सांगली : काँग्रेस-राष्ट्रवादीला बळ; भाजपमध्ये संशयकल्लोळ | पुढारी

सांगली : काँग्रेस-राष्ट्रवादीला बळ; भाजपमध्ये संशयकल्लोळ

सांगली : उध्दव पाटील

विधानसभा निवडणुकीनंतर जिल्ह्याचे राजकारण कुस बदलण्याचे संकेत मिळत आहेत. जिल्ह्यावरील भाजपची पकड ढिली झाली आहे. पराभवामुळे बॅकफूटवर गेलेल्या भाजपमध्ये आता गटांतर्गत राजकारणाचा ‘संशयकल्लोळ’ पसरला आहे. विधानसभा निवडणुकीतील यशाने ‘काँग्रेस-राष्ट्रवादी’ ला  बळ मिळाले आहे. काठावर बहुमत असलेल्या जिल्हा परिषदेत आता पदाधिकारी निवडणुकीत भाजपची कसोटी लागणार आहे. जिल्हा बँक आणि सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत गटांतर्गत पॅनलची मागचा प्रयोग दुुरुस्त होईल, असे स्पष्ट संकेत मिळत आहेत. 

विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर भाजपमधील लाथाळ्या चव्हाट्यावर येऊ लागल्या आहेत. जत, ‘तासगाव-कवठेमहांकाळ’ मध्ये खासदार संजय पाटील यांनी भाजप उमेदवारांचा विश्‍वासघात केल्याचा आरोप भाजपचे जतचे पराभूत उमेदवार माजी आमदार विलासराव जगताप यांनी केला आहे. सांगली, मिरजेत त्यांचा कुटील डाव सफल होऊ शकला नसल्याचा संशयाचा फटाकाही जगताप यांनी उडवून दिला आहे. तासगाव-कवठेमहांकाळ  विधानसभा मतदारसंघातील मोठ्या पराभवामुळे अजितराव घोरपडे समर्थकांमध्येही खासदार पाटील यांच्याविषयी नाराजीची खदखद आहे. या  पार्श्‍वभूमीवर आगामी निवडणुकांना भाजप एकसंघपणे कसा सामोरे जाणार याविषयी शंका उपस्थित होत आहेत. 

जिल्हा परिषद, पंचायत समिती पदाधिकार्‍यांच्या अडीच वर्षाच्या पहिल्या टर्मची मुदत अनुक्रमे दि. 20 सप्टेंबर व दि. 13 सप्टेंबर 2019 मध्ये संपलेली आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर राज्य मंत्रीमंडळाने जिल्हा परिषद, पंचायत समिती पदाधिकारी निवडणुका चार महिने लांबणीवर टाकल्या. या निवडणुका आता डिसेंबरमध्ये होण्याचे संकेत आहेत. जिल्हा परिषदेत भाजपकडे काठावर बहुमत आहे. जिल्हा परिषदेतील पदाधिकारी निवडणुकीत अजितराव घोरपडे गट व सम्राट महाडिक गट यांची भूमिका महत्वपूर्ण राहणार आहे. त्याअर्थाने जिल्हा परिषद पदाधिकारी निवडणुकीत भाजपची कसोटी लागणार आहे. भाजपमधील गटांतर्गत शह-काटशहाचे राजकारणही पहावयास मिळेल, असेही दिसत आहे. 

जिल्ह्याच्या राजकारण, अर्थकारणात जिल्हा सहकारी बँकेची सत्ता महत्वपूर्ण म्हटली जाते. बँकेच्या गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील, भाजपचे खासदार संजय पाटील व काँग्रेस नेते मदन पाटील एकत्र आले होते. त्यांनी काँग्रेस नेते डॉ. पतंगराव कदम, मोहनराव कदम व वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील यांच्या पॅनलचा पराभव केला होता. बाजार समिती निवडणुकीतही जयंत पाटील, संजय पाटील, मदन पाटील एकत्र आले होते. मात्र  डॉ. पतंगराव कदम, विशाल पाटील, अजितराव घोरपडे गटाने बाजी मारली. जिल्हा बँकेची निवडणूक एप्रिल-मे 2020 मध्ये, तर बाजार समितीची निवडणूक ऑगस्ट 2020 मध्ये होईल. भाजपचा प्रभाव रोखण्यासाठी जिल्हा बँक आणि सांगली बाजार समितीत आता मागचा प्रयोग दुरूस्त होईल.

काँग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडी विरुद्ध भाजप-शिवसेना महायुती असा सामना रंगेल, असे दिसत आहे.  जिल्हा काँग्रेस-राष्ट्रवादीचा बालेकिल्ला होता. लोकसभेच्या दोन निवडणुका आणि विधानसभेच्या सन 2014 च्या निवडणुकीत हा बालेकिल्ला पडला. जिल्हा परिषद, सांगली महानगरपालिकेवरही भाजपचा झेंडा फडकला. दहापैकी सहा पंचायत समितीवर भाजप-सेनेची सत्ता आली. नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीतही यश मिळाले. भाजपच्या यशाचा ‘अश्‍वमेध’ विधानसभेच्या सन 2019 च्या निवडणुकीने रोखला आहे. भाजपने दोन जागा गमावल्या, तर महाआघाडीने दोन जागा अधिक मिळविल्या आहेत. महाआघाडीला 47.39 टक्के, तर महायुतीला 34.17 टक्के मते मिळाली आहेत. जिल्ह्याचे राजकारण कुस बदलत असल्याची चर्चा सुरू आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांमध्ये त्याचे प्रतिबिंब उमटेल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. 

शिराळा: काँग्रेस-भाजप बेरीज झाल्यास अपात्रतेचा बडगा !

शिराळा पंचायत समितीत राष्ट्रवादी 4, काँग्रेस 3 व भाजप 1 असे संख्याबळ आहे. सभापती, उपसभापतीपदासाठी देशमुख गटाचे 3 व शिवाजीराव नाईक गटाचे 1 अशी बेरीज करून चिठ्ठीवर नशीब आजमावण्याचा प्रयत्न झाल्यास जिल्हा काँग्रेस, प्रदेश काँग्रेसकडून पक्षनिरीक्षकद्वारे व्हीप लागू होऊन अपात्रतेचा बडगा उगारला जाऊ शकतो. 

जत : भाजपची सत्ता तिसर्‍या आघाडीवर अवलंबून

जत पंचायत समितीत भाजपचे 9, काँग्रेसचे 7, ‘जनसुराज्य’चे 1 व वसंतदादा आघाडीचे 1 सदस्य आहेत. विधानसभा निवडणुकीत स्थापन झालेल्या तिसर्‍या आघाडीत पंचायत समितीचे 3 सदस्य (भाजप- 1, जनसुराज्य- 1, वसंतदादा आघाडी- 1) आहेत. सभापती, उपसभापती निवडणुकीत तिसर्‍या आघाडीची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

कवठेमहांकाळ पंचायत भाजपचे सत्तास्वप्न भंगले!

कवठेमहांकाळ पंचायत समितीत राष्ट्रवादीचे 4, अजितराव घोरपडे गटाचे 3 व खासदार संजय पाटील गटाचे 1 सदस्य आहेत.  भाजपमधील घोरपडे गट आणि खासदार गट एकत्र येण्याची चिन्हे आता दिसत नाहीत. त्यामुळे आता पंचायत समितीत भाजपचे सत्तास्वप्नही भंगले आहे. 

जिल्हा परिषद, पंचायत समिती दुसरी टर्म डिसेंबरमध्ये

जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा कार्यकाल दि. 20 सप्टेंबर 2019 रोजी, तर पंचायत समिती सभापतींचा कार्यकाल दि. 13 सप्टेंबर 2019 रोजी संपलेला  आहे. राज्य मंत्रिमंडळाने जिल्हा परिषद, पंचायत समित्यांमधील पदाधिकार्‍यांच्या निवडणुका चार महिने लांबणीवर टाकल्या आहेत. या निवडणुका आता डिसेंबरमध्ये होतील. त्यापूर्वी जिल्हा परिषद अध्यक्ष व पंचायत समिती सभापतीपदांसाठी आरक्षण सोडत निघणार आहे. आरक्षण सोडतीकडे राजकीय वर्तुळाचे व इच्छुकांचे लक्ष लागले आहे. सांगली जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी ओबीसी  व अनुसूचित जाती सदस्यांच्या आशा पल्लवित झालेल्या आहेत. विधानसभा निवडणुकीतील निकालानंतर भाजपमध्ये ‘संशयकल्लोळ’ पसरला आहे. त्यामुळे जिल्हा परिषद पदाधिकारी निवडणुकीत भाजपची कसोटी लागणार आहे. 

Back to top button