लंडन, नेदरलँडवरून आलेले चार प्रवासी कोरोनाबाधित; ओमायक्रॉनची धास्ती | पुढारी

लंडन, नेदरलँडवरून आलेले चार प्रवासी कोरोनाबाधित; ओमायक्रॉनची धास्ती

नवी दिल्ली, पुढारी ऑनलाईन

सध्या ओमायक्रॉन व्हेरियंटची धास्ती असून ज्या देशांतून विमानसेवा सुरू आहे, त्यापैकी लंडन आणि नेदरलँडमधील ॲमस्टरडॅम येथून आलेल्यापैकी चार प्रवासी कोरोनाबाधित झाला असून त्यामुळे खळबळ उडाली आहे. या रुग्णांना ओमायक्रॉ व्हेरियंटची लागण झाली आहे का? याची तपासणी सुरू असून त्यांना दिल्लीतील जयप्रकाश नारायण रुग्णालयात दाखल केले आहे.

या चार प्रवाशांमुळे त्यांच्या सहप्रवाशांनाही भीती असून त्यांचीही चाचणी करण्यात येत आहे. ओमायक्रॉनचा धोका पाहता चौघांचे नमुने जीनोम सीक्वेन्सिंग पाठविले आहे. या नमुन्यांचा अहवाल तीन दिवसांनी येणार आहे. त्यानंतर त्यांना ओमायक्रॉन लागण झाली आहे अथवा नाही याची माहिती मिळणार आहे.

सध्या एअर बबल अंतर्गत काही ठराविक देशांमध्ये आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू आहे. यापैकी नेदरलँड आणि ब्रिटनमधील विमानसेवेचा समावेश होतो. त्यामुळे या मार्गांवर विशेष लक्ष ठेवले जात आहे. ज्या ११ देशांत ओमिक्रॉन व्हेरियंटचा फैलाव झाला आहे, त्यात ब्रिटन आणि नेदरलँडचा समावेश आहे.

मंगळवारी रात्री अ‍ॅमस्टरडॅम आणि लंडन येथून एकूण चार विमाने दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर आली. त्यातून एकूण १ हजार १३ प्रवासी भारतात दाखल झाले. या सर्वांची RT-PCR चाचणी करण्यात आली. त्यापैकी चारजण कोरोनाबाधित आढळले. हे चारही प्रवासी भारतीय आहेत.

पहिल्याच दिवशी चार रुग्ण

दरम्यान, ओमायक्रॉन व्हेरिएंटचा ११ हून अधिक देशांत शिरकाव झाला आहे. या व्हेरिएंटची लागण झालेल्या रुग्णांची संख्या वाढत आहे. दक्षिण आफ्रिका, ब्राझील, बोत्स्वाना, चीन, मॉरिशस, न्यूझीलंड, झिम्बाब्वे, सिंगापूर, हाँगकाँग, इस्रायल तसेच युरोपमधील ब्रिटन व अन्य काही देशांत व्हेरियंट पसरला आहे. या देशांतून भारतात येणाऱ्या प्रवाशांसाठी RT-PCR चाचणी सक्तीची केली आहे. मंगळवारी मध्यरात्रीपासूनच चाचणी सक्तीची केली. त्यानंतर पहिल्याच दिवशी चार रुग्ण सापडले आहेत.

हेही वाचा : 

Back to top button