बेळगाव : मराठी फलकावरून कन्नडिगांमध्ये संताप | पुढारी

बेळगाव : मराठी फलकावरून कन्नडिगांमध्ये संताप

बेळगाव : पुढारी वृत्तसेवा : कारवार नगरपालिकेने आपल्या व्याप्तीत येणार्‍या रस्त्यांचे नामकरण करून फलक मराठी व कन्नड भाषेमध्ये लावले आहेत. मराठीतून फलक लिहिल्याने कन्नडिगांना पोटशूळ निर्माण झाला आहे. मराठीमध्ये फलक लावल्याने कन्नड रक्षण वेदिकेच्या गुंडांकडून नगरपालिकेत याचा जाब विचाराला आहे त्याला पालिकेकडून चोख प्रत्युत्तर देण्यात आले आहे. स्थानिकांची भाषा कोंकणी असल्याने कोंकणीमध्ये फलक लिहिण्यात आले असल्याचे पालिकेने सांगितले.

येथील डॉ. कमलाकर रस्त्याचा नामफलक पालिकेने कन्नड व देवनागरी भाषेत लावला आहे. त्यामुळे कन्नड रक्षण वेदिकेच्या प्रवीण शेट्टी गटाकडून नगरपालिकेचे आयुक्त आर. पी. नायक यांना फोनवरून रस्त्याचे नामफलक मराठी भाषेमध्ये का लिहण्यात आला आहे, असा जाब विचारला. तसेच हे योग्य नाही असे सांगून कारवारमध्ये कोकणी नागरिकांना कन्नड येत नाही का, असा सवालही उपस्थित केला. याला नगरपालिकेने चोख प्रत्युत्तर देत वेदिकेच्या कार्यकर्त्यांची बोलती बंद केली. रस्त्याचे नामफलक मराठी भाषेमध्ये नसून, प्रशासकीय भाषा कन्नडसह स्थानिक नागरिकांची भाषा कोकणी असल्याने कोकणीमध्ये लिहिण्यात आले आहेत. कोंकणी भाषेची लिपी देवनागरी असल्याचेे नगरपालिकेकडून कळविण्यात आले. यामुळे कन्नडिगांची बोलती बंद झाली आहे.

Back to top button