

उत्तर प्रदेशमध्ये अखिलेश यादव यांना मुख्यमंत्री करण्याऐवजी तुम्हीच मुख्यमंत्री व्हा, तुम्हाला राष्ट्रीय राजकारणत मोठे पद मिळेल, असा सल्ला मुलायमसिंग यादव यांचे भाऊ शिवपाल (Akhilesh- Shivpal Yadav) यांनी दिला मात्र, त्यांनी तो ऐकला नाही. अखिलेश मुख्यमंत्री झाले आणि काकाने आपल्याविरोधात दिलेला सल्ला त्यांच्या काळजात बोचत राहिला. पुढे शिवपाल यांना पक्षाबाहेर काढण्यासाठी सगळी षड्यंत्रे झाली. समाजावादी पक्षात फूट पडली, याचा फटका त्यांना २०१४ च्या लोकसभा आणि २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत बसला. पक्षांची वाताहात झाली. समाजवादी पक्षाच्या स्थापनेपासूनची ती मोठी वाताहात होती.
२०१२ च्या विधानसभा निवडणुकीत मायावती यांच्या गडाला हादरे देत समाजवादी पक्ष सत्तेत आला. धरतीपुत्र म्हणून उत्तर प्रदेशात ओळख असलेले मुलायमसिंग मुख्यमंत्री होतील असे वाटत असताना अचानक एक गट आक्रमक झाला आणि अखिलेश भैय्या सीएम म्हणत दबाव आणू लागला. मात्र, त्यावेळी मुलायम यांचे भाऊ शिवपाल यांनी त्यांच्याऐवजी मुलायम यांनी सीएम व्हावे, पुढे फायदा होईल, असा सल्ला दिला. मात्र, दबाव वाढत गेला आणि अखिलेश मुख्यमंत्री झाले. आपल्याविरोधात वडिलांना सल्ला दिला हे मनात ठेवून पुढील काळात संघर्ष केला. हा संघर्ष हातघाईवर आला. काका आणि पुतण्याचा संघर्ष शिगेला पोहोचला. मुलायम सिंग यांनी मध्यस्थी करून पाहिली मात्र, पुढे काहीच झाले नाही. अखेर शिवपाल यांना पक्ष सोडावा लागला. मात्र, २०१७ च्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर उत्तर प्रदेशातील सत्ताधारी समाजवादी पक्षात सुरू असलेली ही सुंदोपसुंदी भाजप मिश्किलपणे पाहत होता. अगदी हातघाईवर आलेले हे पक्षातील भांडत तसे बघायला गेले तर घरातील भांडण होते. काका आणि पुतण्याच्या या वादाला अनेक पदर होते.
मुलायमसिंग वार्धक्याकडे झुकले असले तरी त्यांची पक्षावर पकड होती. २०१२च्या निवडणुकीत सायकल या चिन्हाला उत्तर प्रदेशात सर्वाधिक मते मिळाली आणि सपा सत्तेत आला. सपाचे सर्वेसर्वा मुलायमसिंग सांगतील तीच पूर्वदिशा होती. त्यावेळी मुलायमसिंग हेच मुख्यमंत्री होतील असे सर्व अंदाज होते. मुख्यमंत्रिपदाबाबत मुलायमसिंग आणि भाऊ शिवपाल यांच्यात चर्चा झाली. त्यावेळी शिवपाल यांनी मुलायम यांना सल्ला दिला की, 'यावेळी मुख्यमंत्री तुम्हीच व्हा. पुढील काळात आपल्याला पक्ष मजबूत करता येईल आणि २०१४ नंतर सूत्रे अखिलेश यांच्याकडे द्या. तुम्ही राष्ट्रीय राजकारणात जा.' मात्र, झाले उलटेच मुलायमसिंग अखिलेश यादव आणि त्यांच्या समर्थकांच्या दबावाला बळी पडले. त्यांनी आपली खूर्ची अखिलेश यांच्याकडे दिली. त्यानंतर २०१४ च्या लोकसभा निवडणुका अखिलेश यादव यांच्या नेतृत्वाखाली लढल्या गेल्या. मात्र, जो पक्ष दोन आकड्यांच्या खाली कधी आला नाही त्या पक्षाची प्रचंड वाताहात झाली. केवळ पाच जागांवर पक्षाला समाधान मानावे लागले. त्या पाच जागा त्यांच्या कुटुंबातील होत्या. यावर मुलायमसिंग प्रचंड संतापले.
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीचा निकाल मुलायमसिंग यांच्या जिव्हारी लागला होता. जेव्हा शिवपाल यांना सपाचे प्रदेशाध्यक्ष केले तेव्हा अखिलेश यादव यांच्या समर्थकांनी प्रचंड गदारोळ घातला. शिवपाल यांना घेरून मारहाण करण्याचा प्रयत्न केला. मंत्रिमंडळात त्यांचा समावेश असतानाही त्यांच्याकडील खाती काढून घेतली. यावर मुलायमसिंग संतापले. त्यांनी पक्षातील विविध सेलची बैठक बोलविली. त्यांच्या अध्यक्षांना भाषणे करू दिली. त्या सर्वांनी शिवपाल यांच्याकडून प्रदेशाध्यक्षपद काढून घेऊन अखिलेश यांना द्यावे, अशी मागणी करणारे भाषण केले. त्यानंतर भाषणासाठी उठलेल्या मुलायमसिंग यांनी एकेका अध्यक्षाची धुलाई केली. मी पार्टीचा अध्यक्ष आहे, माझ्या निर्णयाला आव्हान देता काय म्हणत एकेकाचा समाचार घेतला. त्यांनी पक्षाच्या स्थापनेपासून अनेक घटनांचा आढावा घेतला. मुलायम सिंग यांना स्मृतीभ्रंष झाला आहे, त्यांना काहीच आठवत नाही, असा बोभाटा केला होता. मात्र, मुलायम सिंग म्हणाले, तुमच्या अखिलेश यादवचे कृर्तृत्व काय तर पक्ष काढळ्यानंतर २३ खासदार निवडून आले. एकदा ३९, आणखी एकदा २७ निवडून आले. २०१४ मध्ये केवळ ५ तेही कुटुंबातले. ३०-३५ जागा निवडून आल्या असत्या तर मी पंतप्रधान झालो असतो. शिवपाल पक्षासाठी मरता मरता अनेकदा वाचालाय. त्याने पक्षासाठी प्रचंड मेहनत घेतली आहे.
निवडणुकीच्या तोंडावर सपामधील संघर्ष टोकाला गेला होता. शिवपाल यादव प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी मुख्तार अन्सारी या गॅगस्टरची अपना दल ही पार्टी पक्षात विलीन केली. तो निर्णय अखिलेश यांनी फिरवला. त्यानंतर अनेक वाद होत गेले. शिवपाल यांच्या बाजुने कॅबिनेटमधील ३० मंत्री आणि १०० आमदार असल्याचा दावा केला जात होता. जर त्यांची हकालपट्टी केली तर पक्षात उभी फूट पडेल असा इशारा मुलायमसिंग यांनी दिला होता. मुख्तार अन्सारीच्या पक्षाचे विलीनीकरण हाणून पाडल्यानंतर अखिलेश यांनी काकाचे नीकटवर्तीय मंत्री राजकिशोर सिंग आणि गायत्री प्रजापती यांना मंत्रीपदावरून काढून टाकले. तसेच मुख्य सचिव दीपक सिंघल यांनाही हटवले. शिवपाल यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे येताच दोन तासांत शिवपाल यांच्याकडील ९ पैकी सात खाती काढून घेत त्यांना शस्त्रहीन करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर लगेचच त्यांनी कॅबिनेट मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. मात्र सायंकाळी अखिलेश यादव यांनी ट्विट करून शिवपाल सिंग यांची सगळी खाती परत दिली जातील. तसेच गायत्री प्रजापती यांना मंत्री केले जाईल, असे जाहीर केले.
सुंदोपसुंदीत पक्ष हरला
समाजवादी पक्षात सुरू असलेली ही सुंदोपसुंदी भाजपच्या पथ्यावर पडली आणि समाजवादी पक्षाला मोठा फटका बसला. निवडणूक पूर्व चाचण्यांमध्ये समाजवादी पक्षाला १०० जागा मिळतील असे सांगितले जात होते मात्र, पक्षाला अवघ्या ४८ जागा मिळाल्या. शिवपाल यादव आणि अखिलेश यादव यांच्यातील वादाचा हा परिणाम होता.
शिवपाल यांनी काढला नवा पक्ष
२०१७ मध्ये समाजवादी पक्षाने सपाटून मार खाल्यानंतर शिवपाल यांनी सपाला २०१८ मध्ये रामराम करत प्रगतीशील समावादी पार्टी लोहियावादी हा पक्ष काढला. त्यानंतर अखिलेश यादव यांचे पक्षांतर्गत विरोधक संपले.अमरसिंग, गायत्री प्रजापती, शिवपाल यादव असा एक एक विरोधक संपवत अखिलेश यादव समाजवादी पक्षाचे अध्यक्ष बनले. अलिकडे मुलायम सिंग यादव यांनीही अखिलेशच आपले उत्तराधिकारी आहेत, यावर शिक्कामोर्तब केले.
अनोखे बंधूप्रेम
पक्षात फाटाफूट होत असताना स्वत:च्या मुलापेक्षा मुलायमसिंग यांनी आपल्या भावाची बाजू घेतली. भावाबाबत बोलताना ते भावूक होत असत तर अखिलेश यांच्याबाबत बोलताना त्यांनी 'तुम्हाला तयार पक्ष मिळाला आहे. तुम्हाला कधीच संघर्ष करावा लागला नाही. शिवपाल अनेकदा मरता मरता वाचला आहे. त्याचे पक्षासाठी खस्ता खाल्ल्या आहेत.' असे म्हणत त्यानी नेहमी अखिलेश यांचे कान पिळले. मात्र, अखिलेश यांनी कधी मुलायम यांना कुरवाळत, कधी बाजू काढत तर कधी बेदखल करत पक्ष ताब्यात घेतला.
हेही वाचा :