बेळगाव : ‘सीमा भाग महाराष्ट्रात जाईपर्यंत मुलाचा वाढदिवस साजरा करणार नाही’ | पुढारी

बेळगाव : 'सीमा भाग महाराष्ट्रात जाईपर्यंत मुलाचा वाढदिवस साजरा करणार नाही'

बेळगाव ; पुढारी वृत्तसेवा : बेळगाव शहरासह संपूर्ण सीमाभागात काळा दिन गांभीर्याने पाळण्यात येतो. 1956 साली भाषावार प्रांतरचना करण्यात आली व मराठी बहुभाषिक असलेला सीमाभाग तत्कालीन म्हैसूर राज्यात डांबण्यात आला. मराठी भाषिकांवर झालेल्या अन्यायाच्या निषेधार्थ मराठी भाषिकांकडून 1 नोव्हेंबर हा ‘काळा दिन’ सुतक दिन म्हणून पाळण्यात येतो. योगायोगाने या दिवशीच मनोहर हुंदरे यांना पुत्ररत्‍न प्राप्त झाले. आदेश हुंदरे या मुलाचा जन्म १ नोव्हेंबर या दिवशी झाला, मात्र मनोहर हुंदरे यांनी एक पण केला, जोपर्यंत सीमा भाग महाराष्ट्रात सामील होत नाही, तोपर्यंत मी मुलाचा वाढदिवस साजरा करणार नाही. त्यामुळे काल बेळगावात काळा दिन आणि राजोत्सव साजरा झाला तरी, आदेशचा वाढदिवस साजरा झाला नाही. आदेशचे पालक महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे खजिनदार आहेत.

एक नोव्हेंबर 1956 पासून मराठी भाषिक भाग अन्यायाने कर्नाटकात डांबला गेला. तेव्हापासून सीमा भाग महाराष्ट्रात सामील व्हावा यासाठी वेगवेगळी आंदोलने करण्यात आली. त्यामध्ये खानापूर तालुक्यातील दोघांनी सीमा प्रश्न सुटेपर्यंत अंगावरती शर्ट घालणार नाही, अशी प्रतिज्ञा केली ती शेवटपर्यंत निभावली. काहींनी पायामध्ये चप्पल न घालण्याचा निर्धार केला आहे. काही सीमा तपस्विंनी दाढी न करण्याचा निर्णय देखील घेतला आहे. रस्त्यावरील लढायांसोबतच सीमा प्रश्नासाठी न्यायालयीन लढाई देखील सुरू आहे. असे असताना अलीकडे दहा वर्षे बेळगावातील मनोहर हुंदरे या पालकाने आपल्या मुलाचा वाढदिवस एक नोव्हेंबर या दिवशी आल्याने बेळगाव सीमा भाग जोपर्यंत महाराष्ट्रात सामील होत नाही तोपर्यंत मुलाचा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे.

सीमा भागाचा लढा हा त्यागाचा आणि अस्मितेचा आहे. तो उभा आहे हुतात्म्यांच्या सांडलेल्या रक्तावर. अजुनही तळमळीने लढा देऊन सर्वस्व त्याग करायची भावना मराठी भाषिकांमध्ये आहे. त्‍यामुळे 66 वर्षे झाली तरी एक नोव्हेंबर हा दिवस सीमा बांधवांकडून काळा दिन सुतक दिन म्हणून पाळण्यात येतो.

महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे खजिनदार मनोहर हुंदरे, यांच्या मुलाचा व त्यांचा जन्मदिवसही 1 नोव्हेंबरच आहे. सीमाभागात हा दिवस काळा दिवस (सुतक दिन) म्हणून पाळला जातो. त्‍यामुळे चिरंजीव आदेशच्या वाढदिवसा सोबतच मनोहर हुंदरे यांनीही 2010 पासून आजतागायत या चिमुकल्याचा वाढदिवस कधीच साजरा केला नाही.

अगदी छोटा असताना आदेशही वाढदिवसासाठी हट्ट करायचा, पण आता त्यालाही सीमाप्रश्न समजू लागल्‍याने त्याने हट्ट करणे थांबवलं आहे. सीमा प्रश्नासाठी चौथी पिढी सीमा भागात सक्रिय झाली आहे. त्याचे एक ज्वलंत उदाहरण म्हणून याकडे पाहता येईल. न्यायालयीन लढ्याचा निकाल सीमा बांधवांच्या बाजूने लागावा आणि आदेशाचा वाढदिवस महाराष्ट्रात साजरा व्हावा. अशा शुभेच्छा सोशल मीडियाच्या माध्यमातून देण्यात आल्या.

हेही वाचा :  

Back to top button