बेळगाव : आझाद गल्लीत पाच लाखांची घरफोडी; दिवसाढवळ्या घटनेने खळबळ | पुढारी

बेळगाव : आझाद गल्लीत पाच लाखांची घरफोडी; दिवसाढवळ्या घटनेने खळबळ

बेळगाव : पुढारी वृत्तसेवा : आझाद गल्ली येथे भरदिवसा पाच लाखांची घरफोडी झाल्याची घटना बुधवारी दुपारी तीनच्या सुमारास उघडकीस आली. चोरट्यांनी सोन्याचे पाच तोळे दागिने, चांदीच्या काही वस्तू व २ लाखांची रोकड लांबवली आहे.

शहरातील आझाद गल्ली येथील अपार्टमेंटमधील दुसऱ्या मजल्यावर हरचंद प्रजापती हे व्यापारी राहतात. बुधवारी ते दुकानावर गेले, तर त्यांच्या पत्नी बाराच्या सुमारास बाजारहाटसाठी बाहेर पडल्या. त्या जेव्हा परत आल्या, तेव्हा त्यांच्या फ्लॅटच्या मुख्य दरवाजाचा कडी-कोयंडा तोडल्याचे दिसून आले. त्यांनी आत जाऊन पाहिले असता कपाट फोडून चोरट्यांनी त्यातील सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम पळवून नेली.

त्यांनी ही माहिती त्यांच्या पतीला कळवली. पती हरचंद हे तातडीने घरी आले. त्यांनी घरातील सर्व किंमती वस्तू चोरीला गेल्याचे पाहून ही माहिती मार्केट पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. परंतु, रात्री उशिरापर्यंत चोरटे हाती लागले नव्हते.

चार दिवसांत तीन घरफोड्या

रविवारी चोरट्यांनी पिरनवाडी व मच्छे भागात धुमाकूळ घालत दोन ठिकाणी घरफोडी केली होती. पिरनवाडी येथून साडेतीन लाखांचा तर मच्छे येथून पाच लाखांचा मुद्देमाल लुटला आहे. या घटना ताज्या असतानाच चोरट्यांनी आझाद गल्लीतील घर दिवसा फोडले आहे. त्यामुळे पोलिसांच्या कर्तबगारीवर प्रश्न निर्माण झाले आहे.

कामचुकार कान्स्टेबल

मार्केट पोलिस ठाण्यात शिवाप्पा तेली नामक कॉन्स्टेबल कार्यरत असून तो कामचुकारपणा करत असल्याच्या तक्रारी आहेत. आपल्याच धुंदीत राहणाऱ्या अशा कॉन्स्टेबलची पोलिस आयुक्तांनी मार्केटसारख्या संवेदनशील ठाण्यातून बदली करण्याची गरज व्यक्त होत आहे.

Back to top button