भाजप आमदार महेश लांडगेंसह ६० जणांवर गुन्हा  | पुढारी

भाजप आमदार महेश लांडगेंसह ६० जणांवर गुन्हा 

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा

कोरोना नियमांचे उल्लंघन करीत मुलीच्या मांडव डहाळा कार्यक्रमात नाचणाऱ्या भाजपचे आमदार महेश लांडगे यांच्यासह अन्य ६० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भोसरी पोलिसांनी सोमवारी (दि. ३१) ही कारवाई केली.

आमदार महेश किसनराव लांडगे, सचिन किसनराव लांडगे, अजित सस्ते, कुंदन गायकवाड, राहुल लांडगे, दत्ता गव्हाणे, गोपी कृष्ण धावडे, सुनील लांडे, नितीन गोडसे, प्रज्योत फुगे (सर्व रा. भोसरी) यांच्यासह इतर सुमारे ५० जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस कर्मचारी सुरेश नानासो वाघमोडे (वय ३२) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे यांच्या मुलीच्या लग्नाचा मांडव डहाळ्याचा कार्यक्रम भोसरी येथे रविवारी (दि. ३०) सायंकाळी साडेसहा ते रात्री साडेनऊ दरम्यान झाला. त्यावेळी आमदार लांडगे यांच्यासह ५० जण परवानगी नसताना बेकायदेशीररित्या एकत्र आले. त्यांनी फिजिकल डिस्टन्स न पाळता तसेच विनामास्क या कार्यक्रमात नाचगाणे करून वाद्ये वाजवली. कोरोना विषाणूंचा आणखी प्रसार होईल व लोकांच्या जिवितास धोका होईल, असे कृत्य केले. तसेच, जाणीवपूर्वक जमाव करून शासनाच्या व प्रशासनाच्या आदेशाकडे दुर्लक्ष करून नियमांचे उल्लंघन केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. 

Back to top button