बेळगाव : हालभावी हुंडाबळी, पतीसह तिघांना अटक | पुढारी

बेळगाव : हालभावी हुंडाबळी, पतीसह तिघांना अटक

बेळगाव ः पुढारी वृत्तसेवा हालभावी (ता. बेळगाव) येथील नवविवाहितेचा हुंड्यासाठी छळ केल्याने तिने जीवन संपवले होते. याप्रकरणी पती, दोघे दीर, जावेसह पाच जणांविरोधात काकती पोलिसांत गुन्हा दाखल झाला होता. यापैकी तिघांना सोमवारी अटक केली. पती भरमाप्पा मुशप्पा नायक (वय 30), दोघे दीर हालाप्पा मुशप्पा नायक (37) व यल्लाप्पा मुशप्पा नायक (तिघेही रा. हालभावी) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.

याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये नातेवाईक सिद्धाप्पा भरमाप्पा नायक व मृत महिलेची जाऊ कमलव्वा हालाप्पा नायक यांचाही समावेश आहे. त्यांना अद्याप अटक केली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. लग्न होऊन पाच महिने झालेल्या श्रीमती रेणुका भरमाप्पा नायक (वय 20, माहेर हुल्यानूर, सासर हालभावी) या महिलेने 11 सप्टेंबर रोजी दुपारी घरी कोणी नसताना ओढणीने गळफास घेऊन जीवन संपवले. माहेरच्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून त्याच दिवशी रात्री या प्रकरणाची काकती पोलिसांत नोंद झाली होती.

आधी दुर्लक्ष नंतर कारवाई

हुल्यानूर ग्रामस्थांनी काकती पोलिस ठाण्यावर मोर्चा काढला होता. यानंतर पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. यातील आणखी दोघे फरारी असून त्यांच्यावर कारवाई कधी करणार, असा प्रश्न ग्रामस्थ विचारत आहेत.

Back to top button