EVM द्वारे घेतल्या जाणार्‍या मतदानाला आव्हान देणारी याचिका फेटाळली | पुढारी

EVM द्वारे घेतल्या जाणार्‍या मतदानाला आव्हान देणारी याचिका फेटाळली

नवी दिल्ली, पुढारी वृत्‍तसेवा : इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशिन अर्थात ईव्हीएम (EVM) ऐवजी बॅलेट पेपरद्वारे मतदान घेण्याचे निर्देश दिले जावेत, अशा विनंतीची याचिका सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी फेटाळून लावली. अ‍ॅड. एम. एल. शर्मा यांनी याबाबतची याचिका दाखल केली होती. घटनेतील कलम शंभरनुसार बॅलेट पेपरद्वारे निवडणुका घेणे आवश्यक असल्याचा युक्‍तिवाद शर्मा यांनी केला होता. तथापि न्यायमूर्ती एस. के. कौल आणि न्यायमूर्ती एम. एम. सुंदरेश यांच्या खंडपीठाने हा युक्‍तिवाद फेटाळून लावला.

लोकप्रतिनिधीत्व कायद्याच्या कलम 61 ए आपण आव्हान दिलेले आहे. हा कायदा संसदेच्या उभय सदनात मंजूर झालेला नाही, असा तर्क अ‍ॅड. शर्मा यांनी युक्‍तिवादावेळी दिला. यावर आपण कुणाला आव्हान देत आहात, संसदेला की सामान्य पध्दतीने होणार्‍या निवडणुकांना, असा प्रतिप्रश्‍न खंडपीठाने केला. (EVM)

त्यावर आपण कलम 61 ए ला आव्हान देत आहोत. ईव्हीएमच्या वापराला हे कलम परवानगी देत नाही, असा दावा शर्मा यांनी केला. मात्र तुमच्या याचिकेत तथ्य नाही, असे सांगत खंडपीठाने याचिका फेटाळून लावली. शर्मा यांनी याचिकेत कायदा मंत्रालयाला दुसरा पक्षकार बनविले होते.

Back to top button