चिकोडी, निपाणी तालुक्यातील आठ पूल पाण्याखाली | पुढारी

चिकोडी, निपाणी तालुक्यातील आठ पूल पाण्याखाली

चिकोडी; पुढारी वृत्तसेवा : तालुक्यात संततधार पाऊस सुरू आहे. त्याचबरोबर कोयना, कोल्हापूर परिसरात सुरू असणार्‍या संततधार पावसामुळे चिकोडी, निपाणी तालुक्यातील कृष्णा, दूधगंगा व वेदगंगा नदीवरील 8 पूल वजा बंधारे पाण्याखाली गेले आहेत. पिकेही पाण्याखाली गेली आहेत.

मागील दोन दिवसांपासून चिकोडी तालुक्यात मुसळधार पाऊस बरसत आहे. रविवारनंतर सोमवारी देखील पावसाचा जोर कायम होता. पावसाच्या जोरदार सरी हजेरी लावत असल्याने परिणामी नदीतील पाणीपातळीत वाढ झाली आहे.

कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यातील धरण क्षेत्रातदेखील मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे महाराष्ट्रातून कृष्णा, दुधगंगा व वेदगंगा नद्यांना मोठ्या प्रमाणात पाणी येत आहे. सर्वच नद्यांच्या पाणी पातळीत चार फुटांनी वाढ झाली आहे.

कृष्णा नदीला राजापूर बंधार्‍यातून चिकोडी तालुक्यात 41167 क्युसेक्स इतक्या पाण्याचा विसर्ग होत आहे. सदलगा येथील पुलानजीक दुधगंगा नदीतून 16245 क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग होत आहे.

चिकोडी तालुक्यातील येडूर- कल्लोळ, मलिकवाड – दत्तवाड व निपाणी तालुक्यातील कारदगा – भोज, भोजवाडी – कुन्नूर, सिदनाळ- अकोळ, जत्राट – भिवशी, ममदापूर – हुनरगी, कुन्नूर – बारवाड हे आठही पूल वजा बंधारे पाण्याखाली गेले आहेत. पुन्हा नद्यांना पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे चिकोडी तालुक्यातील कल्लोळ, येडूर, चंदूर, इंगळी मांजरीसह इतर गावांमध्ये पुराची भीती निर्माण झाली आहे.

Back to top button