यांच्याविषयी त्यांच्यात नकारात्मक भावना आहेत असे नाही; परंतु प्रश्नांची हाताळणी करण्यात प्रियांका यांच्याकडे जो व्यवहार्यपणा आहे, तो पक्षातील अनेकांना महत्त्वाचा वाटतो.

पंजाबमध्ये प्रियांकांनी ज्या पद्धतीने नवज्योतसिंग सिद्धू यांना ताकद दिली आणि कॅप्टन अमरजित सिंग यांच्याशी जोडी जमवून दिली ती बाब अनेकांना आश्चर्यचकित करून गेली. राजस्थानमध्ये अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्यामध्ये जो सुप्त संघर्ष सुरू आहे तो शमवण्यासाठीही प्रियांका जोमाने आणि कसून प्रयत्न करत आहेत. छत्तीसगडमधील राजकारणातही त्यांची भूमिका मोठी राहिली आहे.

असे असले तरी प्रियांका गांधी यांच्या काही मर्यादाही आहेत. सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे त्या पूर्ण वेळ किंवा 24 X 7 राजकारणी नाहीत. त्यांच्यावर कौटुंबिक जबाबदार्‍या आहेत. तसेच काँग्रेस पक्षातील अंतर्गत संघर्ष निवळण्यासाठीची भूमिकाही त्यांना पार पाडावी लागते. आजवर ही भूमिका अहमद पटेल बजावत होते. काँग्रेसच्या कोणत्याही संकटाच्या काळात अलीकडे प्रियांका या क्रायसिस मॅनेजर म्हणून पुढे येताना दिसतात. राहुल गांधी यांच्यात काही अंशी व्यवहार्यपणाची कमतरता आहे. बरेचदा ते हटवादी किंवा साधकबाधक विचार न करता निर्णय घेतात. काँग्रेसजनांच्या अपेक्षांनुरूप त्यांची कार्यशैली नाही असे म्हटले जाते.

काँग्रेसने उत्तर प्रदेशात प्रियांकांचा चेहरा पुढे केल्यास भारतीय जनता पक्षाची रणनीती काय असेल हे पाहणेही रंजक ठरेल. कारण भाजपच्या भात्यात प्रियांकांचा रथ रोखण्यासाठी रॉबर्ट वधेरांच्या मुद्द्यासारखे काही मुद्दे जरूर आहेत. तथापि, प्रियांका यांनी सुरुवातीपासूनच वधेरांच्या विषयावर बोलण्याबाबत भीड ठेवलेली नाही. त्या आपली भूमिका ठामपणे मांडताना दिसतात. न्यायालयामध्ये वधेरा यांच्या प्रकरणाची सुनावणी असते तेव्हाही त्या सोबत जाताना दिसतात. मुळात भारतीय राजकारणाचा विचार करता वधेरांवरील भ्रष्टाचाराच्या आरोपांचा मुद्दा प्रियांका गांधींसाठी अडसर ठरेल असे वाटत नाही. तसेच वधेरांवर लावण्यात आलेले आरोप अद्याप सिद्ध झालेले नाहीत.

त्यामुळे प्रियांका गांधी या उत्तर प्रदेशात योगी सरकारपुढे आव्हान उभे करू शकतील असे दिसते. कारण त्यांचे व्यक्तिमत्त्व सर्वव्यापी आहे. आज उत्तर प्रदेशात मुसलमान, ब्राह्मण आणि दलित मतदारांचा मायावतींकडून मुखभंग झाला आहे. मायावती अघोषित रूपाने किंवा कोणत्या तरी दबावामुळे भारतीय जनता पक्षाला मदत करत आहेत, ही लोकधारणा द़ृढ बनत चालली आहे. मुस्लिम समुदायाचा विचार करता अखिलेश यादव हे भाजपचा पराभव करण्यास समर्थ आहेत, असे वाटले तरच पश्चिम आणि मध्य उत्तर प्रदेशात त्यांच्या पारड्यात मते टाकतील, पण अखिलेश यांच्या पक्षाला फारसे यश मिळाले नाही तर सलमान खुर्शिद यांनी म्हटल्यानुसार प्रियांका गांधी या मुख्यमंत्रिपदाच्या दावेदार म्हणून पुढे येऊ शकतात. कदाचित यामध्ये त्यांना यश मिळणार नाही; पण 400 जागांपैकी 100 जागांवर काँग्रेस गांभीर्याने लढली आणि त्यातील 30-35 टक्के जागांवर जरी यश मिळाले तरी राजकारणाची दिशा वेगळी होऊ शकते. आज उत्तर प्रदेश विधानसभेत काँग्रेसकडे अवघ्या 7 जागा आहेत.

वस्तुतः लोकसभा किंवा विधानसभांच्या निवडणुकांमध्ये एखादा चेहरा पुढे आणून त्याची प्रतिमा ठसवून निवडणुका लढण्याचा प्रघात भारतीय जनता पक्षाने नव्याने पुढे आणला. काँग्रेस पक्षात या प्रकारच्या राजकारणाबाबत एकमत नाहीये. आजही जुन्या किंवा पारंपरिक पद्धतीनेच निवडणुका लढण्याच्या मानसिकतेतच काँग्रेस आहे; पण प्रियांका गांधींबाबत पक्षाची भूमिका वेगळी आहे. प्रियांकांचा चेहरा पुढे केल्यास कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह दाटून येईल, पक्षाला आलेली मरगळ दूर होईल अशी काँग्रेसजनांची धारणा आहे.

2007, 2012 आणि 2017 च्या विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसकडून राहुल गांधी यांना उत्तर प्रदेशच्या राजकारणात सक्रिय करण्याचे प्रयत्न झाले; परंतु राहुल यांनी नेहमी यापासून पळ काढला. याचा परिणाम म्हणजे त्यांना अमेठीची लोकसभेची हक्काची जागही वाचवता आली नाही. राहुल आणि प्रियांका हे बहीण-भाऊ असले तरी त्या दोघांचे राजकीय विचार, कार्यशैली, कार्यपद्धती यामध्ये बराच फरक आहे. प्रियांका गांधी या राहुल यांच्यापेक्षा सरस असल्यामुळेच काँग्रेसने त्यांच्या रूपाने शेवटचा डाव खेळला आहे, असे म्हणता येईल.

Back to top button