मुख्यमंत्री बदल अनिवार्य? केंद्रीय गृहमंत्री शहा यांचा बोम्मईंना संदेश | पुढारी

मुख्यमंत्री बदल अनिवार्य? केंद्रीय गृहमंत्री शहा यांचा बोम्मईंना संदेश

बंगळूर ; पुढारी वृत्तसेवा : गेल्या अनेक दिवसांपासून मुख्यमंत्री बदलण्यात येणार असल्याची चर्चा सुरू होती. आता पक्षश्रेष्ठींनी तसा स्पष्ट संदेश बसवराज बोम्मई यांना रवाना केल्याची माहिती मिळाली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा बंगळूर दौर्‍यावर आले असून मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना पदत्यागाची सूचना केल्याचे समजते. मुख्यमंत्रिपद स्वीकारल्यानंतर बसवराज बोम्मई सामान्यांचे नेते असल्याची प्रतिमा निर्माण झाली होती. त्यानंतरच्या काळात भ्रष्टाचार, मंत्र्यांवर विविध आरोप आदींमुळे सरकार आणि पक्षाची प्रतिमा मलीन झाली आहे.

मंत्रिमंडळातील सदस्य आणि आमदारांवर नियंत्रणाचा कोणताही प्रयत्न केला नाही. स्वच्छ सरकार, पारदर्शक प्रशासन देण्यात असफल झाले. निर्णय घेतले गेले नाहीत. त्यामुळे मुख्यमंत्रिपद सोडण्याचे अमित शहा यांनी बोम्मई यांना सांगितल्याची माहिती मिळाली आहे.

श्रेष्ठींचा हा निर्णय जड अंत:करणाने बोम्मई यांनी मान्य केला. आपल्यावर विश्वास ठेवून उच्च पद दिल्याबाबत त्यांनी आभार मानले. राज्यात पुन्हा भाजपची सत्ता आणण्यासाठी सर्व प्रयत्न करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. अमित शहा नियोजित कार्यक्रम आटोपून परतले आहेत. पुढील आठवड्यात भाजपची कोअर कमिटी बैठक होणार आहे. त्यावेळी मुख्यमंत्री बदलण्याबाबत अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. त्याबरोबरच प्रदेशाध्यक्ष खासदार नलीनकुमार कटील कार्यकाळ पूर्ण करत आहेत. त्यांच्या जागी केंद्रीय मंत्री शोभा करंदलाजे यांची नियुक्ती करण्याचा विचार केला जात आहे.

मुख्यमंत्री बोम्मई यांच्या कार्यकाळात भाजप नेत्यांचे काही घोटाळे उघड सरकारवर 40 टक्के कमिशनचा आरोप झाला. मंत्र्यांवर फसवणूक, अश्लील चाळ्यांचे आरोपही झाले. मंत्र्यांच्या कामगिरीत कोणतीही सुधारणा झाली नाही. श्रेष्ठींनी याची गांभीर्याने दखल घेतली. अखेर मुख्यमंत्री बदलण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे अमित शहा यांनी बोम्मईंना सांगितले.

बोम्मई यांची उचलबांगडी केल्यानंतर त्यांच्या जागी उत्तर कनांटकातीलच एका लिंगायत नेत्याची मुख्यमंत्रिपदी नियुक्ती करण्याचा विचार चालवला आहे. यामध्ये अनेक नावे आघाडीवर आहेत.

शेट्टर यांचे नाव आघाडीवर

मुख्यमंत्रिपदासाठी विचारात घेतल्या जाणार्‍यांच्या यादीत जगदीश शेट्टर यांचे नाव अग्रस्थानी आहे. त्यांच्या मागोमाग ज्येष्ठ नेते बसनगौडा पाटील यत्नाळ, मंत्री मुरुगेश निराणी, आमदार अरविंद बेल्लद यांच्या नावांची चर्चा आहे. त्याचप्रमाणे नलीनकुमार कटील प्रदेशाध्यक्षपदाचा कार्यकाळ पूर्ण करत आहेत. त्यांच्या जागी केंद्रीय मंत्री शोभा करंदलाजे यांची नियुक्ती होण्याची शक्यता आहे.

Back to top button