…अन्यथा स्वस्थ बसू देणार नाही; चंद्रकांत पाटलांचा नव्या सरकारला इशारा | पुढारी

...अन्यथा स्वस्थ बसू देणार नाही; चंद्रकांत पाटलांचा नव्या सरकारला इशारा

मुंबई : पुढारी ऑनलाईन

शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील ठाकरे सरकारची आज, शनिवारी विधानसभेत शक्तिपरीक्षा होणार आहे. यावेळी ठाकरे सरकारला विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जावे लागणार आहे. या ठरावापूर्वीच नव्या सरकारवर भाजपकडून टीकास्त्र सोडण्यात आले आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नव्या सरकारने सगळे नियम धाब्यावर बसवले असल्याचा आरोप करत नव्या सरकारवर हल्लाबोल चढवला. 

माध्यमांशी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी नव्या सरकारचा शपथविधी बेकायदेशीर असल्याचा आरोप केला. प्रोटोकॉलनुसारच शपथविधी घ्यावा लागतो, असेही त्यांनी स्पष्ट केले. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनीदेखील त्यांना अनेकदा टोकले. शपथविधीचीही एक पद्धत असते. त्यानुसारच शपथ घ्यावी लागते. परंतु नव्या सरकारकडून ठरलेल्या पद्धतीनुसार शपथ घेण्यात आली नाही. प्रोटोकॉलनुसार शपथविधी झाला नसल्याचे सांगत शपथविधी रद्द करण्यासाठी राज्यपालांकडे एका आमदाराने याचिका दाखल केली असल्याची माहितीही पाटील यांनी यावेळी दिली. तसेच, त्यावर योग्य ती कारवाई करण्याची मागणीही केली. राज्यपालांनी यावर योग्य ती कारवाई न केल्यास सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठाेठवण्याची शक्यताही पाटील यांनी वर्तवली आहे. 

विश्वासदर्शक ठरावावर आणि विधानसभा अध्यक्ष निवडीसंदर्भात बोलताना पाटील म्हणाले, प्रथा परंपरेप्रमाणे आधी विधानसभा अध्यक्ष ठरतो. पंरतु विधानसभेच्या अध्यक्षाची निवड उद्या होत आहे. नव्या सरकारने सगळे नियम धाब्यावर बसवले आहेत. विधानसभेच्या अध्यक्षासाठी गुप्त मतदान घ्या, अशी मागणीदेखील त्यांनी यावेळी केली. 

सरकारला नियमबाह्य कामकाज करून देणार नसल्याचे सांगत नियमाप्रमाणे काम करा अन्यथा स्वथ बसून देणार नाही, असा इशाराही पाटील यांनी नव्या सरकारला दिला.

तसेच, आमदारांवरूनही पाटील यांनी महाविकास आघाडीवर टीकास्त्र सोडले. आमदारांना कोंडून ठेवून सरकार चालवलं जातंय. आमदारांना कुटुंबाशी संपर्क का करून दिला जात नाही? आमदारांना अद्याप कोंडून का ठेवलंय, असा सवाल करत मारून मुटकून सरकार चालवल जातंय, असा आरोपही त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर केला. 

विधानसभाध्यक्षासाठी भाजप निवडणूक लढणार असल्याचे सांगत भाजपकडून किसन कथोरे यांना उमेदवारी देण्यात आली असल्याची माहिती पाटील यांनी दिली.

Back to top button