रत्नागिरी, पुढारी वृत्तसेवा : कोकण प्रादेशिक क्षेत्रातील महापुरामुळे खेड, चिपळूण, राजापूर तसेच संगमेश्वर तालुक्यातील वीज यंत्रणा पाण्यात बुडून आपत्कालीन परिस्थितीत वीज पुरवठा बंद करणे भाग पडले होते. पूर ओसरताच महावितरण कंपनीच्या अधिकारी आणि कर्मचार्यांनी अथक परिश्रम घेऊन बहुतांशी भागातील वीज पुरवठा सुरळीत केला आहे.
कोकण प्रादेशिक क्षेत्रात येणाऱ्या खेड येथील 14, 8087, रत्नागिरी विभागातील 1, 15, 273 आणि चिपळूण विभागात 50, 977 अशी एकूण 3 लाख 14 हजार 337 वीज कनेक्शन बंद पडली होती, 24 तासांत यापैकी 2 लाख 87 हजार 737 वीज कनेक्शन सुरू करण्यात यश आले आहे.
महापुरामुळे चिपळूण येथे वीज पुरवठा करणार्या चार उपकेंद्रात पाणी भरले होते. यापैकी खेर्डी उपकेंद्र येथे 7 फूटपर्यंत पाणी साचल्यामुळे सर्व पॅनल, वीज यंत्रणा चिखल गाळाने भरून गेली होती. पुराची तीव्रता कमी होताच या चार पैकी एक उपकेंद्र सुरू करण्यात आले.
तसेच प्रथम सर्वच्या सर्व 8 कोविड रुग्णालयातील वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला. यानंतर प्रत्यक्ष ज्या वीज वाहिन्या पाण्याला स्पर्श करत नाहीत आणि धोकादायक ठरू शकत नाहीत, तेथील वीज पुरवठा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.
यामुळे चिपळूण येथील अंदाजे 55 हजार वीज कनेक्शन पैकी 16 हजार वीज कनेक्शन 24 जुलै रोजी सायंकाळी सुरू करण्यात आली. वीज कनेक्शन सुरू करताना प्राधान्याने हॉस्पिटल्स आणि पाणी पुरवठा योजना सुरळीत होतील यांचे नियोजन करण्यात आले.
बंद पडलेल्या 584 पाणी पुरवठा योजनांपैकी 548 योजनांचा वीज पुरवठा सुरू झाला आहे आणि पंप हाऊस पाण्याखाली असणे, वीजवहिनी पाण्यात असणे अशा 36 पाणी पुरवठा योजना अद्यापि बाधित झालेल्या आहेत.
कोकण प्रादेशिक क्षेत्रात चिपळुणमधील कोविड हॉस्पिटल आणि ऑक्सिजन प्लांटचा वीज पुरवठा पहिल्या 12 तासातच सुरळीत करून महावितरण कंपनीने मोठा दिलासा दिला आहे. जिल्ह्यातील 761 गावातील 4609 ट्रान्सफॉर्मर, उच्च दाब वाहिनीचे 321 पोल, लघूदाब वाहिनीचे 402 पोल बाधित झाले होते. फक्त 24 तासातच या मधील 4156 ट्रान्सफॉर्मर विविध प्रयत्नाने सुरू करण्यात आले आहेत.
कल्याण येथील प्रादेशिक संचालक श्री प्रसाद रेशमे, मुख्य कार्यालयातील अधिकारी यांनी दूर दृश्य प्रणाली द्वारे परिस्थितीचा आढावा घेतला आणि मुख्यअभियंता यांना साहित्य तसेच मनुष्यबळ कमी पडू देऊ नये. पाऊस आणि पाणी कमी होताच त्वरित वीज पुरवठा पूर्ववत होण्यासाठी प्रयत्न करण्याचे स्पष्ट निर्देश दिले होते.
संगमेश्वर येथील खाडी पट्ट्यातील एक फिडर, खेड येथील 11 फिडर, राजापूर येथे 1 फिडर असे जागोजागी विविध फिडर पाण्यामुळे बंद करण्यात आले होते. सुरक्षिततेची पूर्ण दक्षता घेऊन टप्प्याटप्प्याने वीज पुरवठा सुरू करण्यात येत आहे.
फिल्डवर सर्वच अधिकारी राबताहेत
मुख्य अभियंता देवेंद्र सायनेकर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारी अभियंता बेले, शिवतारे व लवेकर हे रत्नागिरी, खेड व चिपळूण येथे प्रत्यक्ष फिल्डवर उपस्थित राहून कार्यरत असल्याने अनेक निर्णय तातडीने घेणे शक्य झाले.
महावितरण कंपनीच्या तांत्रिक कर्मचार्यांनी प्रसंगी पाण्यात पोहत जाऊन वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आपली कर्तव्यनिष्ठा दाखवली. कंपनीचे तांत्रिक कर्मचारी, विद्युत ठेकेदार टीम यांनी आपल्या अथक प्रयत्नांनी साध्य केले आहे.