बेळगाव : चिकोडीस पुराचा धोका, कृष्णा, दुधगंगा, वेदगंगा नद्यांच्या पाणी पातळीत वाढ (Video) | पुढारी

बेळगाव : चिकोडीस पुराचा धोका, कृष्णा, दुधगंगा, वेदगंगा नद्यांच्या पाणी पातळीत वाढ (Video)

चिकोडी; काशिनाथ सुळकुडे : महाराष्ट्रात कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे विविध धरणांतून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. महाराष्ट्रतून कल्लोळ-येडूर बंधाऱ्यानजीक चिकोडी तालुक्यास 2 लाखांहून अधिक पाण्याचा विसर्ग कृष्णा नदीला होत आहे. पाण्याचा आवक वाढल्यास चिकोडी उपविभागास पुराचा धोका उद्भवू शकतो. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

गेल्या आठ दिवसांपासून बरसत असलेल्या मुसळधार पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली. महाराष्ट्रातील अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. तसेच धरणांतून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात सुरू असल्याने कर्नाटक राज्यात कृष्णा, दुधगंगा, वेदगंगा नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. गुरूवारी चिकोडी तालुक्यातील कल्लोळ-येडूर बंधाऱ्यानजीक 1 लाख 30 हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू होता. तर आज सकाळी 2 लाख 6 हजार क्युसेक्स इतक्या मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग वाढला आहे. यामुळे कृष्णा, दुधगंगा व वेदगंगा नद्यांचे पाणी पात्राबाहेर पडले असून काठावरील शेतपिकांमध्ये घुसले आहे. या पावसाळ्यातील सर्वाधिक पाणी पातळी असून पुन्हा महाराष्ट्रातून पाणी वाहून आल्यास नदी काठावरील गावांमध्ये पूरस्थिती ओढवू शकते.

चिकोडी उपविभागातील चिकोडी, अथणी, रायबाग, कागवाड, निपाणी तालुक्यातील 11 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. पूरस्थितीचा सामना करण्यासाठी प्रशासन सज्ज असून सर्व उपाययोजना राबविण्यात येत आहेत. नदी काठावरील नागरिकांना नदी काठी न जाण्याचे आवाहन चिकोडी प्रांताधिकारी संतोष कामगौडा यांनी केले आहे.

शिरोळ तालुक्यातील राजापूर बंधाऱ्यातून 1 लाख 74 हजार 500 क्युसेक्स इतक्या पाण्याचा विसर्ग सुरू आहे. दुधगंगा नदीला 32 हजार 32 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग होत आहे. कृष्णा व दुधगंगा, वेदगंगा या नद्यांमधून चिकोडी तालुक्यातील कल्लोळ-येडूर बंधाऱ्यानजीक कृष्णा नदीत 2 लाख 6 हजार 532 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग होत आहे. कृष्णा नदीवरील अंकली-मांजरी पुलानजीक 533.81 मीटर, दुधगंगा व वेदगंगा नदीवरील सदलगा पुलावर 535.93 मीटर, कृष्णा नदीवरील हिप्परगी बंधाऱ्यानजीक 524.87 मीटर इतकी पाणी पातळी आहे. कृष्णा नदीवरील कल्लोळ-येडूर, दुधगंगा नदीवरील मलीकवाड-दत्तवाड, कारदगा-भोज, अकोळ-सिदनाळ, भोजवाडी-कुनूर, जत्राट-भिवशी, ममदापूर-हुन्नरगी, कुनूर-बारवाड, कुडची-उगार, चिंचली-रायबाग, चिंचली-भिरडी बंधारे पाण्याखाली गेले आहेत.

हेही वाचा : 

Back to top button